Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

| हॉस्पिटल हलवण्याची मागणी

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.

शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Animal Hospital | हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत 30 वर्षाचा करार केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलाहोता. याला समितीने मंजुरी दिली आहे. मात्र आता हडपसर मधून या प्रकल्पांला विरोध वाढला आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/ प्राणी अपघाताने जखमी किवां इतर कारणाने जखमी/आजारी झालेली असतात. अशा जखमी आजारी प्राण्याविषयी नागरिक व  सभासद आरोग्य खात्याकडे तक्रारी करत असतात. तसेच शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/प्राण्याची अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे मनपाच्या कुत्रा बंदोबस्त गाड्यामधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी आणलेली कुत्री हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं.५६ येथे मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल /दवाखान्यामध्ये घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कुत्र्यांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या कुत्र्यांवर/प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी  दिली आहे. मात्र आता याचा विरोध सुरु झाला आहे.

कोर्टात दाद मागणार | योगेश ससाणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पांला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार
पुणे महनगरपालिका व मिशन पॉसिबल यांच्या संयुक्त विदयमाने आपण नुक्ताच मंजुर केलेला प्राण्यांच्या हॉस्पीटलचा प्रकल्प सुमारे ३२१७ चौ.मी. या जागेवर ( भटक्या व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटल साठी सुमारे ३० वर्षासाठी संयुक्त प्रकल्पाला देण्यासाठी जो निर्णय झाला आहे. त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सदर प्रकल्प महानगरपालिकेने हडपसर विधानसभा मतदान
क्षेत्राच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत करावा.
२०१७ ते २०२२ या कालावधी मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये केशवनगर, रामटेकडी, उरूळी देवाची इ. ठिकाणी सुमारे २२०० मेट्रिकटनाचे नविन कचरा प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाने बहुमताने मंजुर करून घेतला आहे. त्यात
प्राण्यांच्या हॉस्पीटलची भर नको. तरी माझी आपणास विनंती आहे की, सदर हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट क्र. ५६ चे एकूण क्षेत्र ३२९७ चौ. मी ही मोकळी जागा प्राण्यांचे ( भटक्या
व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटलसाठी ३० वर्ष कालावधीसाठी संयुक्त प्रकल्प रद्द करावा. अन्यथा या प्रकल्पा विरोधात मला कोर्टात दाद मागावी लागेल. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!

| भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त

पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत 30 वर्षाचा करार केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर येणाऱ्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/ प्राणी अपघाताने जखमी किवां इतर कारणाने जखमी/आजारी झालेली असतात. अशा जखमी आजारी प्राण्याविषयी नागरिक व  सभासद आरोग्य खात्याकडे तक्रारी करत असतात. तसेच शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/प्राण्याची अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे मनपाच्या कुत्रा बंदोबस्त गाड्यामधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी आणलेली कुत्री हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं.५६ येथे मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल /दवाखान्यामध्ये घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कुत्र्यांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या कुत्र्यांवर/प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७९ व पुणे महानगरपालिका मिळकत वाटप नियमावली २००८ मधील भाग १० (२३) अन्वये जाहीर प्रकटनामधील संयुक्त प्रकल्प प्रस्तावातील अटी व शर्तीच्या अधीन राहून हडपसर नगररचना क्र.२ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं .५६ क्षेत्र ३२१७ चौरस मीटर हि मोकळी जागा मिशन पॉसिबल या संस्थेस मूळ प्रस्तावातील बाबीस ३० वर्षे कालावधीसाठी संयुक्त प्रकल्पाद्वारे वापरण्यास देणेसाठी मान्यता मिळणेबाबतचे विषयपत्र स्थायी समितीमार्फत ममुख्य सभेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.

