cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

| ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations)

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.

PMC Recruitment Exam Results | अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी

Categories
Breaking News PMC पुणे

अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी

जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात आल्या. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला झाल्या. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या सदर यादीमधील उमेदवारांनी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे. इथापे यांनी सांगितले कि उमेदवारांनी कुठली कागदपत्रे घेऊन यायचे आहे. हे देखील वेबसाईट च्या माध्यमातून कळवले जाईल.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

 

PMC Pune | राजेंद्र मुठे यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे 

Categories
Breaking News PMC पुणे

राजेंद्र मुठे यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे

पुणे | महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आलेले उपायुक्त राजेंद्र मुठे यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
राजेंद्र मुठे यांची बदली विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार आता इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मुठे हे मालमत्ता व्यवस्थापन विभाग, दक्षता विभाग आणि उपायुक्त (विशेष) या विभागाचे कामकाज पाहत होते. हा पदभार दोन अधिकाऱ्यांना विभागून देण्यात आला आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख अजित देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. तर दक्षता विभाग आणि उपायुक्त (विशेष) या विभागाचा अतिरिक्त पदभार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Traffic in pune | PMC Pune | वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी |अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

Categories
Breaking News PMC social पुणे

वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी

|अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पुणेकर नागरिक अडकून पडत आहेतच. यामुळे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे.  अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

 

Suspension | PMC Pune | महापालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवणारा कनिष्ठ अभियंता निलंबित  | सामान्य प्रशासन विभागाची कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवणारा कनिष्ठ अभियंता निलंबित

| सामान्य प्रशासन विभागाची कारवाई

पुणे | सूरज पवार,  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून तूर्तातूर्त निलंबित करणेत आले आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेत पवार हे उमेदवारांना नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत होते. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
इथापे यांच्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील  सुरज पवार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा या ठिकाणी कार्यरत आहेत.  पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. सदर भरती प्रक्रीयेमधील उमेदवार यांना पवार हे पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे प्रलोभन दाखवून विविध उमेदवारांकडून पैश्यांची मागणी करीत आहे, असे निदर्शनास आले आहे. हे  कृत्य हे वर्तणूक नियमाचे भंग करणारे व पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारे असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ५६ (२) (फ) अन्वये  सुरज पवार, हुद्दा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा यांना दिनांक १९/१०/२०२२ पासून पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून  अटी व शर्तीच्या अधिन राहून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान पवार त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. त्यामुळे पवार यांना निम्नस्वाक्षरीकर्ता यांचे पूर्व परवानगीशिवाय पुणे महानगरपालिका क्षेत्र सोडता येणार नाही. खातेनिहाय चौकशी करणेची कार्यवाही सहाय्यक आयुक्त, सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांनी तात्काळ सुरु करावयाची आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. असे आदेश ही इथापे यांनी दिले आहेत.
—-
 अशा गैरकृत्य करणाऱ्यांना बळी पडू नये. अन्यथा सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आवाहन आहे.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग 

Show cause notice | महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

| वेळेचे उल्लंघन केल्याने प्रशासनाकडून कारवाई

पुणे | पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने  157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. वेळेचे उल्लंघन केल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. तसेच आगामी काळात ही कारवाई कडक करण्यात येणार असल्याचे संकेत देखील उपायुक्त इथापे यांनी दिले आहेत. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसापूर्वी एक सर्क्युलर जारी करत वेळेचे पालन आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत महापालिकेत न आलेल्या कर्मचाऱ्यांना गेटवर अडवतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यासाठी सामान्य प्रशासन आणि सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. त्यानुसार याबाबत कर्मचाऱ्यांना दोन दिवसात खुलासा करावा लागणार आहे. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच गोष्टी कायदेशीर केल्या जाव्यात अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
महापालिकेतील बरेच कर्मचारी वेळेचे पालन करताना दिसत नाहीत. तसेच कार्यालयीन वेळेतही इतरत्र फिरताना आढळतात. याचा कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळातही कारवाई जारी राहणार आहे. सलग तीन वेळा वेळेचे पालन नाही केले तर एक रजा (CL) रद्द करण्यात येईल. असेच 7 वेळा झाल्यास दिवसाचा पगार कापला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करावे.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा 

