Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Commerce cultural Political social पुणे महाराष्ट्र

राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प

|  उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

| ५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

 

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी आहे. महसूली तूट १६ हजार ११२ कोटी तर राजकोषीय तूट ९५ हजार पाचशे कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

यावेळी वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्पात ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी २९ हजार १६३ कोटी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी ४३ हजार ३६ कोटी तरतूद आहे. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी ५३ हजार ५८ कोटी ५५ लाख तरतूद, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा यासाठी ११ हजार ६५८ कोटी, तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी १३ हजार ४३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

शेतकरी कल्याणासाठी शेतीच्या विकासासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासन राज्यातील १ कोटी १५ लाख कुटुंबांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ राबवणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्यामार्फत 12,000 रुपयांचा सन्माननिधी प्रतिवर्षी मिळणार आहे, त्यासाठी २०२३-२४ मध्ये ६ हजार ९०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीक विमा

या योजनेत आधी विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होती, त्यात आता सुधारणा करण्यात येत असून आता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही. राज्य सरकार शेतक-यांचा हप्ता भरणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 3 हजार 312 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महा कृषी विकास अभियान

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महा कृषी विकास अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये पीक, फळ पीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी पाच वर्षांत 3 हजार कोटी रुपये शासन उपलब्ध करून देईल.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात आला असून आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर उपलब्ध होणार आहेत. या योजनेवर शासन एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना

200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डची निर्मिती करण्यात आली असून काजू बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजू बोंडाला सात पट अधिक भाव आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबविणार असून त्यासाठी येत्या 5 वर्षांसाठी 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असून आता दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळेल. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्री अन्न अभियान’ राबविण्यात येणार आहे,त्यासाठी 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असून सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

नागपूर येथे कृषी सुविधा केंद्र, विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र

नागपूरमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा त्याचा उद्देश आहे. या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये देणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी व बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी 20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार बँक खात्यात प्रतिवर्ष, प्रति शेतकरी 1800 रुपये देण्यात येणार आहे.

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा-भोजन

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महिलांसाठी विविध सुविधा

‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येणार असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये, पहिलीत चार हजार रुपये, सहावीत 6 हजार रुपये, तर अकरावीत 8 हजार रुपये या टप्प्याने मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.

नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा वाढवून २५ हजार रूपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत असणार आहे. तसेच शासन लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. त्यासोबतच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल.

‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येईल.

या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिल्या जातील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी आवास घरकुल योजना

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’सुरु करण्यात येईल. यासाठी येत्या तीन वर्षात 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील. यापैकी या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार असून त्यासाठी 3600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 4 लाख घरे बांधण्यात येणार असून त्यातील 2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमातीसाठी, तर 1.5 लाख इतर प्रवर्गासाठी असतील. रमाई आवास योजनेत 1.5 लाख घरांसाठी 1800 कोटी रुपयाची तरतूद असून यातील किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी असतील. शबरी, पारधी, आदिम आवास अंतर्गत 1 लाख घरे 1200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येतील.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती अंतर्गत 50,000 घरांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी, तर धनगर समाजासाठी 25 हजार घरे असतील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद असून यामध्ये आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिव चरित्रावरील उद्यानासाठी 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल. शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वत:च्या कर महसूलाचा सुधारित अंदाज रूपये दोन लाख ७५ हजार ७८६ कोटी आहे. यामध्ये वस्तू व सेवाकर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क या करांचा वाटा दोन लाख ४३ हजार ४११ कोटी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्याचे स्वत:च्या कर महसूलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट रूपये दोन लाख ९८ हजार १८१ कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या विविध आर्थिक उपाययोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल,असे श्री.फडणवीस म्हणाले.

व्यवसाय कर अधिनियमामध्ये ‘दिव्यांग व्यक्तीची’ व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारणेमुळे व्यवसाय कर सुटीसाठी पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल. तसेच व्यवसाय करातून सूट देण्याची प्रक्रिया सोपी होईल. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रांत विमान चालन चक्की इंधनावरील (ATF) मूल्यवर्धित कराचा दर मूल्यवर्धित २५ टक्के वरून बंगळूर व गोव्याच्या समकक्ष १८ टक्के करण्याचे प्रस्तावित केले आहे.

वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क योजना यांच्या थकबाकीची तडजोड योजना – २०२३’ ही अभय योजना जाहीर करण्यात आली असून या अभय योजनेचा कालावधी दिनांक ०१ मे, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ असेल. दिनांक ०१ मे, २०२३ रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील. वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठीची, व्यापाऱ्याची थकबाकी रुपये दोन लाखांपर्यंत असल्यास, ही रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे एक लाख प्रकरणांत होईल. कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्यांची थकबाकी रुपये ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेस माफी देण्यात येईल. लहान व मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ अंदाजे ऐंशी हजार प्रकरणांत होईल, असे वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

CM Eknath Shinde | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत” महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब,शेतकरी, महिला यांना न्याय देतांना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल .

समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*शेतीसाठी भरीव तरतूद*

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.

*महिलांचे सक्षमीकरण होणार*

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*दुर्लक्षित घटकांना न्याय*

अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय देण्यात आला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय वाढविणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांनाआदर्श बनविण्याचा निर्णय, ही महत्वाचा आहे.

*सर्वांसाठी घरे*

यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची “मोदी आवास घरकुल योजना” सुरु केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल.

*पायाभूत सुविधांनी राज्यात बदल*

राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*रोजगारक्षम युवा शक्ती*

उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे , आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होईल, अशीही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

*मुंबईचा सर्वांगीण विकास*

मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे यांच्या स्मारकाला त्याचप्रमाणे राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येंत आहे.

*पर्यटनाला देखील चालना*

श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करतांना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कर, व्याज, शास्ती, व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना व्यावसायिकांना दिलासा देणारी असेल असे सांगितले.

Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Categories
Breaking News social महाराष्ट्र शेती

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत

MLA Sunil Kamble | मातंग समाजाच्या मागण्याबाबत आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशनात वेधले लक्ष

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

मातंग समाजाच्या मागण्याबाबत आमदार सुनील कांबळे यांनी अधिवेशनात वेधले लक्ष

मातंग समाजाच्या समस्यांविषयी ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेच्या सभागृहात सरकारचे लक्ष वेधले. मातंग समाजाचे मागण्या मांडताना आमदार सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन मंत्री अनिल राठोड यांनी सभागृहात दिले.
आमदार कांबळे यांनी हे प्रश्न मांडले
मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात वास्तव्यास आहे. या समाजातील बहुतांशी नागरिक भूमीहीन असून, मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहे. उच्च शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील युवकांची संख्या अत्यंत कमी आहे. शासनाने मातंग समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीची उपाययोजना केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या 341 या कलमांतर्गत राष्ट्रपतीच्या मान्यतेने राज्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीची यादी निश्चित करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जातीचा’ समावेश आहे त्यापैकी काही जाती त्या सुशिक्षित आहेत तर काही जाती या अत्यंत मागासलेल्या आहे त्यामुळे मागास जातीच्या उन्नतीसाठी सदर जातीचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबत विधानमंडळात एकमताने ठराव करून सदर जातीचे वर्गीकरण करण्यासाठी शासनामार्फत केंद्र सरकारला सदर ठराव पाठवावा. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा विचार करून यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्या साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा. आदय क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी (जि. पुणे) येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून आज पर्यंत विलंब होत आहे सदर स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावावे मुंबई विद्यापिठास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी शासनाने मंजुरी दयावी. गंजपेठ पुणे येथील देशातील पहिली व्यायाम शाळा सुरू करून तेथे अनेक क्रांतिकारक घडविणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्या क्रांती शाळेस लहुजी वस्ताद साळवे याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, तसेच लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग त्वरित कार्यान्वित करुन त्यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्ज प्रकरण त्वरित सुरु करावी.
या लक्षवेधीवर उत्तर देताना मंत्री अनिल राठोड यांनी या सर्व विषयांच्या बाबतीत लवकरात लवकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समावेत बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे उत्तर सभागृहात दिले.

Answer sheet Check | उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार | मुख्य नियामक हिंदी विषयाची संयुक्त सभा रद्द

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

| मुख्य नियामक हिंदी विषयाची संयुक्त सभा रद्द

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या मागण्या जैसे थे असल्याने, त्यांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी हिंदीच्या उत्तरपत्रिका तापसणीवर मुख्य नियामकांनी (चिफ मॉडरेटर) बहिष्कार घातला असून, यापुढील विषयांच्या उत्तरपत्रिकाही न तपासण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी मांडली.

संयुक्त सभेवर बहिष्कार

महासंघाच्या पुणे विभागाच्या वतीने शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन बुधवारी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधकाऱ्यांनी व हिंदी विषयाच्या मुख्य नियामक यांनी संयुक्त सभेवर बहिष्कार टाकला. व अतिशय सनदशीर मार्गाने तसे निवेदन राज्य मंडळाच्या सचिव  अनुराधा ओक व सह सचिव प्रिया शिंदे यांना देण्यात आले.त्यामुळे आजची हिंदी विषयाची मुख्य नियामकांची सभा रद्द करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाही; तसेच संयुक्त सभेवरही बहिष्कार घालण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे यापुढील सभा ही आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत युक्त सभेबाबत निर्णय होणार नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद कांबळे ( हिंदी विषय तज्ञ), पुणे शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर तुकाराम साळुंखे माननीय पडवळ सर माननीय शहापुरे सर प्राध्यापक राहुल गोलांडे. हिंदी संघाचे सचिव प्राध्यापक रेवदनाथ कर्डिले खजिनदार आनंद काशीकर ,कोल्हापूर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व नऊ विभागातून आलेले हिंदी विषयाचे सी.एम तसेच विषय तज्ञ म्हणून डॉक्टर नेहा बोरसे व डॉक्टर दीप्ती सावंत, हिंदी अध्यापक संघटनेचे व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Swearing in Ceremony | पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार बोलले ..! काय म्हणाले जाणून घ्या

