Indefinite Strike | Old pension | संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार | सचिव सुमंत भांगे

 

१४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. (Indefinite strike)

राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Old pension scheme)

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही- वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने आज १३ मार्च २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. (Kamgar union strike)

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे, असेही सचिव श्री. भांगे यांनी म्हटले आहे. (Secretory Sumant Bhang)

०००००

Kasba by-election | पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी | औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी

| औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

पुणे | २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे.

*कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी*

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/ कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

*मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी किंवा कमीत कमी दोन तासांची सवलत*

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खवरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000

Petrol-Diesel Price | राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश महाराष्ट्र

राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त

राज्यातील नागरिकांना पेट्रोल डिझेल बाबत अजून दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे  अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील  मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

High Court : पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच!  : राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच!

: राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

मुंबई : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. बहुसदस्यीय रचना योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.पाच) महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळाटाळ न करता घेणयाचे आदेश न्यायालयाने दिले आहे.तसेच दोन आठवड्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे मुंबईसह १८ हून अधिका पालिका व२५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपी, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्व याचिक न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

Municipal Elections : Supreme Court : महापालिका निवडणुक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा  : सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

महापालिका निवडणुक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा 

: सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश 

 

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणावरुन राज्यात रखडलेला निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत.

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय?

 ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. पण आजच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कोर्टानं दोन आठवड्यात महाराष्ट्रातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच तत्काळ या निवडणुका घेण्यात याव्यात असंही कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे आता स्पष्ट झालं आहे.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांची होती. त्यासाठी राज्य सरकारनं वॉर्ड रचना काढली होती. पण तोपर्यंत ओबीसींचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा राज्य सरकारला होती. पण तसं न झाल्यानं राज्य सरकारला झटका बसला आहे. गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारनं कोर्टात म्हटलं होतं की पावसाळ्यात निवडणुका घेणं शक्य नाही. दरम्यान, अद्याप वॉर्ड रचनांचं काम पूर्ण झालेलं नाही त्यातच दोन आठवड्यात जर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर राज्य शासनाच्या अडचणी वाढणार आहेत.मुंबईसह १८ मनपा आणि झेडपीच्या निवडणूका होणार जाहीरसुप्रीम कोर्टानं दिलेल्या आजच्या आदेशामुळं मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Underground Metro : स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो : राज्य सरकारची मान्यता

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो

: प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता

मुंबई :- पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या  प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबी, 3 स्थानके असलेल्या रु. 3668.04 कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे मेट्रोसंदर्भात आज राज्यमंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे :-

1. सदर प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात रु. 450.95 कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर/शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात रु.440.32 कोटी असा एकूण रु. 891.27 कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

2. सदर प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून रु.450.95 कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता रु.204.14 कोटी असे एकूण रु.655.09 कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

3. सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रु.300.63 कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.

4. सदर प्रकल्पाकरिता द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत रु. 1803.79 कोटीचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, सदर कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्यशासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली.

5. सदर प्रकल्प माहे एप्रिल, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

6. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरीकांना तसेच एकंदरीच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

Corona virus Update : कोरोनाचा आलेख वाढतोय : केंद्राचे महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

कोरोनाचा आलेख वाढतोय

: केंद्राचे महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र

कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून य़ा राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलावीत, असे म्हटले आहे. यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यास सांगितले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर काळजी घेण्यात चूक झाली तर आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल.

गेल्या दोन महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली होती. परंतू आता पुन्हा कोरोनाचे दिवसाला हजारावर रुग्ण सापडू लागले आहेत. साप्ताहिक संक्रमण एक टक्क्यापेक्षा कमी आहे, असे ते म्हणाले.

No Restrictions : राज्यात निर्बंधांत शिथीलता : ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

राज्यात निर्बंधांत शिथीलता

: ‘अ’सूचीत १४ जिल्ह्यांचा समावेश

 

मुंबई,  :- राज्यातील १४ जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात आले असून आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभाग तसेच कोविड कृती दल(टास्क फोर्से) यांच्यामार्फत राज्यातल्या कोविड स्थितीबाबत प्राप्त माहितीच्या आधारावर राज्यातल्या निर्बंधांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासाठी प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या भागतील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तिथली लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले आहे.

राज्य कार्यकारी समितीची 25 फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात निर्देश देण्यात आले आहे. यांची अंमलबजावणी राज्यात शुक्रवार 4 मार्च 2022 मध्यरात्री 12.00 पासून केली जाणार आहे. हे निर्देश पुढील आदेशांपर्यंत अमलात राहणार आहे.

