Contract workers | कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा 

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम थकवणाऱ्या ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा

| माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

पुणे | महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनाप्रमाणे ठेकेदाराने वेतन देणे अपेक्षित आहे. या ठेकेदारांना महापालिकेच्या विविध विभागाकडून रक्कम देण्यात आली आहे. असे असतानाही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे 20 कोटी थकवलेले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

डॉ धेंडे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेमधील विविध विभाग व खात्यांकडील पुणे महानगरपालिकेची कामे ठेकेदार पध्दतीने कंत्राटी कामगारांकडून केली जातात. यामध्ये विविध क्षेत्रीय कार्यालयामधील झाडण कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, आस्थापनेवरील कर्मचारी सुरक्षा विभागातील कर्मचारी, मोटार वाहन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाकडील कर्मचारी, पथ विभाग अशा अनेक विभागांमधील सन २०२२ मधील एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीमधील ६५०० कामगारांचे वेतनापोटी, भविष्य निर्वाह निधी (E.P.F.) तसेच कर्मचारी विमा योजना (ESIC) पोटी जवळजवळ रक्कम २० कोटी या कर्मचाऱ्यांना अदा करणे बाकी आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे कि,  विविध विभागातर्फे संबंधित ठेकेदारांना वेतनापोटीची रक्कम अदा केली नसेल तर त्यांना आदेश देवून सदरील रक्कम त्वरीत अदा करावी. जर विभागांकडून सदरील वेतनापोटीची रक्कम अदा करूनही ठेकेदारांनी रक्कम कर्मचाऱ्यांना अदा केली नाही तर आपण आपल्या खातेप्रमुखांना तात्काळ आदेश देवून दोषी ठेकेदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करावेत.

पुणे महानगरपालिकेच्या टेंडर पध्दतीमध्ये मनुष्यबळ पुरविणारे विविध ठेकेदार संस्था यांनी पुणे महानगरपालिकेला अंधारात ठेवून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या मेहनतीचा मेहनत नामा ठेकेदारांनी स्वतःची आर्थिक तिजोरी भरणेकरीता केला आहे. ही एक प्रकारे पुणे महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्यासारखे आहे. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून भविष्यामध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेने मनपाचे कोणतेही काम देवू नये. व त्यांच्याकडून दंडासहित कामगारांच्या थकलेल्या पैशांची वसूली करून त्या कर्मचाऱ्यांना अदा करणेत यावे. असा आदेश लवकरात लवकर पारित करावा. अशी मागणी धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा

| कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत

| संघटनांसोबत राजकीय पक्ष रस्त्यांवर उतरणार

पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभाग द्वारे अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना चालवली जाते. मात्र या योजनेवरील खर्च वाढत चालल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याबाबत आता महापालिकेच्या कर्मचारी संघटनाकडून आता याविरोधात लढा उभारला जाणार आहे. याचाच भाग म्हणून  बुधवार  १६ नोव्हेंबर ला दुपारी ४.०० वाजता कामगार, कर्मचारी, अधिकारी व सेवानिवृत्त सेवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत दिसून आले. गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी देखील संघटना आणि राजकीय पक्षांनी केली आहे.
हा मेळावा पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व त्यांच्या सहयोगी संघटनांनी आयोजित केला होता. यामध्ये संघटनेच्या मुक्ता मनोहर, उदय भट, प्रदीप महाडिक, आशिष चव्हाण, अशा पदाधिकाऱ्यांबरोबर काँग्रेस प्रभारी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, आरपीआय चे डॉ सिद्धार्थ धेंडे, एमआयएम च्या अश्विनी लांडगे, माजी नगरसेवक दीपक मानकर, अविनाश बागवे, सुधीर जानज्योत, अजित दरेकर, अजय खेडेकर, आरती कोंढरे, आदी नेते उपस्थित होते.
  सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना (CHS), मोडीत काढून ही योजना खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या दावणीला बांधण्याचा प्रशासनाने चंगच बांधला आहे. सध्याची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना तशीच अबाधित ठेवावी व खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया रद्द करावी असे संघटनेने भेटून व वारंवार पत्रे देऊन प्रशासनाला यापूर्वीच कळवले आहे. त्याचबरोबर १२ मे २०२२ रोजी व त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी म.न.पा. भवनासमोर मोठी निदर्शने, आंदोलने करून मेडिक्लेम प्रक्रिया थांबवावी असे पुन्हा एकदा मांडले. तरीही ट वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्याकरीता, १) रंगनाल इन्शूरन्स ब्रोकिंग अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड व २) जे. के. इन्शुरन्स ब्रोकर लिमिटेड, या दोन कंपन्यांना दिनांक २१-१०-२०२२ च्या स्थायी समितीच्या ठरावात मान्यता देण्यात आली आहे.

