Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर | येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर

| येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाने आतापासूनच आवश्यक तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४७ हजारापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी सविस्तर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची नियमावली, घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण ४७ हजार ३५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ याप्रमाणे ३३ हजार ५२८ मतदान कर्मचारी असतील. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यात येणाऱ्या ३ विधानसभा मतदारसंघात १ हजार ३३९ मतदान केंद्रांसाठी ५ हजार ३५६, पुणे २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ८ हजार ७२, बारामती २ हजार ५१६ मतदान केंद्रासाठी १० हजार ६४ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी १० हजार ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळसाठी १ हजार ६०७, पुणे २ हजार ४२२, बारामती ३ हजार १९ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ११ याप्रमाणे प्रत्येकी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याशिवाय चारही मतदारसंघ मिळून ३ हजार ७७३ कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. मतदानाच्यावेळी आवश्यकतेनुसार या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ४० टक्के महिला कर्मचारी असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे लोकसभा मतदारसंघ स्तरावर यादृच्छीकीकरण करून त्यांना मतदान केंद्रावर नेमण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची नीट माहिती करून द्यावी आणि निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0000

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 

Categories
Uncategorized

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल

 

Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे  कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप  गौरव बापट यांनी केला.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन  मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणूक | कसब्याची पुनरावृत्ती की भाजप वचपा काढणार?

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणूक | कसब्याची पुनरावृत्ती की भाजप वचपा काढणार?

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार कि एकतर्फी होणार, याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण काँग्रेसचा उमदेवार ठरत नव्हता. अखेर काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune) यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol BJP Pune) विरुद्ध रविंद्र धंगेकर ही लढत आता ठरली आहे. साहजिकच लोकांच्या मताप्रमाणे यात रंगत येणार आहे. कारण कसब्याचा अनुभव पाहता काँग्रेस तुल्यबळ ठरली होती. तर तीच जखम उराशी बाळगून भाजप दुप्पट बळ घेऊन या लढतीत उतरणार, हे आता निश्चित झाले आहे. (Pune Politics)
काँग्रेस ने लोकसभेसाठी नुकतेच 57 लोकांची उमेदवारी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 7 लोकांचा समावेश आहे. पुणे लोकसभेसाठी आमदार रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभेसाठी याआधीच भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता यात कोण बाजी मारणार, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे.
भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे या लढतीत रंगत येणार, हे जगजाहीरच आहे. ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी देखील मानली जात आहे. तसेच ही लढत सामान्य कार्यकर्त्यांची अशी देखील मानली जात आहे. काँग्रेस ने कसबा पोटनिवडणुकीत बाजी मारली होती, मात्र लोकसभा जिंकणं एवढं सोपं नाही. भाजपला देखील ते सोपे नाही. कारण दोन्ही उमेदवारांना अंतर्गत वादाचा फटका हा जाणवणारच आहे. कारण अंतर्गत नाराजी दोन्हीकडे आहे. कारण निष्ठावंतांवर अन्याय का? हा प्रश्न दोन्हीकडे विचारला जात आहे.
या सगळ्या गोष्टींचा सामना करत या दोन्ही उमेदवारांना पुढे जावे लागणार आहे. महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुकीची आखणी करणार आणि भाजप मागचा वचपा काढण्यासाठी कसे डावपेच आखणार? हे पाहणे या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.
—-

Pune Model code of Conduct | कर्मचाऱ्यांनो तुम्ही ‘आदर्श आचारसंहितेची’ ‘लढाई’ लढा; पण तुमच्या ‘शस्त्राने’!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Model code of Conduct | कर्मचाऱ्यांनो तुम्ही ‘आदर्श आचारसंहितेची’ ‘लढाई’ लढा; पण तुमच्या ‘शस्त्राने’!

| पदरमोड करून महापालिका कर्मचारी रंगवताहेत भिंती!

Pune Model Code of Conduct – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात  आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगान सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश महापालिका निवडणूक विभागाच्या (PMC Election Department) वतीने देण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करण्यासाठी महापालिके कडून कर्मचाऱ्यांना कुठलेही साहित्य पुरवण्यात आले नाही. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करून आम्हांला भिंती रंगवाव्या लागत आहेत. अशी खंत महापालिका कर्मचारी व्यक्त करत आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

