CM Pune Tour | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पाऊस आणि पीकपाण्याचा आढावा घेण्याबरोबर विविध निर्णय घेतले जात आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदे आज म्हणजेच मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

सकाळी ११.०० वाजता: पाऊस, अतिवृष्टी, पीक- पाणी व विकास कामे विभागीय आढावा बैठक
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

दुपारी १२.४० वाजता: पत्रकार परिषद, पुणे
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

दुपारी १.२० वाजता: फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट व पाहणी. तुकाई दर्शन टेकडी
स्थळ: भेकराईनगर, फुरसुंगी.

दुपारी २.२० वाजता- श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे राखीव

दुपारी २.४५ वाजता: शिवसेना पक्षाची जाहीर सभा
स्थळ:- पालखी तळ मैदान क्रमांक- १, सासवड, पुरंदर

सायंकाळी ५.४५: वाजता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभ आणि हडपसर उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ :- जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी, हांडेवाडी, महमदवाडी, हडपसर

सायंकाळी ७.०० वा: आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान येथे राखीव

सायंकाळी: ७.५५ वाजता: शंकर महाराज मठ धनकवडी येथे आगमन व राखीव

रात्री ८.४० वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर व दत्त मंदीर येथे राखीव
रात्री ८. ५५ वाजता: गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ यांची आगामी उत्सवासंदर्भात बैठक
स्थळ: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर सभागृह

रात्री ९.१५ वाजता : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, कोथरुड येथे राखीव

रात्री ९.४५ वाजता: कोथरुड पुणे येथून मोटारीने ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील १३ महत्वाचे निर्णय जाणून घ्या!

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश

राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल. एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2018 पर्यंत पुर्णत: परतफेड केले असल्यास, 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केले असल्यास, 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र, 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. 50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.

प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
—–०—–

ऊर्जा विभाग

राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविणार

राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली.

या योजनेनुसार 2024-25 पर्यंत एकूण तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी 12 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यात येतील.

राज्यातील ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविण्यात येतील. याचा सुमारे 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील मिटर बसविण्यात येईल. केवळ मिटर्स बसविण्यासाठी 10 हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे.
या वीज कंपन्यांची कार्यक्षमता सुधारुन ग्राहकांना अखंड, दर्जेदार आणि परवडणारा वीज पुरवठा देण्यासाठी
सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पती- आधारित योजना राबविण्यात येईल. महावितरण आणि बेस्ट उपक्रमामार्फत ही योजना राबविणार आहे.
—–०—–

गृह विभाग

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये मार्च 2022 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल. आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांत जिवीत हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव, दहीहंडी यामधील किरकोळ स्वरुपाचे गुन्हे देखिल मागे घेण्यासंदर्भात समितीने तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
—–०—–
जलसंपदा विभाग

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास 890.64 कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुमारे 65 गावामधील 20 हजार 265 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना या प्रकल्पास तृतीय सुधारित प्रशासकीय सन 2009 मध्ये देण्यात आली होती. आजच्या निर्णयानुसार या प्रकल्पास जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2018-19 च्या दरसूचीवर आधारित चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
—–०—–

जलसंपदा विभाग

भातसा, वाघूर प्रकल्पांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता

भातसा तसेच वाघूर प्रकल्पांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या 1491 कोटी 95 लाख रुपयांच्या कामांसाठी सुधारित मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाच्या 2288 कोटी 31 लाख किंमतीच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
—–०—–

सामाजिक न्याय विभाग

तीन नवीन समाजकार्य महाविद्यालयांना मान्यता

राज्यात 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्था, उस्मानाबाद जिल्ह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, जालना येथील दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या तीन संस्थांना कायम स्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
——०—–

कृषि विभाग

हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींस तत्वत: मान्यता देण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रʼ कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
——०——

ऊर्जा विभाग

उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत

राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अतिउच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. या अनुषंगाने 351 कोटी 57 लाख रुपये महावितरण कंपनीस अनुदान म्हणून देण्यात येईल.

लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये 15 रुपये प्रति महिना सवलत जून 2021 पासून नव्याने देण्यात येईल. यापोटी महावितरण कंपनीस 7 कोटी 40 लाख रुपये शासनामार्फत देण्यात येईल.
—–०—–

वन विभाग

लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणार

लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल.

यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे विविध कामे केली जातील.

नियोजन विभागाने मंजूर आराखडयातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरीता पीएलए खाते तयार करुन त्यामध्ये वर्ग करण्यात येईल. तथापि, ज्या विभागांना राज्याच्या अर्थसंकल्पा व्यतिरिक्त इतर स्त्रोतातून निधी प्राप्त होतो ज्याची तरतूद नियोजन विभागामार्फत करणे शक्य नाही तसेच तांत्रिक कारणामुळे निधी लोणार सरोवर विकास समितीकडे वर्ग करण्याची बाब शक्य नसल्यास, अशा प्रकरणी संबंधित विभागाने आराखडयातील कामे प्रचलित पध्दतीनुसार समितीच्या देखरेखीखाली करण्यात येईल.
—–०—–

ग्राम विकास विभाग

ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेतील लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना प्रधान मंत्री आवास योजना- शहरीच्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित करण्यात येईल. लाभार्थींनी खरेदी केलेल्या जागेकरिताच मोजणी शुल्कामध्ये 50 टक्केपर्यंत सवलत देण्यात येईल.

500 चौ. फूट कृषी जमीन खरेदी करतांना तुकडे बंदी कायद्यातील अट लागू होणार नाही अशी अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. लाभार्थींना 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात येईल.

गायरान जागा लाभार्थींना भाडेपट्टयाने देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.
ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांकडे सादर करून 90 दिवसाच्या आत मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले.
—–०—-

वैद्यकीय शिक्षण विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी
अतिरिक्त जागांकरिता येणाऱ्या खर्चात राज्याचा हिस्सा

केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 50 या प्रमाणे एकूण 750 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही प्रवेश क्षमता वाढल्यामुळे प्रती महाविद्यालय 24 कोटी अशा एकूण 360 कोटी रुपये राज्याचा हिस्सा देण्यास आज मान्यता देण्यात आली.
—–०—–

विधि व न्याय विभाग

सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती

राज्यातील दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची सवलत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासंदर्भात शेट्टी आयोग आणि न्यायमूर्ती पद्मनाभन समितीने शिफारशी केल्या होत्या.

त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिल्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या न्यायिक अधिकाऱ्यांना दरमहा 1500 वैद्यकीय भत्ता सुरु ठेवण्यात येईल. याचा लाभ 1250 न्यायिक अधिकाऱ्यांना होईल. यासाठी 3 कोटी 70 लाख रुपये वार्षिक भार पडेल.
—–०—–

विधि व न्याय विभाग

विधि व न्याय विभागात सह सचिव हे पद नव्याने निर्माण

विधि व न्याय विभागात सह सचिव (विधी) हे गट अ संवर्गातील पद निर्माण करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या विभागातील कामकाजाचा वाढता ताण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Single Use Plastic Ban | प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

मुंबई | प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिक चा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लॅस्टिक वर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लॅस्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लॅस्टिक लेपीत (Coating) तसेच प्लॅस्टिक थर (Laminated) असणाऱ्या पेपर किंवा अॅल्युमिनियम इत्यादी पासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा कचरा डेपो, जलाशयांमध्ये फेकला जातो किंवा पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळला जातो.

सध्या राज्यात सिंगल युज प्लॅस्टिक मध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे. परंतू सध्या बाजारामध्ये डीश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लॅस्टिक लेप असलेले किंवा प्लॅस्टिक लॅमिनेशन केलेले मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. या सर्व वस्तुंमध्ये सुद्धा प्लॅस्टिक आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊलं उचलण्यात आले आहे.

Sharad Pawar Vs Chandrakant Patil | दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला

चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. भाजपच्या बैठकीत पाटील  म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे  यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले आहे. हा दिल्लीमधून आदेश आला. त्याबद्दल बोलताना पवारांनी भाजपला चिमटे काढले. आज पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी पवारांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या तत्कालिन सुरक्षेविषयावरही भाष्य केले.

पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, गृहसचिव या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसंच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याकारणाने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, अंसही पवार म्हणाले.

राज्यात नवे राज्य सरकार आले आहे. त्यामधे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्रे फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर येऊन चार आठवडे झाले आहेत परंतु अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर बोलताना पवार म्हणाले, राज्यातील सत्ता या दोघांनी चालवायचं ठरवलेलं दिसतेय. त्यांना राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि केंद्रातल्या नेतृत्वांची दोघांचीही सहमती आहे. ते सत्ताधारी आहेत त्यामुळे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावा लागेल.

Har Ghar Tiranga | हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केद्रींय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बगेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नागालँडचे मुख्यमंत्री नैफीयू रीओ, आसामचे मुख्यमंत्री हिमानता बिस्वा सर्मा यांनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

या बैठकीसाठी मंत्रालयातून मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्रयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर लोकसहभाग घेण्यात येणार आहे.आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून राज्यातील शेतकरी, महिला, शाळकरी मुले याबरोरबच स्वयंसेवी संस्था, वेगवेगळया सहकारी संस्था या सर्वांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरीय स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे काम असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, त्यांचे कार्य आणि विचार समजणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा हे अभियान महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर यशस्वी करण्यात येईल.

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल
■ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आज भारत वेगवेगळया क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. गेल्या 75 वर्षांत भारताने केलेला प्रवास जगाने पाहिला आहे. पुढील 25 वर्षांमध्ये आपला देश वेगवेगळया क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणार आहे. आजादी का अमृतमहोत्सव साजरा करताना राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानातून भारतातील प्रत्येक घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

श्री. शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान देशातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हे अभियान केंद्र शासनाचे जरी असले तरी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा आणि लोकसहभागाशिवाय हे अभियान अपूर्ण आहे. हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणे, अभियानासाठी प्रत्येक घरी तिरंगा पोहोचेल आणि 13 ते 15 दरम्यान घरावर हा तिरंगा फडकेल अशा तीन टप्प्यांमध्ये या अभियानाची पूर्तता होणार आहे. हर घर तिरंगा या अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्ये, तालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळया माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठया प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीला, तरुण वर्गाला समजावे, माहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हर घर तिरंगा हा उपक्रम देशभरात मोठया उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे.भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात आपली वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. संकल्प से सिध्दी या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळया क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहेत. कृषी, उत्पादन, सेवा, सहकार , शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटत असल्याचे केंद्रीय गृह मंत्री यावेळी म्हणाले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्रय मिळविताना अनेक संकटांचा सामना केला मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरु करावी. हर घर तिरंगा याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडीया या माध्यमांचा सुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा असेही श्री. शहा यावेळी म्हणाले.

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ४ निर्णय

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
—–०—–

नगर विकास विभाग

नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजूरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

—–०—–

नगर विकास विभाग

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12 हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख 74 हजार 940 कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम 21 नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60 हजार कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.
0000

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे . त्यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात, असा टोलाही खासदार सुळे यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेतून बाहेर पडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिचारे आहेत. यामागे मागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही.

काल राज्य शासनाने संरपंच आणि नगराध्यक्ष ही पदे प्रत्यक्षरित्या जनतेतून निवडली जातील अशी घोषणा केली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरपंच आणि सदस्या बॉडी वेगळी झाली तर एकत्र चर्चा होत नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम होईल.  राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणे हे राजकारण नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ निमित्त सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर उपस्थितीत होत्या.

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठक निर्णय

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठक निर्णय

गुरूवार  १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात

पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
( वित्त विभाग)

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
(पणन विभाग)

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्या

Farmers affected by heavy rains | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार | योजनेतील जाचक अटी काढणार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

योजनेतील जाचक अटी काढणार

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई |  नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

Maha Puja of Shri Vitthal-Rukmini | बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर’- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान

 

सोलापूर /पंढरपूर | आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त श्री. शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे यावर्षी १० लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देणार

राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा

राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ‘निर्मल वारी हरित वारी ‘ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच ‘ग्रीन बिल्डिंग’ पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, संजय(बंडू) जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकरी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.