व्यक्तीचे “पूर्ण लसीकरण” याची व्याख्या पूर्वीप्रमाणेच असेल आणि कोविड अनुषंगिक व्यवहार (सी ए बी) करणे बंधनकारक असेल. जर या आदेशामध्ये एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख नसेल तर अशा स्थितीत त्या कार्यक्रमासाठी भारत सरकारने जारी केलेले सगळी मार्गदर्शक निर्देश लागू पडतील. जर एखाद्या बाबतीत राज्य तसेच केंद्र सरकार, असे दोन्हींचे ही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असतील, तर अशा स्थितीत जो निर्बंध जास्त कठोर असेल, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अ प्रशासकीय घटक

१-महानगरपालिकांना एक वेगळे प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यातील इतर क्षेत्राला दुसरे एकल प्रशासकीय घटक म्हणून गृहीत धरले जाईल.

२- जे प्रशासकीय घटक खालील अटी पूर्ण करतील त्यांचा ‘अ’ सुचित समावेश असेल

अ- पहिली लस घेतलेल्यांची संख्या 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असेल;

ब- दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्केपेक्षा जास्त असेल;

क- पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल;

ड- ज्या ठिकाणी प्राणवायू आधारित बेडची संख्या किंवा आयसीयूमधील ४० टक्क्यांपेक्षा कमी बेड रुग्णांनी भरलेले असतील.

ब- वेग वेगळी स्थिती

सर्व ठिकाणी एक सारखी परिस्थिती नसेल आणि यामुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन या मापदंडांचा आकलन करून आपल्या क्षेत्रातील ‘अ’ किंवा ‘ब’ प्रशासकीय घटक सामान्य लोकांसाठी माहिती देतील आणि चालू स्थितीच्या आधारे एखाद्या प्रशासकीय घटकाला यादीमधुन वगळायचे की त्यात सामील करायचे, हे ठरवले जाईल. हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या संमतीने घेतील. एकदा एखाद्या प्रशासकीय घटकाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला किंवा यादीतून वगळण्यात आले, तर त्या ठिकाणी निर्बंध/ शिथिलतेचे मापदंड तत्काळ बदलतील.

क- पूर्ण लसीकरणासाठी आवश्यकता

१-सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असलेले सर्व आस्थापनांच्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

२-होम डिलिव्हरी करणाऱ्या संपूर्ण स्टाफला पूर्णपणे लसीकृत असणे अनिवार्य असेल;

३-सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक असेल;

4 -सर्वसामान्य लोक जमा होतात अशा सर्व ठिकाणी म्हणजेच मॉल, थेटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, उपहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण असणे आवश्यक असेल;

5- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अश्या सर्व ठिकाणी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना भेट देण्याची परवानगी देतील की जेथे जास्त लोकांचा संपर्क येतो आणि कोविड-१९ चा प्रसार होण्याची शक्यता आहे किंवा कोविड सुयोग्य व्यवहार करणे अत्यावश्यक आहे.

६-लोकांशी संपर्क येत असलेल्या कोणत्याही खाजगी, सार्वजनिक किंवा शासकीय कार्यालयांमध्ये किंवा आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक असेल.

७-औद्योगिक कार्यकलापात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण लसीकृत असणे अनिवार्य असेल.

ड ‘अ’ यादीतील प्रशासकीय घटकांमध्ये ज्या सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारोह, अंतिम यात्रा किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी क्षमतेच्या पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत उपस्थिती मुभा देण्यात आली आहे परंतु एखाद्या ठिकाणी जर एक हजारापेक्षा जास्त लोक जमणार असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास त्याची माहिती द्यावी लागेल आणि ते यावर निर्बंध घालू शकतील. ज्या प्रशासकीय घटकांचा ‘अ’ यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्या ठिकाणी वरील प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत उपस्थितीस परवानगी असेल किंवा 200 जणांची उपस्थितीचे (जी कोणती कमी असेल) मुभा असेल.

ई- सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागाच्या आदेशाच्या अधीन राहून ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी असेल. अशा सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकांना ऑफलाइन सहित ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. सर्व अंगणवाड्या व प्री-शाळांना वर्ग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा सर्व संस्था आणि आस्थापनांना कोविड सुयोग्य व्यवहाराचे अनुपालन करावे लागतील.

फ- सर्व प्रशासकीय घटकांसाठी सर्व प्रकारचे होम डिलिव्हरी सेवांसाठी मुभा असेल.

ग- ‘अ’ यादीत सामील असलेल्या प्रशासकीय घटकातील सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क इत्यादींना शंभर टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. इतर प्रशासकीय घटकांना क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ने संचलनास परवानगी देण्यात आली आहे.