भारत निवडणूक आयोगाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आचार संहिता लागू होण्याच्या कालावधीत जाहिरातींच्या प्रकाशना संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून एकत्रित सूचना निदर्शनास आणल्या आहेत. या सूचना सर्व सबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांना सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत कळविणेत आलेले आहे. त्यानुसार महापालिका  कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर / पेपर्स किंवा कटआऊट / होर्डिंग्ज / बंनर्स / झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती इत्यादी निवडणुका जाहीर झाल्या नंतर काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार आदर्श आचार संहितेचे पालन करण्याबाबत महापालिका निवडणूक विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी हे काम करत आहेत. मात्र हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुठलेही साहित्य पुरवण्यात आले नाही. शहरात बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर्स बॅनर लागले आहेत. तसेच भिंतीवर माजी नगरसेवकांनी सर्वत्र आपली नावे छापली आहेत. ही नावे काढण्यासाठी संबंधित भिंत नव्याने पेंट करावी करावी लागते. मात्र हे देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. कर्मचारी पदरमोड करून या भिंती रंगवत आहेत. मात्र आम्ही नेहमी कसा खर्च करणार, असा प्रश्न देखील कर्मचारी उपस्थित करत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून मात्र थंड प्रतिसाद देण्यात आला.
अनधिकृत फ्लेक्स, बॅनर काढणे ही नेहमीची कारवाई असते. यात नवीन काही नसते. यासाठी काही साहित्य लागत असेल तर क्षेत्रीय कार्यालय उपलब्ध करून देतातच. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पदरमोड करण्याची गरजच लागत नाही.
चेतना केरुरे, उपायुक्त, महापालिका निवडणूक कार्यालय. 

Pune Lok Sabha Election | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले

Categories
Breaking News social पुणे

Pune Lok Sabha Election | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले

 

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Pune Lok Sabha Election)

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ९६१, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २ हजार ५५२, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ७८५, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ४३१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७, ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ४८८, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५ हजार २८१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२ तर ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ८४९, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | Loksabha Election | … तरच पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी!

Pune Congress – (The Karbhari News Service) – एकेकाळी पुण्यावर एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी चालून आली आहे.गटबाजी विसरून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने झोकून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला तर काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार तर आहेच शिवाय विधानसभा, त्यापाठोपाठ होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये यशाचा मार्ग सुकर ठरणार आहे.त्यासाठी एकीची मोट बांधली तरच पुण्यावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. (Pune Loksabha Election)

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघापैकी एक महत्वाचा असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा होता.शहरावर काँग्रेसचे प्राबल्य होते.मात्र तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर आजतागायत काँग्रेस पक्ष या हक्काच्या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवू शकलेला नाही. कारण काँग्रेसला तीन वेळा पराभव स्वीकारावा लागलेला आहे.त्याची वेगवेगळी कारणे आहेत. असे असले तरी कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे काँग्रेसला हक्काची तीन लाख मते सातत्याने मिळत आली आहेत.

मुळात ज्यावेळी शहराचे नेतृत्व तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे होते, त्यावेळी कर्तृत्वान आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात असत. त्यामुळेच पक्ष हा मजबूत तर होताच शिवाय महापालिकेवर वर्चस्व होते. तेंव्हाची नगरसेवकांची संख्या आज कितीपर्यंत घसरली यावरूनच काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही अधोगती का लागली हेच स्पष्ट होत असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते आजही तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत.त्यामुळे काँग्रेस आजही जिवंत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा दिली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतील.त्यांचे ध्येय साध्य होईल.

कार्यकर्त्यांना जर मोठ्या पदावर जायचे असेल, प्रत्येकाला संधीची अपेक्षा असेल तर यंदाची लोकसभा निवडणूक त्यादृष्टीने खरी सुरुवात आहे. यात यशस्वी झाले तर आगामी काळात काँग्रेसला कुणीच रोखू शकणार नाही. इतकेच काय पुण्यातील ही यशस्वी सुरुवात देशभरात काँग्रेससाठी निश्चितच आदर्शवत ठरेल. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविताना लोकसभेसाठी उमेदवार निवडून आणणे हीच पदाधिकारी -कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.कार्यकर्ते -पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केले तर यश कसे मिळते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदिलाने काम केले तर यश हमखास आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना पत्र दिले. त्यातील उद्देश हाच आहे. काँग्रेसला पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज आहे.

आज भाजपने जर पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला तर आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. पण कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असेल तर त्यात गैर काय ? आज काँग्रेसची स्थिती काय हे सर्वश्रुत आहे मात्र कार्यकर्ते आजही नेटाने पक्षाचे कार्य करत आहेत. मग त्यांचा उत्साह आणखी कसा वाढवता येईल हे पाहणेही तितकेच महत्वाचे आहे.त्यानुसारच जाहीर सभेतून जनतेचा कौल घेऊनच लोकसभेचा उमेदवार ठरवा ही आबा बागुल यांची भूमिका रास्तच आहे. आबा बागुल स्वतः लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत मात्र जो कोण उमेदवार असेल याचा निर्णय जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौलनुसार घ्या. असाच बागुल यांच्या पत्राचा आशय आहे. त्यामुळे वर्चस्व गमावले असले तरी काँग्रेसचे शहरात अस्तित्व अबाधित आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने जाण्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी जितकी जमेची ठरणार आहे. त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे, अशीच भूमिका आबा बागुल यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चयाला ताकद दिली तर पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही.

