Chandrakant Patil Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत! | चंद्रकांतदादा पाटील यांचा सल्ला

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी शब्द जपून वापरावेत! |अन्यथा जनताच धडा शिकवेल

|चंद्रकांतदादा पाटील यांचा सल्ला

राज्यातील सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. त्यामुळे ते आता संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. मात्र, उद्धवजी आपल्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. आपण शब्द जपून वापरावेत, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, आमच्या नेत्यांवर टीका कराल, तर जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरील उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या राज्याच्या राजकारणात टीका करण्यासाठी काही नेते अगदी खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे हे संयमी नेते होते. मात्र, सत्ता हातून गेल्यापासून ते हताश झाले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवजी संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलावे. अन्यथा जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल. तसेच भाजपाच्या नेत्यांवर टीका कराल, तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sinhagad Fort | सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर

पुणे | सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा आणि परिसर संवर्धनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रादेशिक पर्यटन योजनेतून ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुरातत्व विभागातर्फे एप्रिलअखेर या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याचा विकास आराखड्याचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिंहगड किल्ल्याचा विकास करण्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी जिल्हातील प्राचीन मंदीरे, गड व किल्ले यांचा २०२३-२४ च्या जिल्हा विकास आराखड्यात प्राधान्याने समावेश करुन त्यांचे जतन व संवर्धन तसेच त्या ठिकाणी भाविक व पर्यटकांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासीत केले होते.

सिंहगड किल्ल्याचा संवर्धनाचा विषय महत्वाचा असल्याने २०२२-२३ मध्ये त्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनदेखील पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा निधी मजूर झालेला आहे.

*जिल्हा वार्षिक योजनेतून ३० कोटींची तरतूद*

जिल्हा वार्षीक योजनेमधुन यावर्षी ३० कोटी रुपये जिल्ह्यातील गड व किल्ले संवर्धनासाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा विकास आराखडा बनविण्याच्या सुचना पालकमंत्री पाटील यांनी राज्य पुरातत्व विभाग़ाच्या सहायक संचालकांना दिल्या आहेत. येत्या जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत या सर्व कामांना मंजुरी देवून ही कामे पुढील वर्षी मार्च अखेरीस पुर्णत्वास नेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

*जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा विकास*

जिल्ह्यातील प्राचीन वास्तू व गड किल्ला संवर्धनास, ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांच्या विकासास २०२३-२४ मध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजनही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या कामांकडे लक्ष दिले असून त्याचा आढावादेखील सातत्याने घेण्यात येत आहे.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापुर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) ता. शिरूर येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली. दोन्ही कामे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाखांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात करण्यात येत आहे. मौजे सदुंबरे ता. मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यासही मंजुरी देवून शासन मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास ६२ कोटी ९३ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

अष्टविनायक विकासाचा ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या मंजुरीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक विकास आराखडा सुधारीत करुन शासनास सादर करण्याचे काम करण्यात येत आहे. देशातील क्रांतिकारकांचे असिम त्यागाचे स्थान सर्वांना प्रेरणा व स्फुर्ती देणारे असावे आणि ते राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा केंद्र व्हावे यासाठी किमान २०० कोटींचा आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी दिली आहे.

——

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची कामे पुरातत्व विभागामार्फत करताना मूळ वास्तु व प्राचीन शैली यांच्याशी साधर्म्य असणारी कामे दिसतील याकडे लक्ष दिले जाईल. गड व किल्ले ही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिके असल्याने हा इतिहास जतन करुन ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच या कामांमुळे जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

– डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

0000

CIBIL Score | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 058 कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. 2021-22 या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात 47 टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

आजच्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आर्थिक परिषदेतदेखील हा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल, तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात वेगाने सुरु झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या देखील आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज – गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील, तसेच आत्महत्येचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा उल्लेख केला. तसेच अडीच वर्षे बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु झाल्याचे देखील सांगितले. गेल्या नऊ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना गती दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानाशी जुळवून घेण्यासाठी आणि प्रतिकूलता कमी करण्यासाठी नाबार्ड राबवित असलेल्या उपक्रमांसाठी त्यांनी नाबार्डचे कौतुकही केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

पाणंद रस्त्यांसाठीही तरतूद हवी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यात येत असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसाठीही शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते उपयुक्त ठरु शकेल. समृद्धी मार्ग शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे उभारण्यास चालना देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. सिबिलची आवश्यकता नाही, याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यावी, असेही ते म्हणाले. नवीन प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था तयार करण्याची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

स्टेट फोकस पेपर

नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांनी स्टेट फोकस पेपरची माहिती दिली. यात २०२३-२४ साठी कृषी क्षेत्राकरिता १ लाख ५६ हजार ८७३ कोटी (२४.७%), एसएमई साठी ३ लाख ५४ हजार ८५४ कोटी ( ५६%), अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी १ लाख २२ हजार ३३१ कोटी ( १९.३%) क्रेडिट क्षमता असल्याचे नमूद केले आहे.

राज्यात सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, कृषी मूल्य साखळ्या विकसित व्हाव्यात, कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक व्हावी, एकात्मिक शेतीला चालना द्यावी , ग्रामीण तरुणांना कृषी व पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, हवामानावर आधारित शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे बँकांनी देखील आपले जाळे अधिक व्यापक करावे, कृषी क्षेत्रात क्लस्टर फायनान्सिंग करावे, बचत गटांना अर्थसहाय करण्यासाठी कॉर्पोरेट धोरण आखावे, ग्रामीण सहकाराला बळकट करावे यासाठी पाऊले उचलावीत, असे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक श्री. रावत म्हणाले.

