MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

Categories
Breaking News PMC पुणे

म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

| येरवडा, गाळेधारक पदाधिकाऱ्यांची आणि  डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

येरवड्यातील नागपूर चाळ येथील म्हाडाच्या इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया जलद होण्यासाठी आवश्यक असलेले हवाई दल आणि पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत’ पत्र गृहरचनासंस्थे ऐवजी म्हाडाने स्वतः मिळवावे, अशी आग्रही मागणी आज म्हाडाच्या गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. जीर्ण आणि धोकादायक इमारतीत आणखी किती वर्ष राहायचे, असा उद्विग्न सवालही यावेळी गाळेधारकांनी उपस्थित केला.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा केली. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माने, समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे, संयुक्त महासंघाचे देवी दिघे, राजकुमार जाधव, भाजपचे मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

हवाई दल, पुणे महानगरपालिका, म्हाडा आणि राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे आणि वारंवार धोरण बदलत असल्यामुळे म्हाडाच्या 127 जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. हवाई दलाने नागपूर चाळ सर्वे नंबर 191 अ परिसरात 2016 साली बांधकामावर निर्बंध लादले आहेत. परंतु हे निर्बंध नेमके काय आहेत, यात अद्याप स्पष्टता नाही.
इमारतींच्या पुनर्विकासाठी हवाई दलाचे आणि पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पुणे महानगरपालिका प्रत्येक सोसायटीकडे  स्वतंत्र मागते. ते देणे व्यवहारी नाही. त्यामुळे हे पत्र देण्याची जबाबदारी म्हाडाने घ्यावी, असा मुद्दा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालकमंत्र्यांकडे मांडला.

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक अद्यापही भाडेकरूच आहेत. त्यामुळे गाळेधारकांना म्हाडाने मालकी हक्क करून द्यावा, अशी मागणी बैठकीत झाल्यानंतर पालकमंत्र्यांनीही तशी सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिली.

समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे म्हणाले, म्हाडाच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये गाळेधारक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सरकार बदलले की धोरण बदलते हे थांबले पाहिजे. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास विषय मार्गी लागेल.
—————––————

म्हाडाच्या अल्प, मध्यम, आणि उच्च उत्पन्न गटातील गाळे धारकांना इमारतींच्या पुनर्विकासात समान न्याय मिळावा. पुनर्विकासासाठी म्हाडाने संपूर्ण परिसराचा एकत्रित आराखडा तयार करून नियोजन केल्यास हवाई दल आणि पर्यावरण विभागाच्या एकाच ना हरकत पत्रात काम होईल

 

डॉ. सिद्धार्थ धेंडे ( माजी उपमहापौर)
——————

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक हे भाडेकरू ऐवजी जमिनीचे मालक कसे होतील, याबाबत कार्यवाही करायच्या सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच बांधकाम बाबतच्या निर्बंधाबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी हवाई दलाला विचारणा केली आहे.