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

| मराठा विरुद्ध ओबीसी लढत, पुण्यात काँग्रेसला विजयाची गॅरंटी

Pune Loksabha – Pune Congress – (The Karbhari News Service) – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना – राष्ट्रवादी पक्षांना ( गट) त्याची मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे.नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची नामी संधी काँग्रेसला आहे ;मात्र त्यासाठी ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यास ओबीसी वर्गासह मराठा समाजाची मते काँग्रेससाठी निर्णायक ठरतील. त्यातही काँग्रेस पक्षाने केलेल्या नव्या धोरणानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेला निष्ठावंत चेहरा दिला तर पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे चित्र पाहावयास मिळू शकते.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मराठा कार्ड खेळले असले तरी मराठा आरक्षण प्रश्नावरून मतांची विभागणी अटळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा ओबीसी उमेदवार देऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर ठरेल मात्र नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास मतांचे समीकरणही सहज साध्य आहे. त्यामुळे एकेकाळी पुण्याचा हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेल्या जुन्या निष्ठावंतांना संधी दिली तर काँग्रेसला विजयाची गॅरंटी निश्चित राहील. यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने एक महत्वाचे धोरण तयार केले आहे.

लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि विजय कसा मिळेल यासाठी हे धोरण आहे. त्यानुसार विजयाची खात्री असलेल्या नव्या व्यक्तींना यंदा प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. या धोरणानुसार एका व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत, की विद्यमान आमदारांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाणार नाही तसेच ज्यांनी आजवर लोकसभा,विधानसभा निवडणूक लढवली ;पण पराभव पत्करला आहे. त्यांनाही संधी देऊ नये असे हे धोरण आहे. त्यामुळे पुण्यात ओबीसी नवीन उमेदवार दिला तर काँग्रेसला विजय निश्चित आहे.

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!

| लोकसभेसाठी नवीन चेहरा शिवाय ओबीसी कार्ड चा देखील होणार विचार

Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service)  पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election) भाजप अर्थात महायुती कडून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी कडून ज्येष्ठ नेते आबा बागुल (Aba Bagul Congress) यांचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी कडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता बागूल हेच यासाठी पात्र ठरत आहेत. येत्या 18 मार्च ला हे नाव अंतिम केले जाईल. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Pune Loksabha Constituency)
पुणे लोकसभा निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. कारण भाजप कडून आपले पत्ते ओपन करण्यात आले असून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून योगेश मुळीक, सुनील देवधर यांची देखील नावे शर्यतीत होती. मात्र मोहोळ यांची लोकप्रियता आणि मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण उमेदवार राज्यसभेसाठी देण्यात आला असल्याने, मराठा उमेदवार म्हणून मोहोळ यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. आपला उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडी सावध पाऊल टाकत आहे. परंपरे प्रमाणे आघाडी कडून ही जागा काँग्रेस ला सोडण्यात येईल. त्यानुसार काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही जातीची समीकरणे निश्चित करूनच उमेदवार अंतिम करणार आहे.
लोकसभेसाठी काँग्रेस कडून शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते आबा बागुल आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. दिल्लीत या तीन नावावर चर्चा सुरु आहे. यातील अरविंद शिंदे हे मराठा उमेदवार आहेत. जातीची समीकरणे जोडायची झाली तर शिंदे यांचे नाव मागे पडून ओबीसी चेहरा पुढे केला जाऊ शकतो, असे मानण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडे सद्यस्थितीत पद देखील आहे. ओबीसी चेहरा असलेले बागुल आणि धंगेकर हे उरतात. काँग्रेसच्या एक नेता एक पद या नियमानुसार धंगेकर यांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आणि ओबीसी चेहरा म्हणून बागूल हेच पात्र ठरतात, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
शिवाय आमदार धंगेकर यांना उमेदवारी मिळाली भाजप आपली दुप्पट ताकद लावणार आहे. त्याला कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात धंगेकर यांनी बाजी मारली होती. तो पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. धंगेकर उमेदवार असतील तर भाजप त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काँग्रेस सावध पाऊले टाकत आहे.
बागूल हे पहिल्यापासूनच सॉफ्ट आणि काँग्रेसचा सभ्य चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवाय महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांचेच नाव लावून धरत आहेत. बागूल यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेस ला पुणे लोकसभेची जागा हमखास मिळू शकेल, असे काँग्रेस वरिष्ठाना देखील वाटते. त्यामुळे येत्या काही दिवसांत बागूल यांचे नाव जाहीर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.