Open Gym | ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा

| मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | २० मार्च ला संयुक्त भुसारी कॉलनी येथील खुले मैदानमधील ओपन जीम येथे व्यायाम करत असताना वीजेचा शाॅक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. याची सखोल चौकशी करून दोषी लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनविसे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
कनोजिया यांच्या निवेदनानुसार शॉक लागल्यानंतर प्रथम उपचारासाठी नजिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण उपचार दरम्यान डॉक्टरांनी  मृत घोषित केले. अमोल शंकर नाकते वय २३ असे मृत तरुणांचे नाव असून परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. सदर मैदानात रोज सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक लहान मुले या ठिकाणी  व्यायाम करतात. सदर भागात जमिनीखालून एम.एस.ई.बी.च्या केबल असल्याचे निदर्शनास आले आहे. घटना घडली,तेव्हा पोलीस, अग्निशमन दल यांना त्वरित कळवण्यातही आले होते. सदर ओपन जीम चा ठेकेदार व अभियंता पुणे मनपा संकल्पना व निधी उपलब्ध करुन देणारे माजी नगरसेवक यांनी नागरीक सुरक्षिततेची कोणतीही काळजी  न घेता  हलगर्जीपणा केला आहे.
एम ई एस बी केबल जमिनी खाली असताना त्यांची एन.ओ.सी घेणे गरजेचे होते. चालु केबल वरच  ओपन जीम साहित्य त्यावर लावुन  नागरिकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे. सुरक्षेची काळजी न घेता कानाडोळा करण्यात आला हे स्पष्टपणे दिसून येते. या गंभीर विषयावर स्वतः लक्ष घालून वरिष्ठ अधिकारी यांची समिती स्थापन करुन जबाबदार माजी नगरसेवक ,ठेकेदार, विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन कार्यवाही लवकरात लवकर व्हावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू. असा इशारा कनोजिया यांनी दिला आहे.

Water Distribution planning | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक

| महापालिकेकडून जलसंपदा खात्याला बैठकीचे निमंत्रण

पुणे | तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजनासंदर्भात महापालिकेकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका भवनात ही बैठक होणार असून जलसंपदा खात्यासोबत ही बैठक असणार आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाण्याची मागणी पाहता नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (PMC Pune)

या वर्षी मार्च महिन्यापासूनच तीर्व उन्हाळा चालू झाला असून, नागरिकांच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. तसेच, या वर्षी पावसाळा समाधानकारक होईल अगर कसे, याबाबत आत्ताच खात्री देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी गुरुवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या  अधिनस्त अधिकारी यांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह महापालिका आयुक्त कार्यालय येथे उपस्थित राहावे. असे निमंत्रण आयुक्त कार्यालयाकडून जलसंपदा खात्याला धाडण्यात आले आहे. (Department of water resources) 

दरम्यान खडकवासला साखळीच्या चार धरणामध्ये 16.95 टीएमसी पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात 16.60 टीएमसी पाणी उपलब्ध होते. आगामी काळात म्हणजे जुलै महिन्यापर्यंत महापालिकेला 7 टीएमसी हुन अधिक पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. (Khadakwasla dam chain)
– असा आहे पाणीसाठा
धरण               टीएमसी    टक्केवारी
खडकवासला.    1.0.           50.63
पानशेत             6.8.           57.13
वरसगाव            9.46.         73.74
टेमघर               0.41.          10.97
एकूण               16.95.        58.12
—-

BJP Delegation | पुणेकरांवर करवाढीचा बोजा नको | महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांवर करवाढीचा बोजा नको

| महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आयुक्त विक‘म कुमार यांची भेट घेतली. या वेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, सरचिटणीय गणेश घोष, दत्ता खाडे, योगेश मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (BJP Delegation)

कोणतीही नवीन करवाढ करू नये, मेट्रो मार्गिका विस्तारीकरणासाठी निधी द्यावा, नवीन बसेस खरेदीला प्राधान्य द्यावे, पुण्यदशम योजना शहरभरात राबवावी, अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू करावे, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करावे, नदी सुधारणा आणि सुशोभिकरण, कचर्‍यावर प्रकि‘या करणारे छोटे प्रकल्प उभारावेत, समाविष्ट गावांसाठी भरीव निधी द्यावा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करावी अशा प्रमुख मागण्या वेळी करण्यात आल्याचे मुळीक यांनी पत्रकारांना सांगितले. (Pune Municipal Corporation)