– चंद्रकांत पाटील (पालकमंत्री)
——–————

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

 मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाला  कनिष्ठ अभियंता पदावर कागपत्रांची पडताळणी करून अश्विनी वाघमारे यांना त्वरित नियुक्त करण्याचे आदेश  दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरती देवरगावकर आणि मोनाली जाधव यांना देखील न्याय मिळाला आहे.
पुणे महापालिकेच्या रिक्त झालेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठी प्रतीक्षा यादीत पात्र असतानाही महापालिका प्रशासनाने नियुक्ती दिली नाही. या बाबत अश्विनी वाघमारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य विद्युत/यांत्रिकी) रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ८ ऑगस्ट २०१६ आणि ३१ ऑगस्ट २०१६ रोजी जाहीर प्रकटन प्रसिध्द करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ८ ऑक्टोबर २०१६ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल २ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र छाननी नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी/प्रतीक्षा यादी ५ जानेवारी २०१७ रोजी संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाकरिता अनुसूचित जाती महिलासाठी ७ जागा राखीव होत्या. त्या जागांवर निवड झालेल्या पैकी एक महिला उमेदवार रुजू झाल्या नाहीत. तर दुसऱ्या अपात्र ठरल्या. त्यामुळे रिक्त झालेल्या सदर २ जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेवारांना संधी देणे नियमानुसार गरजेचे आहे. त्यापैकी एका जागेवर प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराला बोलाविण्यात आले. नियमानुसार दुसऱ्या जागेवर अश्विनी वाघमारे यांना बोलावणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर एक वर्षाच्या प्रतीक्षा यादीचा कालावधी असल्याचे सांगून नियुक्त करण्यास महापालिका प्रशासनाने नकारघंटा दिली.
महापालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मार्गदर्शनाने अश्विनी वाघमारे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. मा. उच्च न्यायालयाने सुनावणी देताना प्रतीक्षा यादीचा कालावधी एक वर्षाचा कोणी ठरवला, असा प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाला खडसावले. रिक्त पद भरले जाईपर्यंत प्रतीक्षा यादीतील उमेदवार पात्र ठरतात असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संबधित याचिकाकर्ते अश्विनी वाघमारे यांची कागदपत्रे पडताळणी करून ते योग्य असल्यास त्यांची नियुक्ती कायदेशीर ठरत आहे. त्यामुळे हा आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत संबंधित याचिकाकर्त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.  त्यामुळे आरती देवरगावकर आणि मोनाली जाधव यांना देखील नोकरीवर रुजू करण्यात आले आहे.
—-
कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र ठरत असतानाही महापालिका प्रशासन नकार देत होते. प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला वेळेत कळविण्याची जबाबदारी महापालिकेची होती. त्यांनीच त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियुक्ती दिली नाही. या बाबत न्यायालयात दाद मागितली. पाठपुरावा केला. मा. उच्च न्यायालयाने संबंधित महिला उमेदवाराला न्याय देऊन नोकरीवर रुजू करण्याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————————–

Employment Fair | बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

Categories
Breaking News Education Political social पुणे

बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

| 30 कंपन्यांचा सहभाग 200 युवकांनी दिल्या मुलाखती

पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील युवकांसह पुण्यातील अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील त्रिरत्न बुद्ध विहारात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यात 30 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 500 जणांनी या मेळाव्याला भेट दिली. 200 जणांच्या मुलाखती झाल्या असून 125 बेरोजगार युवकांना जागेवरच रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने झालेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, सुभाष चव्हाण आदीसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

येरवडा परिसरात अनेक विविध नामांकित कंपनी, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, कुरियर कंपनी आयटी पार्क आदीसह विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांना त्याबाबत कोणतीही कल्पना नसते अथवा त्यांच्यापर्यंत नोकरी उपलब्ध असल्याची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही. परिणामी युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरत आहे. या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, रोजगाराच्या संधीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, युवक हा देशाच्या विकासाचा कणा आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी युवक मोठे योगदान देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक अंगाने सक्षम करणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. याची जाणीव ठेवून युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याचा फायदा युवकांना झाला. अनेकांना जागेवरच रोजगाराची संधी प्राप्त झाली. तर काहींना येत्या काळात लवकरच या संधी उपलब्ध होणार आहे.

सहाय्यक पोलीस उपायुक्त किशोर जाधव म्हणाले की, अनेक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांनी तिथपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे असते. योग्य मार्ग पकडून गेल्यास रोजगार प्राप्त होतो, असे जाधव म्हणाले.

भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले की, रोजगार मेळाव्यातून एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधीची माहिती मिळते. वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या सर्व रिक्त जागांबाबत असणाऱ्या संधी समजतात. रोजगार मेळाव्यातून अशा संधी युवकांना प्राप्त करून घेता येतात. त्यामुळे हा रोजगार मेळावा युवकांसाठी उपयुक्त ठरलेला आहे.
——————————–