पुणे मनपामध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ७१% टक्के आहेत व उर्वरीत अधिकारी व इतर कर्मचारी आहेत. हे सगळे मिळून पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण करणे व इतर नागरी सेवा पुरवणे अशी विविध कामे करतात. यातील अनेक कामे ही आरोग्याला घातक अशी आहेत. कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करताना ८८ कायम कर्मचाऱ्यांनी व १३ कंत्राटी कामगारांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व पुणे शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे रक्षण केले, यामुळे या कर्मचान्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे विशेष गरजेचे आहे. याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या हिताचाच विचार करणे हे आम्ही सहन करणार नाही. असे म्हणत संघटनेने लढा उभारला आहे.

या मेळाव्यात मुक्ता मनोहर म्हणाल्या, आम्ही काम करत असताना जनतेला कधीही वेठीस धरले नाही. कोरोना सारख्या महामारीत देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवाचे बलिदान देत शहरासाठी काम केले आहे. असे असताना आमचे हक्क हिरावून घेणे दुर्दैवी आहे. काँग्रेस चे अरविंद शिंदे म्हणाले, कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य सभेला असतो. मात्र प्रशासक त्यांना हवे तसे निर्णय घेत आहेत. प्रशासकाने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार मुख्य सभेला आहे. आम्ही तो अधिकार वापरू. शिंदे पुढे म्हणले, प्रशासकांना अजून  कामगारांची ताकद माहित नाही. याबाबत त्यांनी एक दाखला देत कामगारांच्या शक्तीपुढे प्रशासकांना माघार घ्यावी लागेल असे नमूद केले. कामगारांना काम बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे ही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, योजना मोडीत काढण्यामागे कुठली अदृश्य शक्ती असेल तर तिला शोधून काढावे लागेल. अशी मनमानी आम्ही चालू देणार नाही. डॉ सिद्धार्थ धेंडे म्हणाले चतुर्थ श्रेणी कामगारांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर जास्त पैसे खर्च होतात, असे म्हणण्याचा प्रशासनाला अधिकार नाही. प्रशासकांनी अशी मनमानी करू नये. अशाच पद्धतीने सर्वच राजकीय नेत्यांनी योजना मोडीत काढण्याबाबत प्रशासनाला दोष देत ठराव रद्द करण्याची मागणी केली. 
| अखेर  कामगार संघटना न्यायालयात 
दरम्यान स्थायी समितीचा ठराव आणि योजनेच्या खाजगीकरण यावरून महापालिका कर्मचारी संघटनानी कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याबाबतची पहिली सुनावणी देखील झाली आहे. न्यायालयाने महापालिकेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

Dr. Siddharth Dhende | पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’ | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी

Categories
Breaking News Political social पुणे

पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी

|स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. धेंडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पुणे |कोवळ्या हातात चाबूक, कपाळ हळदी कुंकूने भरलेले, पाठीवर चाबकाचे फटके ओढत पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात आता शिक्षणाचा दिवा लागणार आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यासाठी पाऊल उचलले आहे. विक्रम निंबाळकर याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. तसेच कोवळ्या वयात वाटेला आलेले पोतराजचे काम सोडून देण्याचे आवाहन कुटुंबियांना देखील केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त डॉ. धेंडे यांनी घेतलेल्या या जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक व्यवस्थेमध्ये अनेकांना पिढ्यानपिढ्या पोतराजचे काम करावे लागत आहे. हातात चाबूक, हळदी कुंकवाने भरलेले मळवट, कंबरेला अनेक कपडे जोडून तयार केलेला घागरा घालून पोतराज घरोघरी फिरत असतात. चाबकाचे फटके पाठीवर मारून पैसे आणि धान्य गोळा करण्याचे काम करतात. आजही काही प्रमाणात पोतराज दिसत आहेत.