मुळीक म्हणाले, जी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील वारसा स्थळांचा हेरिटेज कॉरिडॉर विकसित करावा, शहराचा इतिहास, वारसा आणि परंपरांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्डिंग करण्यासाठी पोर्टल निर्माण करावे, नवीन लाइट हाऊस प्रकल्प सुरू करावेत, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय, अपंग यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या निधीत भरीव वाढ करावी अशा मागण्या या वेळी केल्या. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. (PMC Pune Budget)

मुळीक पुढे म्हणाले, गेल्या वर्षी पावसाळापूर्वीची कामे, नालेसफाई योग्य पद्धतीने करण्यात आली नाही. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सुचना केल्या होत्या. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला होता. या वर्षी पावसाळापूर्वीची कामे १५ मार्च पासून सुरू करावीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ही कामे वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी ही करण्यात आली. (PMC Pune)

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी

| महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या सहायक आयुक्त या पदावरून उपायुक्त या पदावर किशोरी शिंदे आणि युनूस पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर विभिन्न विभागाची जबाबदारी देखील सोपवली आहे. त्यानुसार उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 1 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युनूस पठाण यांच्याकडे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या तीन सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या माध्यमातून उपायुक्त या पदावर बढती देण्यात आली आहे.  यामध्ये युनूस पठाण, किशोरी शिंदे आणि आशिष महाडदळकर यांचा समावेश आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान यातील दोघांना विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय गावडे निवृत झाल्यानंतर आशिष महाडदळकर यांना जबाबदारी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

 

Charge | PMC Pune | समाज विकास आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी आशा राऊत यांच्याकडे

Categories
Breaking News PMC पुणे

समाज विकास विभागाची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे

पुणे | महापालिकेच्या समाज विकास आणि समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना गगे मंगळवारी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
उपायुक्त रंजना गगे या महापालिका सेवेत प्रतिनियुक्ती ने आल्या होत्या. त्यांच्याकडे महापालिकेच्या समाज विकास आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र गगे या मंगळवारी म्हणजे 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार इतर अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक होते. त्यानुसार या दोन्ही विभागाची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. राऊत यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे. समाज विकास आणि समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे असणार आहे. 1 मार्च पासून हा पदभार त्यांच्याकडे असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव

| आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे :  सिध्दार्थनगर (विमाननगर) येथील रस्ता बाधित झोपडपट्टीवासियांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अखेर 14 वर्षानंतर सुटणार आहे. येथील बांधितांना घरे देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा ठिकाणांवरील घरांचे पर्याय ठेवले आहेत. यासंबधीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

पुण्यात 2009 मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धांसाठी सिद्धार्थनगर झोपडपट्टीतून जाणार्‍या व्हीआयपी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 200 झोपड्या आणि 15 दुकाने यामध्ये बाधित झाली होती. या बाधितांचे महापालिकेकडून पुर्नवसन केले करण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या बांधितांना घरे मिळाली नव्हती. यासंदर्भात आमदार सुनिल टिंगरे यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधले. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. त्यानंतर या पुर्नवसनाच्या प्रश्नाला गती मिळाली. त्यानुसार आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या सिध्दार्थनगर रस्ता बांधितांना भाडेतत्वावर घरे देण्यासाठी खराडीतील दोन ठिकाणी, लोहगाव (विमाननगर) मधील दोन ठिकाणी तसेच वडगाव शेरी आणि हडपसर अशा सहा ठिकाणी घरांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आता बांधितांना यामधून कोणती ठिकाणी घरे आहेत हे निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार बांधितांनी घरांचा पर्याय निवडल्यानंतर पात्र- अपात्र यादी तपासून वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी त्यासंबधीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवायचा आहे. त्यानंतर स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मंजुरीने संबधित घरे बांधितांना दिली जाणार आहे.
————————–

सिध्दार्थनगर येथील रस्ता बाधितांच्या पुर्नवसनाला गती मिळाली याचा विशेष आनंद होत आहे. या नागरिकांना तब्बल 14 वर्षांची तपर्श्या करावी लागली. मात्र, आता लवकरच त्यांना हक्काचे घर मिळेल. त्यासाठी अखेरपर्यंत माझा पाठपुरावा राहिल.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
———————————

Warje Hospital | वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी! | प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव  दफ्तरी दाखल करण्याची मागणी!

| प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप

पुणे | महापालिकेकडून वारजे येथे करोडो रुपये खर्चून हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. मात्र हे प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. तसेच हा विषय दफ्तरी दाखल करावा. अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी ही मागणी केली आहे. केसकर यांच्या निवेदनानुसार पुणे येथे वारजे ठिकाणी बांधा, डिझाईन करा, हस्तांतरित करा या तत्वावर हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. मात्र या बाबत प्रकल्पाला एकट्याने दिलेली मान्यता त्वरित रद्द करावी. हे संपूर्ण प्रकरण  बेकायदेशीर आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात आहे. राज्य सरकारने कुठलाही विचार न करता आणि स्वतःवर कुठलीही आर्थिक तोशिश  घेणार नाही, अशा प्रकारची मान्यता दिली आहे.  जी मान्यता तुम्ही मागितली नाही ती देखील मान्यता त दिली आहे. अशा परिस्थितीत आपण  हे प्रकरण दप्तरी दाखल करावे. असे ही केसकर म्हणाले.