Siddharth Nagar | PMC| सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे

नगर रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या रामवाडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी धारकांना एसआर अंतर्गत घरे देण्याचे महापालिका आयुक्तानी मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून खुळेवाडी ट्रांनझिट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, सिद्धार्थनगर वासियांची घरे 2007 मध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित झाली होती. येथील रहिवाशांना खुळेवाडी येथील तात्पुरत्या स्वरूपात रहाण्यासाठी जागा दिली होती. मात्र त्याठिकाणी रहाणाऱ्या राहिवाशांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. असुविधेमुळे नागरिक त्रस्त होते. रहिवाशाना पक्की घरे मिळण्यासाठी जगदीश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी नागरिकांसासह एसआरएचे अधिकारी, महापालिका आयुक्त यांचे कडे वारंवार पत्र व्यवहार करून वारंवार बैठाका घेतल्या होत्या. एसआरएच्या अधिका-यांनी महापालिकेने सदर राहिवाशांची सोय करावी असे पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त, मालमता विभागाचे उपायुक्त यांचेशी बैठक घेऊन नागरिकांना विमाननगर, रामवाडी येथील एसआरए योजनेत घरे मिळावीत अशी मागणी बैठकीत केली होती. आयुक्ताच्या आदेशा नंतर मालमत्ता विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी विमाननगर व रामवाडी येथील एसआरए इमारती मधील शिल्लक असणारी घरे खुळेवाडी येथे ट्रांनजीट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या राहिवाशांना देण्याचे मंजूर केल्याचे पत्र दिले आहे.

जगदीश मुळीक म्हणाले, आपण याबाबत एसआरए तसेच महापालिका अधिकारी यांच्याकडे टेबल टू टेबल असा पाठपुरावा केल्यामुळे आज खुळेवाडी येथे स्थलांतर झालेल्या राहिवाशाना पक्की घरे देण्याचे मंजूर झाले आहे.

आयुक्तानी घेतलेल्या या निर्णयामुळे सिद्धार्थनगर मधील रहिवाशाना पक्की घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सिद्धार्थ नगर मधील राहिवाशा मध्ये आनंदाचे वातावरण असून राहिवाशानी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Ward no. 2 | प्रभाग 2 मध्ये ग्रंथालय, अभ्यासिकासह सुसज्ज त्रिरत्न विहार योगा हॉल होणार | खासदार गिरीश बापट यांच्या फंडातून 25 लाखांची मंजूरी

Categories
Breaking News Political social पुणे

प्रभाग 2 मध्ये ग्रंथालय, अभ्यासिकासह सुसज्ज त्रिरत्न विहार योगा हॉल होणार

| खासदार गिरीश बापट यांच्या फंडातून 25 लाखांची मंजूरी

– डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा
ग्रंथालय, अभ्यासिका, बौद्ध भिख्खुंसाठी निवासस्थान आदी विविध सुविधांनी सुसज्ज अशा योगा हॉलची इमारत पुर्णत्त्वास येणार आहे. पुणे प्रभाग क्रमांक दोन मधील त्रिरत्न विहार योगा हॉलसाठी खासदार गिरिश बापट यांच्या फंडातून 25 लाख रुपयांना मंजूरी मिळाली आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून या हॉलचे अंतिम टप्प्यातील कामही लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. या बाबत परिसरातील नागरिकांनी खासदार गिरीश बापट यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी सुसज्ज योगा हॉलची निर्मिती व्हावी, यासाठी नागरिकांनीही वेळोवेळी मागणी केली होती. त्याची दखल घेत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार 2018-19 मध्ये माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार फंडातून 20 लाख रुपये मंजूर झाले. त्यामधून त्रिरत्न विहार योगा हॉलच्या कामाला सुरूवात करण्यात आली. निधीचा पुर्ण वापर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून देखील 20 लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्याचे काम निधीअभावी रखडले होते. त्यासाठी डॉ. धेंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने खासदार गिरिश बापट यांनी 25 लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. योगा हॉलचे अंतिम टप्प्यातील काम त्वरीत पुर्ण करून नागरिकांसाठी हा हॉल उपलब्ध होणार आहे.
या पाठपुराव्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहे.
या सुविधा मिळणार
प्रभाग क्रमांक 2 मधील त्रिरत्न विहार योगा हॉलमध्ये खाली विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा देण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर विविध विषयांवर आधारित पुस्तकांचा संग्रह असणारे ग्रंथालय तसेच बौद्ध भिख्खुंचे निवासस्थान असणार आहे. तर वरच्या मजल्यावर बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करून योगा हॉलची सुविधा मिळणार आहे.
——
त्रिरत्न विहार योगा हॉलचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. निम्मे काम पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत काम पुर्ण करण्यासाठी निधीची कमतरता होती. मात्र खासदार गिरिश वापट यांच्या फंडातून 25 लाख रुपये मंजूर केल्याने उर्वरीत काम पुर्ण करू.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
——————-