| या असतील अटी

•सदर जागेवर मिशन पॉसिबल संस्थेने पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेऊन स्वखर्चाने प्राण्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधण्यास.
•मिशन पॉसिबल संस्थेला मुदतवाढ न मिळाल्यास अथवा मनपाने काही कारणास्तव त्यांचा करारनामा मुदत पूर्व रद्द केल्यास त्यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचा
विनामोबदला व विनातक्रार हस्तांतर पुणे मनपास करण्यास व संस्थेच्या संचालकांचा सदर बांधकामावर हक्क/ ताबा न राहण्यास.
•मिशन पॉसिबल संस्थेने अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) ने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे अथवा अटी व शर्तीचे पालन करण्यास.
•पुणे महानगरपालिका हद्दीतील अपघातात जखमी झालेल्या भटक्या व मोकाट कुत्र्याचे औषध उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्याची जबाबदारी मिशन पॉसिबल या
संस्थेची राहण्यास.
•मिशन पॉसिबल संस्थेने प्राण्यांचे उपचार करण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, औषधे तातपुरते स्वरूपाचे इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः पुरविण्यास.
• सदर जागेची सुरक्षा करण्याची जबाबदारी मिशन पॉसिबल संस्थेची राहण्यास.
• मिशन पॉसिबल संस्थेने जखमी/आजारी प्राण्यांना सेवा देण्याच्या दृष्टीने २४X७ तत्वावर हॉस्पिटलचे कामकाज तसेच अॅम्ब्यूलन्स सर्व्हिस पुरविण्यास.
•भटक्या – मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया, औषधोपचार, अँटीरेबीज लसीकरण, सेवकवर्गचा पगार व इतर भत्ते तसेच जागेवर वीज, पाणी पुरवठा व इतर खर्च या साठी मनपास
कोणतेही आर्थिक तोषीस न लागता पूर्ण खर्च करण्याची जबाबदारी संस्थेची राहण्यास.
•करारनामा कालावधीत सदर ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक उत्पन्न न घेण्यास व तसे आढळून आल्यास मिशन पॉसिबल या संस्थेबरोबर केलेला करारनामा रद्द करण्यास.
•मिशन पॉसिबल या संस्थेच्या कामावर आरोग्य खात्याचे नियंत्रण राहण्यास.
•सदर मिशन पॉसिबल संस्थेच्या कामकाजा विषयी काही तक्रार अथवा कायदेशीर बाब उद्भवल्यास त्याचे निवारण करण्याची जबाबदारी मिशन पॉसिबल संस्थेची राहण्यास.

Changes in transport | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ ते २८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – २३ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – २६ व २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- २७ जून रोजी रात्री ११ वाजता ते २८ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- २५ ते २८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- २६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- २७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- २८ जून रोजी पहाटे २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- ३० जून व १ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगांव केतकी ते इंदापूर ( इंदापूर मुक्काम) २ जुलै रोजी पहाटे ते रात्री १० वाजेपर्यंत निमगांव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.

इंदापूर- ३ जुलै रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलूज- बावडा- नातेपुते- बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- ४ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत व ५ जुलै रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

PMPML Bus | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे

 पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’ कडून जादा बसेसचे नियोजन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे.

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 18/06/2022 पासून दिनांक 22/06/2022 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण 130 बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक 21/06/2022 रोजी रात्रौ 12:00 वा. पर्यंत आळंदी
करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 22 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 10 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.

दिनांक 22/06/2022 रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 03:00 वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी 05:30 वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्याm सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40 आवश्यक) देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक 24/06/2022 रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी 12:00 ते 1:00 दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.

तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Department of Property and Management : PMC : महापालिकेने हडपसर मधील 36 गाळे घेतले ताब्यात 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेने हडपसर मधील 36 गाळे घेतले ताब्यात

: थकबाकी न भरल्याने महापालिकेची कारवाई

पुणे : महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाने हडपसर बंटर स्कुल येथील 36 गाळे ताब्यात घेतले आहेत. संबंधित गाळा धारकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून थकबाकी भरलेली नव्हती. त्यामुळे विभागाने ही कारवाई केली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार पणे सुरु आहे. सोबतच आता मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. विभागाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. विभागाने महापालिका मिळकत वाटप नियमावली नुसार जागा आणि गाळे भाडे तत्वावर दिले आहेत. मात्र याचे नाममात्र भाडे असताना देखील संबंधित गाळे धारक महापालिकेचे शुल्क अदा करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे विभागाकडून या लोकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही या लोकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
हडपसर बंटर स्कुल परिसरातील 36 गाळे धारकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून थकबाकी भरलेली नाही. 25 लाखाच्या आसपास ही थकबाकी होती. त्यामुळे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी हे गाळे ताब्यात घेतले. अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.