Pune | Property Tax Hike | पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?

पुणे – पुणे महापालिकेकडून पुणेकरांवर मिळकत कर वाढीचा बोजा टाकण्यात येणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी याबाबत मिळकत कर विभागाला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे म्हटले जात आहे. (PMC pune)

पुणे महापालिकेच्या २०२२-२३ या वर्षासाठी प्रशासनाने मिळकतकरात ११ टक्के करवाढ सुचविली होती. मात्र मागील वर्षी नगरसेवकांनी कर वाढ फेटाळून लावली होती. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून २०१५ सालापासून कर वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा मिळकत करात वाढ सुचवली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. कारण सद्यस्थितीत महापालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे विरोध होणार नाही. या कारणास्तव कर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार याबाबत सकारात्मक नाहीत. मिळकत करात वाढ सुचवू नये, असे निर्देश त्यांनी कर विभागाला दिले आहेत. (Property tax pune)

कारण  आपल्या हक्काच्या घरात राहणाऱ्या मिळकत धारकांना महापालिका १९७० सालापासून मिळकतकरामध्ये  ४० टक्के सवलत देत होती. मात्र राज्य सरकारने ही सवलत रद्द केली आहे. त्याचा बोजा पुणेकरावर पडत आहे.  तसेच यंदा अभय योजना देखील लागू केली गेली नाही. शिवाय मिळकत करात वाढ हा धोरणात्मक निर्णय आहे. नगरसेवक असल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही. असे आयुक्त यांना वाटते. त्यामुळे करवाढीचा बोजा टळेल, असे म्हटले जात आहे. (Pune Municipal corporation)

Health Scheme | शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख करा

| अभिजित बारवकर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

पुणे | राज्य सरकारच्या (State Govt) धर्तीवर महापालिकेच्या (PMC Pune) शहरी गरीब योजनेची वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार रुपये करा, अशी मागणी अभिजित बारवकर (Abhijit Baravkar) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

बारवकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाकडील अधिसूचनेनुसार निर्धन व गरीब घटकातील रुग्णासाठी वार्षिक उत्पनाची अट हि ७५०००/- वाढवून 1 लाख ६० हजार अशी करण्यात आली आहे. पुणे मनपाच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे वार्षिक उत्पनाची अट १ लाख आतील असल्यामुळे नागरिकांना तहसीलदार उत्पन दाखला काढताना नाहक त्रास होत आहे, त्यामुळे नागरिक चुकीची उत्पनाबाबतची माहिती देत आहेत. तरी आपणास विनंती आहे कि, महाराष्ट्र शासनाकडील २३/२/२०१८ अधिसूचनेनुसार शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे वार्षिक उत्पनाची अट 1.60 लाख पर्यंत अशी अट करण्यात यावी. असे बारवकर यांनी म्हटले आहे. (pune municipal corporation)

Good news for PMC Employees | अखेर कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता! महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

Categories
Breaking News PMC पुणे

अखेर कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता! महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावावर आज सायंकाळी उशिरा महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बऱ्याच महिन्यापासून कर्मचारी याची वाट पाहत होते. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने पाठपुरावा केला होता. (Time bound promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगानुसार (7th pay commission) वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर (PMC Additional Commissioner) मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार (Econimic Burden) येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून (IT Dept) ही माहिती सादर करण्यात आली आहे. यावर अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचे निवेदन मंजुरी साठी महपालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्यासमोर ठेवले होते. मात्र आयुक्तांच्या टेबलवर बरेच दिवस हा प्रस्ताव पडून होता. ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी सायंकाळी उशिरा या प्रस्तावावर सही केली आहे. त्यानुसार लवकरच सर्कुलर जारी होईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

—-

कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाली आहे. लवकरच याबाबतचे सर्कुलर जारी केले जाईल. त्यानुसार कर्मचाऱ्यांना याच लाभ मिळेल.

सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.