Lumbini Park | लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक

Categories
Breaking News PMC Political पुणे

 लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक

पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीटनेटके नियोजन केल्यामुळे पुणे माहपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या लुंबिनी उद्यानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या सुशोभिकरणात आणि नीटनीटकेपणाचे योग्य नियोजन आम्ही केले होते. विकासाच्या दृष्टीमुळे आणि कर्मचारी, नागरिक यांच्या सहाय्याने लुंबिनी उद्यान प्रथम ठरले आहे. अशी माहिती माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. (PMC pune Lumbini park)

डॉ धेंडे यांनी सांगितले कि, आरोग्याबाबत नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहेत. पहाटे व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. नागरिकांना फिरण्यासाठी योग्य सुविधा देणे गरजेचे आहे. या उद्देशाने लुंबिनी उद्यानाची निर्मिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. उद्यानात नागरिकांना फिरण्यासाठी सुसज्ज ट्रॅक तयार केले आहेत. त्यावरून नागरिक चालण्याचा आणि धावण्याचा व्यायाम करत आहेत. उद्यानात शांतीचा मार्ग सांगणारे गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. केवळ प्रतिमा न उभारता त्याखाली मानवी जीवन समृद्ध करणारे विचार देखील नमूद करण्यात आले आहेत. उद्यानात मध्यभागी गोलाकार लहान हॉल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये तरूण, ज्येष्ठ योगाचा व्यायाम करतात.

या बरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्यानात कुठेही अस्ताव्यस्त कचरा पडलेला नाही. उद्यानाच्या वेळा नियमितपणे पाळल्या जात आहेत. ज्येष्ठांचा हास्य क्‍लब भरतो. त्याचा देखील फायदा होत आहे. उद्यानात स्वच्छ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा आहे. या बरोबरच एका सुरक्षारक्षकाबरोबरच माळी देखील या ठिकाणी कार्यरत आहेत.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नवीन उपक्रम या ठिकाणी राबविले जात आहेत. त्यांच्यामार्फत दिलेल्या सुविधांमुळे महापालिकेच्या वतीने दखल घेण्यात आली. पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 च्या स्पर्धेत सरस ठरत उद्यानाने प्रथम क्रमांक पटकाविला. असे हि धेंडे यांनी सांगितले.

Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

| भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली.

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सन 2018 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता, त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण, पुरेशा बसव्यवस्था, आणि गोल्फ चौक, खराडी कल्याण नगर, येरवडा, विश्रांतवाडी येथे आवश्यकतेप्रमाणे उड्डाणपूल किंवा ग्रेड कामे अंदाजपत्रकात सुचविली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. खराडी येथे उड्डाणपुलासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सूतोवाच केले. राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.’

Dr Siddharth Dhende | अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती – 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

Categories
Breaking News PMC Political पुणे

अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती

– 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. महापालिकेच्या पथ विभागातर्फे सध्या उर्वरीत रस्त्याच्या 60 लाख रुपयांच्या कामाची सुरूवात झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या कामाचे उद्धाटन भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआय आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य अध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, सचिन धीवार, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, माजी नगरसेविका फरजाना शेख प्रभाग दोन मधील विविध धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आरपीआय आठवले गट, भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक, सामाजिक मंडळांचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, अग्रेसन शाळा ते ई-कॉमरझोनचा रस्ता पुर्ण झाल्यास वाहनधारकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे. वाहनधारकांना मारावा लागणारा मोठा वळसा कमी होणार असून अंतर आणि वेळ वाचणार आहे. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची संपलेली मुदत यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा रस्ता पुर्ण करून नागरिक, नोकरदार, कामगार, वाहनधारकांची गैरसोय दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.

विश्रांतवाडी चौक सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पुणे महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी महापालिकेकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे या वेळी केली.

कॉमरझोन चौकातील वाहतूक कोंडी सुटणार –

प्रभाग दोन मधील कॉमरेझोन चौकात नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केल्याने विद्युत पथदिवे (सिग्नल) बसविन्यात आले आहेत. तसेच डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने चौक सुशोभीकरणाचा आराखडा (डिझाईन) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक आकर्षित होऊन वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे.