ह- पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराज्य तसेच राज्य अंतर्गत प्रवास करण्यास परवानगी असेल. इतर राज्यांमध्ये ये- जा करणाऱ्या पूर्णपणे लसीकृत नसलेल्या लोकांना 72 तासाच्या आत मध्ये चाचणी करून आणलेले आर टी पी सी आर अहवाल दाखवणे बंधनकारक असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची हरकत नसल्यास, अशा प्रकारच्या प्रवासासाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसेल.

आय- शासकीय व खाजगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची परवानगी असेल.

जे- सर्व उद्योग आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेसह काम करू शकतील.

के- या आदेशात सामील नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त ‘अ’ यादी मध्ये समावेश असेल तरच शंभर टक्के क्षमतेने संचलनाची परवानगी असेल आणि यादी ‘ब’ मध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेची अट लागू असेल. अन्वयार्थ लावण्यात वाद असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अंतिम निर्णय घेतील.

एल- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या परवानगीने आणखी जास्त कठोर निर्बंध लादण्याची अनुमती असेल. जिल्हास्तरावर या प्रशासनाने वारंवार बैठका, किमान आठवड्यातून एक बैठक, घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा.

एम- जिल्ह्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि लसीकरणाची गती वाढवावी. ‘अ’ यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या प्रशासकीय घटकांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. सध्या अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी लसीकरण आवश्यक नसले तरी निकट भविष्यात त्यांनाही लस घेणे आवश्यक ठरू शकते. पात्र वयस्क लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून डोस घ्यावे. सर्व शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे की नाही याची जिल्हा प्रशासनाने सहनिशा करून घ्यावी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे.

एन- चालू कोविड परिस्थितीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती द्यावी. त्याचप्रमाणे चाचणीसाठीची मूलभूत सुविधा याबाबतची लोकांना माहिती द्यावी. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होणार नाही आणि लोक घाबरणार नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये लोकांना या कार्यात समाविष्ट करून घ्यावे आणि कोविड नियमांचे सुयोग्य वर्तन होत असल्याची खात्री करावी. समाजाला पुरावे आधारित माहिती वेळोवेळी द्यावी.

ओ- कोविड-१९ च्या परिस्थितीत कधीही बदल होऊ शकते. म्हणून जिल्हा प्रशासन तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि दररोजच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असेल.

‘अ’सूचीतील यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

24*7 Water Project : 24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही!  : राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे

Categories
Breaking News PMC पुणे

24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही!

: राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे

पुणे : महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा समतोल करण्यासाठी समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 (Water project) योजना हाती घेतली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र ही योजना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्याच्या प्रधान सचिवांनी या कामाबाबत महापालिकेचे वाभाडे काढले आहेत. महापालिका या कामाबाबत गंभीर नाही. (PMC is not much serious about this project) शिवाय महापालिकेने या योजनेबाबत प्रचंड उशीर केला आहे. ( Badly delayed project) अशा शब्दात प्रधान सचिवांनी महापालिकेला सुनावले आहे.

समान पाणीपुरवठा योजनेला अमृत अभियान अंतर्गत निधी मिळाला आहे. अमृत अभियानांतर्गत शहरास मंजूर करण्यात आलेले प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यासंदर्भात  v.C. द्वारे  आढावा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या 24*7 योजनेबाबत चर्चा झाली. त्यावेळी बैठकीत महापालिकेच्या चुका दाखवून देण्यात आल्या.

: या दाखवून दिल्या चुका

1. हा प्रकल्प किंवा या प्रकल्पातील बदल पूर्ण करण्याबाबत पुणे महापालिका फारशी गंभीर नाही
  2. प्रकल्प अत्यंत विलंबित
 3. गेल्या 10 महिन्यांत नगण्य भौतिक आणि आर्थिक प्रगती.
 4. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पीएमसी प्रकल्पाच्या घटकांची पुनरावृत्ती करेल आणि मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करेल. याबाबत दक्ष असावे.

: प्रधान सचिवांनी महापालिका आयुक्तांना काय दिले आदेश?

दरम्यान याबाबत प्रधान सचिवांनी आता महापालिका आयुक्तांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार  कार्यवृत्तामध्ये नमूद केल्यानुसार सर्व मुद्यांबाबत कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल याची व्यवस्था करावी. तसेच, आपण सदर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्येक १५ दिवसातून एकदा या प्रकल्पांचा उपांगनिहाय आढावा घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणीचे निराकरण करावे. प्रकल्पामधील बिल रेकॉडींग व बिल प्रदानाची कार्यवाही वेळोवेळी केली जाईल व त्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही, याकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे. सदर प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करणे ही बाब आपल्या २०२१-२२ च्या कार्यमुल्यांकन अहवालासाठी उद्दीष्ट म्हणून विचारात घेण्यात येईल. आपण सदर वरील प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये व्यक्तिगत लक्ष देऊन हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण होतील, याची सर्वंकष दक्षता घ्यावी.