PMC Pune Recruitment Update | पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच! | महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच!

| महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी

पुणे : महापालिकेत पदभरती करण्यावर राज्य सरकार कडून निर्बंध लागू करण्यात आले होते. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने 2 जून 2015 पासून हे निर्बंध लागू केले होते.  त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर जाणवत होता. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरु केली होती. पहिल्या टप्प्यातील भरतीची परीक्षा लवकरच होणार आहे. सोबतच प्रशासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीची देखील पूर्व तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन यांनी महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करणेसाठी संवर्गनिहाय बिंदुनामावली नोंदवह्या तपासून घेणे गरजेचे आहे . तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विवध विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार आपले विभागासाठी संवर्गनिहाय सरळसेवेने भरती करावयाच्या पदांबाबत पुढीलप्रमाणे विहित नमुन्यात माहिती asthapanainfo@gmail.com या इमेलवर सॉफ्ट कॉपी (Excel File Font – Arial ms Unicode font Size – 12 मध्ये ) तसेच उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे हार्ड कॉपीमध्ये या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून त्वरित सादर करावी. आदेशात पुढे म्हटले आहे कि, आकृतीबंधानुसार सरळ सेवेने भरावयाच्या पदांची नावे, आकृतीबंधानुसार पदांची संख्या, आकृतीबंधानुसार कार्यरत पदसंख्या, रिक्त पदसंख्या आणि रिक्त पदाबाबत प्राधान्य, अशी माहिती सादर करावे, असे देखील सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पूर्वतयारी म्हणून दुसऱ्या टप्प्यात भरती करण्यासाठी आम्ही विविध खात्याकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.

सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा.

PMC Recruitment Update News | महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल

| महापालिका प्रशासनाची माहिती

पुणे |  पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये 1. सहायक विधी अधिकारी  (श्रेणी 2) पदा साठी 690 अर्ज आले आहेत. लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) साठी 63948 अर्ज दाखल झाले आहेत.  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) साठी 17361,  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) साठी 2146,  कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3)  साठी 25 तर  सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) साठी 3201 असे एकूण 87 हजार 471 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेकडे सगळे अर्ज एकत्रित झाल्यानंतर आता परीक्षेचे केंद्र ठरवले जातील. त्यानंतर परीक्षेची तारीख ठरेल. उमेदवारांना ही माहिती लवकरच दिली जाईल. असे ही उपायुक्त इथापे यांनी सांगितले.

PMC Recruitment News Update | पुणे महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 26 हजार 420 अर्ज दाखल  | महापालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळेना 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 26 हजार 420 अर्ज दाखल

| महापालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळेना

पुणे |  पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण आतापर्यंत महापालिकेकडे फक्त 26 हजार 420 अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 32 हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 26 हजार 420 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत. 10 ऑगस्ट पर्यंत अजून जास्त अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.

– 10 ऑगस्ट पर्यंत मुदत

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की जाहिरात क्र.१/३९८ नुसार र्ग-२ मधील ४ पदे व वर्ग-३ दि.२०/०७/२०२२ पासुन हे उमेदवारांनी मधील ४४४ पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत आहे. इच्छुक
https://pmc.gov.in/mr/recruitments या संकेतस्थळावर दि.१०/०८/२०२२ रोजीचे २३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क,
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

 

| महापालिकेने केले आहे आवाहन 

मात्र याबाबत काही दलाल किंवा अपरिचित व्यक्ती अफवा पसरवून आर्थिक देवाण घेवाण करत राहतात. त्यामुळे अशा दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित/ अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये, अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जाहीर आवाहन महापालिकेने केले आहे.