००००

Ready Reckoner | घर खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही | महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील | महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

| महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

| महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात.

यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये अशी विनंती राज्य शासनास करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.

APMC | कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे, मात्र निवडून येणाऱ्या अशा सदस्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा व अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे. राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील याबाबतचे विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करावे. निवडून आल्याच्या दिनांकानंतर बारा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया २७ मार्च २०२३ पासून सुरु केलेल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार ३ एप्रिल २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. तसेच प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १३ (१) मधील तरतुदीनुसार संबंधित बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात राहणारे १५ शेतकरी हे त्या बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृषि पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. सदर १५ शेतकन्यांपैकी ११ शेतकरी हे सहकारी संस्थेचा मतदार संघ व ४ शेतकरी हे ग्रामपंचायतीचा मतदार संघातून निवडले जाणार आहेत.

सहकारी संस्थेच्या मतदार संघात महिला प्रवर्गाकरीता २, इतर मागास प्रवर्गाकरीता १ आणि विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गाकरीता १ जागा राखीव आहे. तसेच ग्रामपंचायतीचा मतदार संघात अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती प्रवर्गाकरीता १ आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गाकरीता १ जागा राखीव आहे.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम २१ (३) मधील तरतुदीनुसार राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत मिळणेबाबतची विनंती प्राधिकरणाकडे होत असल्याने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७) मधील तरतुदी अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्राधिकरणाने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सुरळीतपणे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सदर आदेश दिले आहेत, असे प्राधिकरण सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांनी कळविले आहे.
0000

Government Schemes | सरकारच देणार आता सरकारी योजनांची माहिती! | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सरकारच देणार आता सरकारी योजनांची माहिती! 

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना

|  सातारा, छत्रपती संभाजीनगरला प्रायोगिक तत्वावर सुरू

       राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे.  सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून अद्यापपर्यंत शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना केले.
            या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, समाजकल्याणचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री वॉर रूमचे अधिकारी उपस्थित होते.
            प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत, हेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेरून शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रूपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. यानुसार सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त ३६ विभागामार्फत ७५ शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थींना देण्यात येणार आहे. यामध्ये आणखी योजना वाढविण्यात येणार आहेत. या जत्रेनुसार एप्रिल महिन्यात सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती, शासन निर्णय याबाबत पूर्वतयारी करावी.  योजनानिहाय लाभार्थी निवड, त्यांचे अर्ज भरून घेणे याबाबतही तयारी करावी. योजनांचा लाभ मे महिन्यामध्ये देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. श्रीवास्तव यांनी केल्या.
            लाभार्थींना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे. यामुळे या जत्रेत प्रत्येक विभागांनी आपल्या विविध योजनांबाबत माहितीही पुस्तक रूपाने प्रसिद्धीस देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
            जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत. सर्व नियोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून गावपातळीवरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत योजनांची माहिती ‘हर घर दस्तक’च्या रूपाने देता येणार आहे. यामध्ये सर्व यंत्रणांचा समावेश राहणार आहे. यासोबतच सीएससी सेवा सेंटर, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या पात्र लाभार्थींना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी असणार जनकल्याण कक्ष
            सर्व कार्यक्रमांची रूपरेषा, अंमलबजावणी, नियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे. विभागीय पातळीवर विभागीय जनकल्याण कक्ष, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावरही जनकल्याण कक्षांची स्थापना करून याद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थीला मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र
            विविध योजनांसाठी पात्र असणाऱ्या आणि लाभ घेणाऱ्या लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून लाभाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी पात्र लाभार्थींना योजना मंजुरीची पत्रे देण्याचा कार्यक्रम जिल्हावार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील सर्व विभागांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून लाभ देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहींची पूर्तता त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून शासन निर्णयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
            यावेळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले. मुख्यमंत्री वॉर रूमचे विद्यार्थी, आयआयटीचे विद्यार्थी या उपक्रमाला मदत करणार आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विभागांचे सचिवांनी यावेळी विविध सूचना केल्या. साताराचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी उपक्रमाबाबत सध्या करीत असलेल्या अंमलबजावणीची माहिती दिली.
००००

Punyabhushan | ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

 ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणेः- पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३  वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्कराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. सलग ३३ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.  स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले  स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे. यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या ३३  ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे. तर महामहिम माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी , मनोहर जोशी, खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर, पांडुरंगशास्त्री आठवले, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधु दंडवते, दि हिंदूचे संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सिताराम येचुरी, गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, महेश एलकुंचवार, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, नितीन गडकरी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. अमदजअली खान आणि पं. शिवकुमार शर्मा, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा यथोचित सन्मान केला आहे. सोबत पुण्यभूषण पुरस्कार विजेते डॉ मोहन आगाशे यांचा परीचय आणि फोटो तसेच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांचे शुभहस्ते यथोचित गौरव गौरव करण्यात येतो त्यांची नावाची यादी जोडली आहे

Hourly Basis Teacher | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

Categories
Breaking News Commerce Education Political social महाराष्ट्र

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय :

कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 वरुन रु.1 हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन रु. 1 हजार प्रति तास.

शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 वरुन रु.1 हजार प्रति तास.

तंत्र शिक्षण संचालनालय :

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1 हजार वरुन रु. 1 हजार 500 प्रति तास.

पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 वरुन रु. 1 हजार प्रति तास.

पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास.

कला संचालनालय :

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1 हजार 500 प्रति तास.

कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

Recruitment | सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

Categories
Breaking News Education Political social पुणे महाराष्ट्र

सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

| उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल – १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक – १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

Old pension strike | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

| कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००