PMC: Garbage project: GB meeting: आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!

Categories
PMC Political पुणे

आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!

: राष्ट्रवादीचे नगरसेवक मुख्य सभेत आक्रमक

पुणे: शहरात कचर्‍याचे सर्व प्रकल्प हडपसर भागात नको, असे म्हणत गुरुवारच्या मुख्य सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पहिल्यांदा हडपसरला का केलानाही, पेठांमध्ये कचर्‍याचा प्रकल्प का केला जात नाही अशा आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्याने होणार्‍या सॅनटरी वेस्ट डिसपोजल प्रकल्पाला विरोध करण्यात आला. त्यामुळे याप्रस्तावावर मतदान घेण्यात आले. उपसुचनेसह 72 विरुध्द 26 मतांना या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

: काँग्रेस राहिली तटस्थ; मात्र अरविंद शिंदेंचे मतदान

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडुन हडपसर याठिकाणी सॅनटरी वेस्ट शास्त्रोक्त पध्दतीन विल्हेवाट लावण्याकरत एका कंपनीकडुन प्रकल्प करण्यात येणार आहे. ही कंपनी 25 कोटी रुपये खर्च करुन याठिकाणी यंत्रसामग्री उभारण्यात येणार आहे.पहिल्या तीन वर्ष हा प्रकल्पासाठी कोणतेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार नाहीत. तीन वर्षानंतर महापालिकेला पैसे द्यावे लागतील. यानंतर मुदत वाढीचा निर्णय महापालिका आयुक्त करणार होते. मात्र याप्रस्तावाला उपसुचना देण्यात आली. तीन वर्षानंतर मुदतवाढीसाठी स्थायी समितीचीमंजूरी घेवून सर्वसाधारण सभेची मान्यता घावी अशी उपसुचसह प्रस्ताव मान्य करण्यात आला.
कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एक प्रकल्प हडपसर भागात होणार आहे. याप्रकल्पाला हडपसर भागातील नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. याविषयी नगरसेविका वैशाली बनकर म्हणाल्या, महापालिका प्रशासनाला वार्तानकूलित कार्यालयात बसून हडपसरभागातील नागरिकांचे प्रश्‍न कळणार नाहीत. प्रत्येकवेळी शास्त्रोक्त पध्दतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुणे शहराचा संपुर्ण कचरा हडपसर भागात जिरवला जात आहे. आमच्याकडे ज्याप्रमाणे कचरा पाठवता त्याप्रमाणे मेट्रो सुध्दा पहिल्यांदा हडपसर भागात का केली नाही. महापालिका प्रशासन केवळ दिखावू पणा करत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पाहणीच्यावेळी केवळ दिखावा करण्यात येतो असे बनकर म्हणाल्या. महापौर मुरलीधर मोहळ यांनी यावर आक्षेप घेतला. महापालिका प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक आपण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

 राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्यामुळे प्रस्ताव 72 विरुध्द 26 मतांनी मान्य झाला. याप्रस्तावावर काँग्रेसने तटस्थ भुमिका घेतली. काँग्रेस ची ही भूमिका असली तरी मात्र नगरसेवक अरविंद शिंदे यांनी एकट्याने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांच्या भूमिके विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Pune : Hadapsar : पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

 गेल्या तीन तासात कोणालाही बिबट्या आढळून आलेला नाही

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण झाली आहे.

संभाजी बबन आतोडे (रा. गोसावी वस्ती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. संभाजी आटोळे व त्याचा मित्र अमोल लोंढे हे दोघे आज पहाटे साडेपाच वाजता मार्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने  डाव्या बाजूने संभाजी आतोडे यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याच्या पंजाचा फटका बसल्याने त्यात संभाजी आतोडे यांचा डावा हात रक्ताने माखला होता. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या पळून गेला. आटोळे यांना सुरुवातीला जवळच्या यश हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती समजताच हडपसर पोलीस, अग्निशमन दल आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या हल्ल्यानंतर गेल्या तीन तासात कोणालाही बिबट्या आढळून आलेला नाही.