Marathi Language Officer : मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”! 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”!

: सरकारच्या भाषा समितीचा दौरा पाहून तात्काळ नेमला मराठी भाषा अधिकारी

पुणे :  पुणे महानगरपालिकेचे कार्यालयीन कामकाज हे प्राधान्याने मराठी या भाषेत चालते. तसेच राज्य सरकारने देखील मराठी भाषेला प्राधान्य देण्यास सांगितले आहे. मात्र मराठी भाषेच्या वापर आणि प्रसाराबाबत महापालिका तेवढी गंभीर दिसून येत नाही. भाषेच्या संवर्धनाबाबत महापालिकेने मराठी भाषा अधिकारीच अजूनपर्यंत नेमला नव्हता. मात्र आता महापालिकेला उशिरा जाग आली आहे. राज्य विधान मंडळाच्या मराठी भाषा समितीचा अभ्यास दौरा महापालिकेत येत आहे. समितीने महापालिकेला विचारणा केली आहे कि आपल्याकडे मराठी भाषा अधिकारी नेमला आहे का? समितीच्या विचारणे नंतर महापालिकेने तात्काळ मराठी भाषा अधिकारी नेमला आहे. याची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र पालिकेच्या या कारभाराला उशिरा सुचलेले शहाणपण असेच म्हटले जात आहे.

पुणे महानगरपालिकेत खात्यांतर्गत पत्रव्यवहार, नागरिकांसोबतचा पत्रव्यवहार, दैनंदिन कामकाज हे मुख्यत: मराठी भाषेतच आहे. पुणे महानगरपालिकेत मराठी भाषेचे जतन, प्रचार व प्रसार यासाठी उपक्रम/कार्यक्रम राबविणे, मराठी भाषा संवर्धनासाठी महानगरपालिका स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारने देखील आदेश पारित केले होते. त्यानुसार या कामासाठी महापालिकेकडे मराठी भाषा अधिकारी असणे आवश्यक होते. मात्र महापालिकेत असा अधिकारीच नेमण्यात आलेला नव्हता. मात्र आता महापालिकेला उशिरा जाग आली आहे. पुणे महापालिका कार्यालयामधील कामकाजामध्ये करण्यात येणारा मराठी भाषेचा वापर, मराठी भाषेचा प्रसार व विकास करण्याकरिता महापालिका स्तरावरून राबवण्यात येणारे उपक्रम तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना याबाबत राज्य विधान मंडळाच्या मराठी भाषा समितीचा दौरा महापालिकेत येत आहे. त्या अनुषंगाने समितीने विचारणा केली आहे कि महापालिकेत मराठी भाषा अधिकारी आहे का? मात्र असा अधिकारी महापालिकेने नियुक्त केलेला नाही. त्यानंतर तात्काळ महापालिकेने मराठी भाषा अधिकारी नियुक्त केला आहे. सद्य स्थितीत महापालिकेत मराठी भाषा संवर्धन समिती अस्तित्वात आहे. यानुसार थोडे फार कामकाज चालते. मात्र स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आलेला नव्हता. तो आता नेमण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

 आशा राऊत, उप आयुक्त (मध्यवर्ती भांडार विभाग) यांची अधिनियमातील तरतुदीनुसार ‘मराठी भाषा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(अ) कार्यालयामध्ये शासकीय प्रयोजनांसाठी मराठीचा वापर करत नसल्यासंबंधीची व या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी होत नसल्यासंबंधीची गाऱ्हाणी  किंवा तक्रारी स्विकारणे व त्यांचे प्रभावी निवारण करण्यासाठी सहाय्य करणे
(ब) या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींच्या प्रभावीअंमलबजावणीची सुनिश्चिती करण्यासाठी उपाययोजना करणे. या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.
दरम्यान मराठी भाषेच्या उपाय योजनेच्या आढावा घेण्यासाठी सोमवारी खाते प्रमुखांची एक बैठक बोलावली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.