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार बोलले ..! काय म्हणाले जाणून घ्या

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आहे. या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र ते असत्य असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता आज त्यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला होता. तसंच या सगळ्याची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही शपथ घेणार हे माहित होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या सगळ्यावर विचारलं असता शरद पवारांनी मात्र देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत असल्याचं म्हटलं. मात्र आता पहाटेचा शपथविधी झाल्यामुळे एकच चांगलं झालं राष्ट्रपती राजवट उठली असं त्यांनी म्हटलं आहे.

Breaking News | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का | ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी  हा मोठा धक्काच आहे.

शिवेसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे  यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती.  या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली.  यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे.  काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.

Festival | Sound Limits | सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे |  जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत.

केंद्र शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे नियम निश्चित केलेले आहेत. श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. १९ फेब्रुवारी शिवजयंती, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २३, २४, २६ व २७ सप्टेंबर गणपती उत्सव, २८ सप्टेंबर ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी, २३ व २४ ऑक्टोबर नवरात्री उत्सव, १२ नोव्हेंबर दिपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस (नाताळ सण), ३१ डिसेंबर वर्षअखेर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार उर्वरित २ दिवस परवानगी देण्यात येईल. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा, क्षेत्राप्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
000

Kasba by-election | पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी | औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी

| औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

पुणे | २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे.

*कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी*

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

*मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी किंवा कमीत कमी दोन तासांची सवलत*

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खवरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000

Cabinet decisions | आजच्या बैठकीतील एकूण ७ मंत्रिमंडळ निर्णय जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce cultural Education Political social पुणे महाराष्ट्र

आजच्या बैठकीतील एकूण ७ मंत्रिमंडळ निर्णय जाणून घ्या

 

शालेय शिक्षण विभाग

राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल.
पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.
या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान.
या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार

राज्यात 10 वी व 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला.

या अभियानात राज्याचा “नोडल अधिकारी” म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच “समन्वयक अधिकारी” म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच “कॉपीमुक्त अभियान”राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे ठरले.
जनजागृती मोहिम- शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे. माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे यातून जनजागृती करण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्त- याशिवाय पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत. 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत.

प्रारंभी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण केले.

—–०—–

अन्न व नागरी पुरवठा विभाग

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम
१ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता

राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.
या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.
मागील म्हणजे २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. या पूर्वीच्या खरीप हंमागामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.
—–०—–
सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्याचा त्याचप्रमाणे मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतील. या प्राधिकरणात भाप्रसे दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सह संचालक दर्जाचा जनरल मॅनेंजर, सह सचिव दर्जाचा जनरल मॅनेंजर, उपसंचालक दर्जाचे असिस्टंट जनरल मॅनेंजर (तांत्रिक) तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण १४ पदे असतील.
प्राधिकरणाच्या स्तरावर कंत्राटी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी देखील नेमण्यात येतील. ज्या बाबींची खरेदी करायची आहे त्याला एकत्रितरित्या प्रशासकीय विभागाच्या स्तरावर मान्यता देण्यात येऊन निधी उपलब्धतेनुसार खरेदी करण्यात येईल व संबंधित आरोग्य संस्थांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येईल. हे प्राधिकरण सुरु करण्यासाठी ६५ कोटी १९ लाख ५८ हजार इतका खर्च अपेक्षित आहे.
—–०—–
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

तंत्रशास्त्र तसेच तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरू निवड पद्धतीत सुधारणा

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे येथील महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार या विद्यापीठांच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायानुसार विविध अकृषी विद्यापीठांमधील कुलगुरु पदांच्या निवडीच्या पद्धतीत यापूर्वीच बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार लोणेरे आणि पुणे येथील तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडपद्धतीत सुधारणा करण्यात येईल.
—–०—–
जलसंपदा विभाग

पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्यासाठी सुमारे ७८७ कोटी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे वाशिम तालुक्यातील ५ हजार ५५४ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे एकूण ७६९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता ३३.२७ दलघमी इतकी असून २६.३४ दलघमी इतका उपयुक्त पाणी साठा आहे.
—–०—–

विविध विकास आराखड्यांचा आढावा

पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्यांचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
—–०—–

राज्यपालांचा अभिनंदन ठराव

राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा ठराव मांडला. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करण्यात आले.
—–०—–