Buddhism | अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून बौद्ध धम्म जगभर पोचेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
Breaking News cultural Political social पुणे

अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून बौद्ध धम्म जगभर पोचेल | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण

– सुशोभीकरणासाठी डॉ. धेंडे यांचा पुढाकार

14 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात येत आहे. पुण्यात जी-20 परिषदेला देखील आजपासूनच सुरूवात होणार आहे. त्यामुळे सम्राट अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीतून जगभरातील प्रतिनिधींना बौद्ध धम्माचा विचार समजेल, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

येरवडा पोस्ट येथील सम्राट अशोक चौकात अशोकस्तंभाचे अनावरण बौद्ध भंते नागघोष आणि सर्व भंतेगण संघाच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. सिद्धार्थ धेंडे बोलत होते.

या वेळी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक, आरपीआयचे राज्य कार्याध्यक्ष परशुराम वाडेकर, सरचिटणीस बाळासाहेब जानराव, उपाध्यक्ष अतित गांगुर्डे, अल्पसंख्यांक अध्यक्ष आयुब शेख, राज्य सचिव अशोक कांबळे, पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राज्य संघटन सचिव ऍड. मंदार जोशी, भदत्न आनंद मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वावरे, वैभव कडलक, जेल ट्रेनिंगचे प्राचार्य ईंदुलकर, दिनेश गंगावणे, बापु सरवदे, विजय कांबळे यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर आणि पुणे महापालिका प्रभाग 2 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविक प्रतीचे वाचन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. धेंडे म्हणाले की, आरपीआयचे ज्येष्ठ नेते व पुणे महापालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते उद्धव वावरे यांनी येरवडा पोस्ट येथील चौकाला सम्राट अशोक चौक असे नामकरण करण्यासाठी ठराव केला. तो मंजूर करून घेतला. त्याला साजेशी प्रतिकृती तयार करण्यासाठी मी पुढाकार घेतला. त्यानुसार अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात आले. सम्राट अशोक चौक परिसराला देखील ऐतिहासिक वारसा आहे. या चौकाच्या पाठीमागे असणाऱ्या येरवडा जेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला पुणे करार या गाजलेला आहे. सध्या पुण्यात जी 20 परिषदेसाठी जगभरातील विद्वान दाखल होणार आहेत. बौद्ध धम्माचा वारसा या जगभरातील विचारवंतांना समजावा, फुले-शाहु-आंबेडकर विचारांची चळवळ जगभर पोचावी, यासाठी या अशोकस्तंभाचे अनावरण करण्यात आले असल्याचे धेंडे म्हणाले.

भंते नागघोष म्हणाले की, सम्राट अशोक यांनी बुद्धांनी मैत्रीच्या भावनेतून जग जिंकले आहे. त्यांनी समता, बंधुता व न्याय ही मुल्य अंगीकारले.

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले की, सम्राट अशोक हे चक्रवर्ती होते. कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी युद्ध नको बुद्ध स्विकारला. जगभर त्याचा प्रचार प्रसार केला.

Sanitation in Vijayastambh area | भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम |डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम

|डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सामाजिक संस्थांचा सहभाग

1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे 15 लाख भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतला. या वेळी परिसरातील कचरा, पाण्याच्या बॉटल, कागद आदी उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता उपक्रमात सुनिल माने, जितेंद्र गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, निर्भय प्रतीष्ठानचे निखिल गायकवाड, आयुष आंबेडकरी युवा मंचचे सुनिल धतराज व सहकारी, स्वच्छ संस्थाचे चेतन हरनामे व कर्मचारी, आधार पुनावालाचे मल्हार करवंदे, नागेश पवार व सहकारी, पथारी संघटनेचे विजय कांबळे, संदीप चाबुकस्वार तसेच पेरणे ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश ठोंबरे आदींसह विविध जणांनी सहभाग घेतला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, भीमा कोरेगावला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांच्या आठवणींचे जतन भीम अनुयायी करत असतात. ही ऐतिहासिक आठवण स्मरणात रहावी, यासाठी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. एवढ्या प्रचंड संख्येनंतर या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी देखील आपलीच आहे, या सामाजिक भावनेतून परिसरात स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.