CIBIL Score | शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट फोकस पेपरचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टेट फोकस पेपरमध्ये विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी 6 लाख 34 हजार 058 कोटी रुपयांच्या क्रेडिट क्षमतेचा आराखडा देण्यात आला आहे. 2021-22 या कालावधीच्या तुलनेत या आराखड्यात 47 टक्के वाढ झाल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

आजच्या स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, कृषी, सहकार, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रमुख बँकर्स देखील उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आर्थिक परिषदेतदेखील हा स्टेट फोकस पेपर ठेवण्यात येऊन पुढील मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील कृषी, ग्रामीण पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि इतर क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असेल, तर योग्य दिशेने विकास होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात वेगाने सुरु झाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तीची मोठी समस्या देखील आहे. शेतकऱ्याच्या सर्व कर्ज – गरजा बँकिंग प्रणालीतून पूर्ण केल्या जातील याची काळजी घेतल्यास तो आत्मविश्वासाने पायावर उभा राहील, तसेच आत्महत्येचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा उल्लेख केला. तसेच अडीच वर्षे बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु झाल्याचे देखील सांगितले. गेल्या नऊ महिन्यांत २७ सिंचन प्रकल्पांना गती दिल्याची माहितीही त्यांनी दिली. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानाशी जुळवून घेण्यासाठी आणि प्रतिकूलता कमी करण्यासाठी नाबार्ड राबवित असलेल्या उपक्रमांसाठी त्यांनी नाबार्डचे कौतुकही केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीकडे नेण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्यादृष्टीने हा स्टेट फोकस पेपर उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

पाणंद रस्त्यांसाठीही तरतूद हवी

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यात येत असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांसाठीही शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते उपयुक्त ठरु शकेल. समृद्धी मार्ग शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे उभारण्यास चालना देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. सिबिलची आवश्यकता नाही, याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात यावी, असेही ते म्हणाले. नवीन प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था तयार करण्याची परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

स्टेट फोकस पेपर

नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत यांनी स्टेट फोकस पेपरची माहिती दिली. यात २०२३-२४ साठी कृषी क्षेत्राकरिता १ लाख ५६ हजार ८७३ कोटी (२४.७%), एसएमई साठी ३ लाख ५४ हजार ८५४ कोटी ( ५६%), अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी १ लाख २२ हजार ३३१ कोटी ( १९.३%) क्रेडिट क्षमता असल्याचे नमूद केले आहे.

राज्यात सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत, कृषी मूल्य साखळ्या विकसित व्हाव्यात, कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक व्हावी, एकात्मिक शेतीला चालना द्यावी , ग्रामीण तरुणांना कृषी व पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, हवामानावर आधारित शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे बँकांनी देखील आपले जाळे अधिक व्यापक करावे, कृषी क्षेत्रात क्लस्टर फायनान्सिंग करावे, बचत गटांना अर्थसहाय करण्यासाठी कॉर्पोरेट धोरण आखावे, ग्रामीण सहकाराला बळकट करावे यासाठी पाऊले उचलावीत, असे नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक श्री. रावत म्हणाले.

००००

MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

खा. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं!

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या.

बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले*

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

Old pension strike | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

| कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००

CM Eknath Shinde | शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी | जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी

| जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

| शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३०० रुपयां ऐवजी ३५० रुपये सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विविध मागण्यांसाठी लाँगमार्च निघाला. आम्ही त्यांना विनंती केली शेतकरी बांधव व भगिनी यांना पायी मुंबई पर्यंत येण्याचा त्रास होऊ नये यासाठी मंत्री दादा भुसे, अतुल सावे यांना चर्चेसाठी पाठवले होते. काल मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी चर्चेच्या माध्यमातून अतिशय सकारात्मक चर्चा झाली. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वसामान्य आदिवासी बांधव भगिनींच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे आदिवासी बंधू- भगिनीं जी जमीन कसतात त्यांच्या ताब्यात असलेली चार हेक्टर पर्यंतची वन जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून सातबारावर नाव लावणे, देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या गायरान जमिनीवर घर आहे ती घरं देखील नियमित करावी, वनहक्क जमिनींचे प्रलंबित दावे, शासकीय योजनांचा लाभ या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी आमदार जे.पी.गावीत व आमदार विनोद निकोले यांना सदस्य करण्यात आले आहे. यासमितीने एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून सदर अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांची २० हजार रिक्त पदे भरण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वेतन कशाप्रकारे अदा करता येईल याबाबत देखील अभ्यास करण्यात येईल आणि त्यानुसार त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केला जाईल. कामगार कल्याणकरता स्थापित जी विविध मंडळ व त्रिपक्षीय समित्या यावरील रिक्त पद भरून पूर्ण क्षमतेने ते कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून १५०० रुपये प्रतिमाह वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गटप्रवर्तक यांना १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत एक हजार रुपयावरून दीड हजार रुपयांची वाढ केली आहे. विधवा पेन्शन योजनेच्या वयाच्या अटीमध्ये बदल करण्याचा देखील निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नदीजोड प्रकल्पामध्ये जामखेड तालुका कळवण येथील सिंचन प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचा निर्णय घेतला असून ओतूर येथे धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या मागण्यांसोबतच इतर १४ मुद्दे होते त्यावर देखील सकारात्मक चर्चा आणि निर्णय घेण्यात आले आहेत.

जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना निर्देश दिलेले आहे. त्याचा अनुभव उद्यापासून येईल. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार हे अधिकारी फिल्डवर जातील. मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याने लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

०००००

Property Tax | 40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक | PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा

Categories
Breaking News cultural PMC पुणे महाराष्ट्र

40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक

| PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात येत आहे. याबाबत भाजपकडून मागणी करण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही मागण्यांसदर्भात उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात  आली.

मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत.

‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र  सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच पुणेकर नागरिकांकडून देखील मागणी करण्यात येत होती.

त्यानुसार मुख्यमंत्री दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता ही बैठक होईल. यासाठी महापालिका आयुक्त यांना माहिती देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्यानुसार टॅक्स विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मिळकत करासोबत पीएमपीच्या प्रश्नाबाबत देखील चर्चा होणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

OPS | NPS | नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती

Categories
Breaking News Commerce Education Political social महाराष्ट्र

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती

| समिती तीन महिन्यात अहवाल देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे.

या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस-अहवाल शासनास सादर करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्याशी संलग्नित असणाऱ्या वेगवेगळया कर्मचारी संघटनानी राज्य शासनाला निवेदन देऊन जुनी निवृत्तीवेतन योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन केले.

निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले की, संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतित करता यावे, याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील हे शासनाने तत्वत: मान्य केले आहे. संघटनेच्या मागणीनुसार या बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमून, समितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, शासन कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत पूर्णपणे चर्चेला तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. हे लक्षात घेऊन या संपामुळे नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
0000

Old pension scheme | जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारच्या बैठकीत काय तोडगा निघाला? जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र

कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

| जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार

राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकप्रतिनीधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीच्या मागे जे तत्व आहे त्या विरोधात सरकार नाही. यातून मार्ग काढण्याची मानसिकता सरकारची आहे. अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांची सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची समिती नेमली जाईल. ही समिती कालबद्धरित्या अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ज्या राज्यांनी ही जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे, त्याबाबत त्यांचा रोडमॅप अद्यापही तयार नाही. या योजनेबाबत राज्य शासन जे धोरण स्विकारेल त्यात याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही. राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये, असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी श्री. काटकर यांनी संपाबाबत आणि जुन्या निवृत्ती योजनेबाबत मुद्दे मांडले.

००००

CM Eknath Shinde | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत” महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब,शेतकरी, महिला यांना न्याय देतांना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल .

समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*शेतीसाठी भरीव तरतूद*

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.

*महिलांचे सक्षमीकरण होणार*

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*दुर्लक्षित घटकांना न्याय*

अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय देण्यात आला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय वाढविणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांनाआदर्श बनविण्याचा निर्णय, ही महत्वाचा आहे.

*सर्वांसाठी घरे*

यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची “मोदी आवास घरकुल योजना” सुरु केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल.

*पायाभूत सुविधांनी राज्यात बदल*

राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*रोजगारक्षम युवा शक्ती*

उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे , आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होईल, अशीही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

*मुंबईचा सर्वांगीण विकास*

मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे यांच्या स्मारकाला त्याचप्रमाणे राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येंत आहे.

*पर्यटनाला देखील चालना*

श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करतांना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कर, व्याज, शास्ती, व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना व्यावसायिकांना दिलासा देणारी असेल असे सांगितले.

Nana Bhangire | पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे | शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

| शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुणे शहराला गतिमान करणारा आहे. यातून सर्वच घटकाला न्याय मिळणार आहे. अशा भावना शिवसेनना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान बजेट मधून दिलेल्या योजनेमधून लोकांचे हित पाहिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे जल्लोष करण्यात आला. तसेच नागरिकांना पेढे देखील वाटण्यात आले.

नाना भानगिरे म्हणाले, मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

भानगिरे पुढे म्हणाले, पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भानगिरे म्हणाले यातील बऱ्याच गोष्टी साठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.

BJP Delegation | पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’ | भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

Categories
Breaking News Commerce PMC Political social पुणे महाराष्ट्र

‘पुणेकरांची मिळकत करातील ४०% सवलत कायम ठेवावी’

| भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

| निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक : मुरलीधर मोहोळ

 

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मोहोळ यांच्यासमवेत यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, ‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.

महारापालिकेच्या २०१९ आणि २०२२ च्या ठरावाच्या आधारावर राज्य सरकारकडे या मागण्या केल्या असून याबाबत तातडीने पुढील आठवड्यातच बैठक घेऊन याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, हा विश्वास आहे, असेही मोहोळ म्हणाले.

| महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन केवळ नौटंकी : मोहोळ

आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी उत्तर दिले.