Prashant Jagtap Vs Jagdish Mulik | जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर | प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

जगदीश मुळीकांची कर कपातीबाबत केलेली टीका म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारला घरचा आहेर

| प्रशांत जगताप यांनी केली आलोचना

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक यांनी पुणेकरांची मिळकत कराची सवलत ही महाविकास आघाडी सरकारमुळे गेली,अश्या प्रकारचा खोटा आरोप केला. हा आरोपच खोटा व हास्यास्पद आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आलोचना केली आहे.

जगताप म्हणाले, मुळात जगदीश मुळीक हे २०१४ ते १९ या काळात पुणे शहरातील वडगांव शेरी विधानसभेचे आमदार होते.सध्या ते पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आहेत.यांच्या अध्यक्ष पदाच्या काळातच भाजप पुणे महानगरपालिकेत सत्तेत होती.परंतु पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत जगदीश मुळीक यांना फारसे महत्व दिले जात नव्हते त्यामुळेच कुठले निर्णय कधी झाले याबाबतचे ज्ञान जगदीश मुळीक यांना नसेल हे मी समजू शकतो.२०१४ ते १९ या पाच वर्षात जगदीश मुळीक हे आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे शहरातील मालमत्ताधारकांना मिळणारी सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला.ही सवलत १९७० सालापासून ते २०१९ पर्यंत पुणेकरांना मिळत होती,ही वस्तुस्थिती माहीत असूनही २०१९ ला हा निर्णय घेण्यात आला अर्थात त्यावेळेस राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होते.हा निर्णय झाल्यानंतर स्वतःआमदार जगदीश मुळीक व पुणेकरांच्या जीवावर निवडून आलेले भाजपचे १०० नगरसेवक यांनी कुठलीही तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली नाही.त्याचा भुर्दंड आज प्रत्येक पुणेकरास सहन करावा लागत आहे. जर यांना पुणेकरांची काळजी असती तर जगदीश मुळीक यांनी त्याच वेळी तत्कालीन राज्य सरकारकडे तक्रार केली असती ,किंबहुना राज्यातील नेतृत्वाकडे याबाबतची विचारणा मुळीक यांनी केली नाही अर्थात त्यांच्यात ती धमक ही नाही.ही वस्तुस्थिती जगदीश मुळीक लपवून ठेवत आहेत.

जगताप पुढे म्हणाले, मागच्या २ महिन्यापूर्वी राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर जगदीश मुळीक अथवा पुणे भाजप मधील कुणीही अश्या प्रकारची मागणी केली नाही.किंबहुना आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रभाग रचना बदलावी अशी मागणी करण्यासाठी जगदीश मुळीक यांना वेळ आहे.परंतु पुणेकरांना कर सवलत मिळावी ही मागणी करायला मुळीक यांच्याकडे वेळ नाही. मला खात्री आहे की ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुणेकर येणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच या गोष्टीसाठी धडा शिकवतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना ही करसवलत मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन येत्या काळात उभारणार असून,पुणेकरांची करसवलत जरी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी रद्द केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना पुन्हा ही कर सवलत मिळवून देणार हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छितो. असे ही जगताप म्हणाले.

Sanitation | PMC | नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !

भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या शिष्टमंडळाने आज पावसाळी कामांच्या नियोजनातील निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण असलेली नालेसफाई, निकृष्ट दर्जाची पावसाळी कामे, अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत असलेला राडारोडा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुराच्या सुरक्षेचा धोका असणाऱ्या ठिकाणांची वस्तुस्थिती देखील यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

वाढता पाऊस आणि संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘अती पावसाच्या कालावधीत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा याची दक्षता घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागात पोलीस प्रशासन पुणे महानगर परिवहन महामंडळ स्मार्ट सिटी यातील समन्वय महत्त्वाचा आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यात पडणारे खड्डे, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, मोठे नाले, पुरामुळे बाधीत होणारे परिसर, निवारा यांची संख्या, साधन सामग्री आदींबाबत तातडीचे नियोजन होणे आवश्यक आहे.’