येरवडा भागात राहणाऱ्या विक्रम रामा निंबाळकर या मुलाच्या हातात कोवळ्या वयात पुस्तके, शिक्षणाऐवजी पोतराजचा चाबूक आला. घरची परिस्थितीही बेतातीच असल्याने शाळेत जाणे कठीण झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त प्रभाग क्रमांक दोन येथे पोतराज काम करणारा विक्रम व त्याच्या आईच्या हस्ते अनोखे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पथारी संघटनेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे प्रमुख उपस्थित होते. या वेळी विक्रमच्या घरची चौकशी डॉ. धेंडे यांनी केली. सर्व माहिती घेतल्या नंतर विक्रमच्या आईचे मतपरिवर्तन करून विक्रमला शाळेत पाठविण्याचे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. त्यासाठी येणारा खर्च उचलण्याची जबाबदारी देखील घेतली. मात्र कोवळ्या वयात शिक्षणाची कास धरू द्या, असे आवाहन केले. त्यानुसार डॉ. धेंडे हे विक्रमच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहेत.

सर्वसामान्य लोकांच्या घरात शिक्षणाची शिदोरी पोचली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत आपलं सर्व आयुष्य ती चळवळ उभी करण्यात घालवली आहे. विक्रम सारखी अनेक मुले शिक्षणापासून दूर जात आहेत. ही परिस्थिती सुखावह नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विक्रमची भेट झाली. या वेळी पोतराजचे काम सोडून देण्यास सांगून शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————-

Dr Siddharth Dhende | संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC पुणे

संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

पूर्वीचा प्रभाग क्रमांक २ व सध्याच्या प्रभाग क्रमांक ८ मधील पुणे शहर विकास आराखड्यातील संगमवाडी ते टिंगरेनगर या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नुकतेच रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात.

या वेळी महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी, अमर मतीकुंड, पाडाळे, भुमी जिंदगीचे राजेंद्र मुठे, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलक, शाळेचे ट्रस्टी विकास गुप्ता, भाजप प्रवक्ते मंगेश गोळे, माजी नगरसेवक भगवान जाधव व सुभाष चव्हाण या वेळी उपस्थित होते.

संबंधित रस्त्याचे काम करताना अग्रेसन शाळा येथिल जागा ताब्यात येणे बाकी होते. ते ही काम पुर्ण झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी दिली. अग्रसेन शाळेने जागा ताब्यात देणे करिता रस्त्यात येणाऱ्या वर्ग खोल्या काढुन सुरक्षा भिंत बांधुन घेतली आहे. त्याची देखील पाहणी उपस्थितांनी केली.

या प्रसंगी आयुक्त विक्रम कुमार यांनी भुमीपुजन करुन या विकास आराखड्यामधील रस्ता पुढीलल पंधरा दिवसात नागरीकांना रहदारीकरीता खुला होईल असे सांगितले. रस्त्या करीता निधी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. आळंदी रस्ता तसेच गोल्फ क्लब मधील उड्डाणपुलच्या कामामुळे होणारी वाहतुक कोंडी कमी होईल, हे या प्रसंगी सांगितले.

सध्या 9 मीटर रस्ता खुला झालेला आहे. उर्वरीत रस्ता खासदार गिरिष बापट व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सांगुन दिल्ली मधे बैठक घ्यायला सांगु. तिथे सर्वे आॅफ ईंडिया कडुन जागा हस्तांतरीत करुन घेऊ, असे माजी उपमहापौर डाॅ. धेंडे व मंगेश गोळे यांनी आश्वासित केले.

– रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील कामाचे आयुक्त विक्रम कुमार, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते भूमीपूजन

अग्रेसन दरम्यान असणारा संमवाडी ते टिंगरेनगर रस्ता सुरू झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय टळणार आहे. हा रस्ता सुरू व्हावा यासाठी डाॅ. धेंडे यांनी निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. जागा ताब्यात घेण्याबाबत शासकीय स्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

True Voter App | ट्रु व्होटर ऍप योग्य पद्धतीने काम करीत नाही | डॉ सिद्धार्थ धेंडे 

Categories
Breaking News PMC पुणे

ट्रु व्होटर ऍप योग्य पद्धतीने काम करीत नाही | डॉ सिद्धार्थ धेंडे

पुणे | अनेक प्रभागातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर दुसर्‍या प्रभागाच्या मतदार यादीत (PMC Prabhag Ward Voting List) गेले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे वेगवेगळ्या तीन प्रभागांच्या मतदार यादीत समाविष्ट केली गेली आहेत. तसेच ट्रु व्होटर हे ऍपही योग्य पद्धतीने काम करीत नाही, यामध्येही त्रुटी असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शानास आणून दिल्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

प्रभाग निहाय प्रारुप यादीवर हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी दोन हजाराहून अधिक हरकती आणि सुचना दाखल झाल्या आहे. मतदार यादीतील त्रुटीबाबत यापुर्वी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली होती. तर सोमवारी आरपीआयचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण (RPI Shailesh Chavan), माजी उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Wadekar), डॉ. सिध्दार्थ धेंडे (DR Siddharth Dhende), प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव (Balasaheb Janrao), पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) यांनी आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांची भेट घेऊन त्रुटीविषयी माहीती दिली. तसेच हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन, राज्य निवडणुक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितल्याचे डॉ. धेंडे यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले.