यावेळी जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुशिल मेंगडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली

| भाजपचा आरोप

आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळावी, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या केल्या. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा दिला.
मुळीक म्हणाले, महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक 23 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती करताना एका प्रभागातील मतदार दुसर्‍या प्रभागात टाकणे काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. महापालिका हद्दी बाहेरील गावातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मतदार याद्या बीएलओ कडून करून घेणे अपेक्षित असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या आहेत. विविध प्रभागांमधील चार ते पाच आणि दहा ते पंधरा मतदार याद्या दुसर्‍या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत. 58 प्रभागांपैकी 17 प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, वर्षा तापकीर,मा सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, सुशिल मेंगडे, प्रशांत हरसूले, मा.नगरसेवक योगेश मुळीक, मंजुषा नागपुरे, छाया मारणे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, राहूल भंडारे, सुनिता वाडेकर, गणेश कळमकर, तुषार पाटील, महेश गलांडे, पूनित जोशी, साचीन मोरे, महेश पुंडे, अनिता तलाठी, चंद्रकांत जंजिरे, सुनिल खांदवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Walk For Health | वॉकेथॉन’मध्ये ५०० डॉक्टरांचा सहभाग

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र

वॉकेथॉन’मध्ये ५०० डॉक्टरांचा सहभाग

बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करा असे आवाहन डॉ. शशांक शहा यांनी दिला.

डॉक्टर दिनानिमित्त शहर भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉक फॉर हेल्थ’ या वॉकेथॉनचा शुभारंभ करताना डॉ. शहा बोलत होते. वॉकेथॉनमध्ये ५०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला.

भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार शरद ढमाले, डॉ. शशांक शहा, डॉ. संदीप बुटाला, डॉ. धनंजय जोशी, डॉ. प्रदीप सेठीया, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. शुभदा कामत, डॉ. मनिषा जाधव, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रोशन जैन, दिलीप वेडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. शहा पुढे म्हणाले, मधुमेह, लठ्ठपणा अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारांमुळे ८० टक्के इतर आजार होण्याची भिती असते. त्यासाठी चालण्या सारखा व्यायाम महत्त्वाचा आहे.

मुळीक म्हणाले, नियमित व्यायाम करण्याचा संदेश देण्यासाठी डॉक्टरांचा सहभाग असणारा हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत मुळीक यांनी व्यक्त केले. डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देताना, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

MLC Election | BJP Pune | विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरील विश्वास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यशस्वी नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची समर्थ साथ, भाजपवरील जनतेचा विश्वास, भाजपचे विकासाचे धोरण, सुशासन आदीचा हा विजय असून, आघाडी सरकारच्या अंधकारमय कारभाराला सुरूंग लावून विकासाची मशाल पेटविणारा हा विजय असून, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत पाचही जागांवर मिळविलेला विजय हा देवेंद्रजींची कमाल असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेतील यशानंतर शहर भाजपच्या वतीने आज महापालिकेसमोरील पक्षाच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुळीक बोलत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, सरचिटणीस राजेश येनपुरे, गणेश घोष, प्रमोद कोंढरे, रविंद्र साळेगावकर, धनंजय जाधव, निहाल घोडके, चंद्रकांत पोटे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर, दत्तात्रय खाडे, संदीप लोणकर, गणेश कळमकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, अन्वर पठाण, संदीप काळे, अजय दुधाणे उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत विजयाची किमया करणारे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला असून, स्वबळावर म्हणजे काय याचा राजकारणात अर्थ शिकविला. अन्य पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, ज्यांना स्वत:चे आमदार सांभाळता येत नाही, त्यांनी आता न बोललेच बरे राहिल.

OBC Reservation | BJP | ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी : योगेश टिळेकर

पुणे : मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.

दोन वर्षांत घरात बसूनही सरकारला अभ्यास करता येत नसेल तर त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजप सरकारची कॉपी करावी आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यासाठी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्या वेळी मुळीक बोलत होते.

ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनिषा लडकत, प्रशांत हरसुले, प्रतिक देसरडा, दीपक माने, नंदकुमार गोसावी, राजेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक पुढे म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमवावे लागले नसून, राज्य सरकारने ते पद्धतशीरपणे घालवले आहे. आरक्षण हातचे जात असताना छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवित निमूटपणे बसून राहिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, मात्र ठाकरे सरकारने त्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश दिला. याउलट मध्य प्रदेश सरकारने र्नयायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याने त्यांना आरक्षण मिळाले. आरक्षण गमविण्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. आता तरी जागे व्हावे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळवून द्यावे.

टिळेकर म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे. त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू झाले नाही. दुसरीकडे मध्य प्रदशेने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळविले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.

BJP Vs NCP | राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

शहरातील राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणार्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मुळीक पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

Pune BJP : Jagdish Mulik : निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

Categories
Breaking News PMC Political पुणे

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

: शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमांतून केलेली विकासकामे, पक्षाने कोरोना काळात केलेले सेवा कार्य, बूथ स्तरापर्यंतची भक्कम संघटनात्मक यंत्रणा आणि पुणेकरांचा विश्वास या जोरावर भाजपची महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास वाटतो.

मुळीक पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांत एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण करता आली असती. न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय उदासिनतेमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. हा या समाजावर मोठा अन्याय झाला आहे.

Archana Tushar Patil : कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्द्घाटन : नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Education PMC Political पुणे

कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्द्घाटन

: नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पुणे: प्रभाग 19 मधील नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नातून कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्द्घाटन शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

भवानी पेठेतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप सतत प्रयत्नशील आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी उभा केलेल्या कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधून नक्कीच उच्च शिक्षित विद्यार्थी घडतील असा विश्वास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे म्हणाले शिक्षणामुळे समाज घडू शकतो. यासाठी भाजप चे सगळे नगरसेवक काम करतायेत. काशेवाडी भागातील झोपडपट्टीतील मुलांसाठी सतत काम करतायेत. समजाच्या विकासासाठी भाजप सतत तुमच्या पाठीशी आहे.

कामगार वर्ग किंवा झोपडपट्टी भागातील व्यक्तिलाही वाटते आपले मुले इंग्लिश मिडीयम च्या शाळेत जावीत. पण अवाजवी फी मुळे ते शक्य होत नाही. पण अर्चना पाटील यांनी ही शाळा उभी करुन सामान्य व्यक्तींना खूप चांगला पर्याय उपलब्ध करुन दिला आहे असे मत आमादर सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.


खासगी शाळांच्या फी या माझ्या भागातील गोर गरीब जनतेला परवडणाऱ्या नाही. तेव्हा ठरवले शाळा बांधायची. आज ते स्वप्न सत्यात उतरते याचा खूप आनंद होत आहे. या शाळेचा शिक्षणाचा दर्जा अत्यंत चांगला आहे. या माझ्या वस्तीतून उच्च शिक्षित मुले घडवीत अशी इच्छा आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले.

या प्रसंगी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे, आमादर मुक्ता टिळक, नगरसेविका मनिषा लड़कत, संदिप लड़कत, मुनावर रामपूरी, दिनेश रासकर, विकी ढोले, संतोष कांबळे, राणी कांबळे, उमेश दुरांडे, सनी अडागळे, गणेश कांबळे आणि भाजप चे सर्व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले होते.

BJP Vs MVA : भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली CBI चौकशीची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक

भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे प्रतिपादन

पुणे : तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बुधवारी केली.

ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. ते आता उघड झाले आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेचा विरोधकांना संपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात येत आहे. या प्रकारात पोलीस गुंतले असल्याने याची चौकशी सीबीआयकडूनच करायला हवी.

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आता राज्यातील लोकशाही उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विरोधी नेत्यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी कारस्थाने करणे, त्यासाठी तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करणे, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिंबा देणे, जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकविणे, सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करणे आणि त्यांना पोलीस केसमध्ये अडकविणे असे प्रकार चालू आहेत. राज्यात लोकशाही संकटात असून अराजक निर्माण होत आहे. भारतीय जनता पार्टी या विरोधात संघर्ष करेल.