RPI : गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू : आरपीआयचा इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

गोरगरीब व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू

– आरपीआयचा इशारा ; शिष्टमंडळाच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी सर्वसामान्य व्यावसायिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. परिणामी महापालिका कर्मचारी व छोट्या व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. नियमानुसार बेकायदेशीर वागणाऱ्या सर्वांवरच कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र विनाकारण हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना त्रास दिल्यास शहरभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने दिला आहे.

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार  यांची आरपीआयच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला. तसेच विविध मागण्या मांडण्यात आल्या. या वेळी पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक धेंडे, नगरसेविका हिमाली कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

आरपीआयच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांवरती झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही. रिपब्लिकन पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. महापालिका प्रशासक सध्या पुणे मनपामधील धोरण ठरवत आहे. महापालिकेचे काम चालवित आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या मुळापर्यंत गेलो तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासक म्हणून आपण पदभार घेतला आहे. तेव्हापासून बेकायदेशीरपणे पथारी व्यवसाय करणारे नागरिक, बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांचेवर कारवाई करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. कायद्यानुसार हे बरोबर देखील आहे. परंतु कोरोनाच्या दोन वर्षामध्ये अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. त्याचा अधिक फटका हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना बसला. मुलांची शाळेची फी थकलेली आहे. विविध कारणांकरिता बँकेचे कर्ज घेतले मात्र त्याचे हफ्ते रखडलेले आहे. नोकरी गमवावी लागल्याने अनेकांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

शहरातील गरीब कुटुंबाची जगण्याची अशी लढाई एका बाजूला चालु आहे. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेचे चुकीची धोरणे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांच्या मानसिक तणावात भर घालत आहेत. पथपथारीवरील जिवंत माणसे काढायची आणि निर्जीव, बेकायदेशीर बांधलेले होर्डींग, राजकीय लोकांचे कार्यालय, पक्षाचे कार्यालय, विविध धार्मिक स्थळ, विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे नामफलक यांच्यावर कोणीतीही कारवाई करायची नाही हे चुकीचे धोरण महापालिकेचे आहे. छोटे पथारी व्यवसायिक यांच्यवर कारवाई करताना मोठे पंचताराकिंत हॉटेल्स व मॉल मध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामे, टेरेसवर साईट व फ्रंन्ट मार्टिनल, बेसमेंट व पार्किंग मधील चालू असलेले व्यवसाय यावर मात्र कसलीही कारवाई होत नाही. हे दुटप्पी धोरण आहे. हे देखील आपण विचारात घ्यायला पाहिजे. मनपा प्रशासक यांवर कारवाई करणार आहे का ? असा सवाल पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

बेकायदेशीरपणे झालेले व चालु असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश काढले. परंतु मोठे व्यवसायिक यांचेकडून अन्य बेकायदेशीरपणे झालेले बांधकाम यांना मात्र महापालिका प्रशासन अभय देत आहे. पैसेवाले, राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना नियमांमध्ये सुट आहे व दुसरीकडे आर्थिक दुर्बल, राजकीय पाठींबा नसणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. प्रशासक व प्रशासन यांनी फक्त एका वर्गावर अन्याय होईल असे कोणतेही धोरणांचा अवलंब करायला नको आहे. त्यांचा परिणाम हा नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यास पुरेसा होतो. त्यामुळेच महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिका मधील सर्व स्तराच्या वर्गाना समान न्याय द्यावा. कोणाचेही जगण्याचे साधन हिरावून घेऊ नये. तसेच नागरीकांमध्ये भय, द्वेष निर्माण होईल अशी कृती होता कामा नये. अन्यथा रिपब्लिकन पक्ष पुणे शहरामध्ये उग्र आंदोलन करेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला.
————–

Dr. Siddharth Dhende : आरोग्य खात्यात काम करणाऱ्या  इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा 

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

आरोग्य खात्यात काम करणाऱ्या  इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा

: नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची महापालिका आयुक्तांना मागणी

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून महापालिका आरोग्य खात्यात काम करण्यासाठी इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. आता कोरोनाची लाट संपत आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवा. अशी मागणी नगरसेवक आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: आयुक्तांना दिले पत्र

डॉ धेंडे यांच्या पत्रानुसार सन २०१९ पासुन पुणे शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण व पहिली लाट सुरु झाली.  त्यावेळेस आरोग्य खात्याचे कर्मचारी कमी असल्या कारणाने इतर खात्यामधील कर्मचारी व अधिकारी यांना आरोग्य खात्याकडे हजर करुन घेतलेले आहे. आता सन २०२२ चालु आहे. गेल्या २ वर्षामध्ये कोरोनाच्या तीन लाटांचा प्रादुर्भाव होऊन गेलेला आहे. इतकेच नव्हे तर पुणे शहरामध्ये जवळजवळ ९०% लसीकरण नागरिकांचे झालेले आहे. तिसरी लाट देखिल आता संपत चालेली आहे. पुणे महानगरपालिका मध्ये अटलबिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय चालू होण्याकरिता आपण अनेक डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची देखिल भरती केलेली आहे. हे डॉक्टर वैद्यकिय महाविद्यालयाला प्रशासकिय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत ते नुसतेच बसून पगार घेत आहेत. माझी आपणास विनंती आहे. या डॉक्टरांना पुणे महानगरपालिकाच्या आरोग्य खात्याच्या सेवेमध्ये कार्यरत करावे.  तसेच जे कर्मचारी आरोग्य खाते सोडुन इतर खात्यामध्ये काम करित आहेत; त्यांना त्यांच्या मुळ खात्यामध्ये काम करता येईल असे आदेश आपण तत्परतेने दयावे. असे डॉ धेंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Dr. Siddharth Dhende: भारतातील पहिल्या धान्य वितरण करणाऱ्या मशीनचे लोकार्पण

Categories
Breaking News social पुणे

भारतातील पहिल्या धान्य वितरण करणाऱ्या  मशिन चे लोकार्पण

पुणे : आज पुण्यामधे प्रभाग दोन मधिल लुंबिनी उद्यान येथे डिजिटल धान्य वितरण करनार्या मशिन चे लोकार्पण प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले.
डाॅ धेंडे सिद्धार्थ मा उपमहापौर (यश फाउंडेशन ) चे सल्लागार तसेच रे आॅफ जाॅय संस्थ, हेल्थ व केअर फाउंडेशन व यश फाउंडेशन यांच्या वतीने देशात प्रथमच ATM मशीन सारखी AT Ration (आॅल टाईम रेशन )मशिन तैयार केली आहे.

आपल्या प्रस्तावनेमध्ये  मधे डाॅ धेंडे यांनी सांगितले कि कोरोना काळात अनेक कुटुंब यांची आर्थिक स्थिती खालावली आहे त्यांना ऐक हात मदतीचा या माणुसकी  जपायच्या मनोदय डाॅ धेंडे व सर्व स्वयंसेवी संस्था यांनी मिळुन केला व प्रभाग दोन मधिल २०० गरीब कुटुंब ज्यांना घरात कोणी कमवते नाही यांना रेशन कार्ड सारखे स्मार्ट कार्ड दिले आहेत.
या कार्ड चा वापर करुन प्रत्येक महिना ला १० किलो धान्य मोफत या मशिन मधुन मिळणार आहे असे मनोगत व्यक्त केले. या मुळे आर्थिक दुर्बल कुटुंब यांना २४/७ धान्य उपलब्ध होईल त्यांना रांगेत उभे रहायला लागनार नाही.
रेशन वितरण व्यवस्थे बद्दल होनारे आरोप कमी होतील , भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल व नागरीकांना थेट लाभ लवकर मिळेल असे उद्गार उद्घाटक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला नगरसेविका फरझाना शेख, शितल सावंत , समाजसेवक सुहास टिंगरे , मा नगरसेवक अशोक कांबळे , जयदेव रणदिवे , रे आॅफ जाॅय चे संस्थापक दिपक गोंडके , हेल्थ व केअर चे रविंद्र जाधव, मशिन ज्यांनी बनवली त्या रेपिडो कंपनी चे अशिश डाकोळे , फिनिक्स चे प्रशांत साळवे तसेच येरवडा चे सहायक आयुक्त वैभव कडलक , येरवडा पोलिस निरिक्षक युनुस शेख यांचा सन्मान करण्यात आला .
नागरिकांनी या योजने चे खुप कौतुक व स्वागत केले आहे त्यांनी या कार्यक्रम ला भरपुर गर्दी केली होती.
दिपक म्हस्के यांनी  सुत्रसंचालन केले व अशोक कांबळे यांनी आभार मानले.