PMC Pune | Contract employee Bouns | मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कंत्राटी कामगारांचे आंदोलन | कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेण्याचे मनपा प्रशासनाचे आश्वासन

पुणे:- महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाला पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य खाते, स्मशानभूमी कर्मचारी, कचरा वाहतूक चालक, पाणीपुरवठा व इतर अनेक विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

त्यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कामगार नेते सुनील शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेतील कायम कामगारांना 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुगृह अनुदान त्याच बरोबर वीस हजार रुपये अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. परंतु त्याचबरोबर कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कंत्राटी कामगार यांना मात्र काहीच देण्यात आलेले नाही. हा मनपा मधील कांत्राटी कामगारांवर खूप मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कामगारांनाही बोनस व इतर लाभ मिळवून देण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर या कंत्राटी कामगारांचे इतर अनेक एक प्रश्न आहेत तेही यावेळी उपस्थित करण्यात आले.

मागण्यांचे निवेदन महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चा मध्ये  शिवाजी दौंडकर यांनी कामगारांचा उर्वरित पगार दिवाळीपूर्वी करण्याचा इरादा जाहीर केला. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत माननीय आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी, विजय पांडव, जानवी दिघे, वेहिकल डेपोचे संदीप पाटोळे पाणीपुरवठा विभागाचे योगेश मोरे सोमनाथ चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Indefinite strike | Sunil Shinde | कंत्राटी कामगाराच्या विविध मागण्यासाठी 18 पासून बेमुदत धरणे आंदोलन  | राष्ट्रीय मजदूर संघाचा आक्रमक पवित्रा 

Categories
Breaking News PMC social पुणे

कंत्राटी कामगाराच्या विविध मागण्यासाठी 18 पासून बेमुदत धरणे आंदोलन

| राष्ट्रीय मजदूर संघाचा आक्रमक पवित्रा

पुणे | पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. कामगारांच्या विविध मागण्यासाठी 18 पासून महापालिका भवन समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली.
| या मागण्याचे निवेदन अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले
१) किमान वेतन कायद्याप्रमाणे झालेली वाढ सर्व कर्मचाऱ्यांना फरकासह त्वरित देण्यात यावी व समान कामासाठी समान वेतन कायम कामगारांप्रमाणेच देण्यात यावे.
२) सर्व कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच बोनस व सानुग्रह अनुदान द्यावे.
३) कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील.
४) प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला पगार देण्यात यावा
५) विनाकारण कामावरून काढलेल्या सुरक्षा रक्षकांना पुर्ववत कामावर घेण्यात यावे.
६) विनाकारण सुरक्षा रक्षकांच्या व इतर कंत्राटी कामगारांच्या पगारातून कपात करण्यात येत आहे. ती त्वरित थांबविण्यात
यावी.
७) पगार स्लिप मिळत नाही. आत्ता पर्यंतच्या प्रत्येक महिन्यांच्या पगार स्लिप प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावी.
८) ई. एस. आस. सी. कार्ड प्रत्येक कर्मचाऱ्याला त्वरित देण्यात यावे व आत्तापर्यंत झालेल्या दिरंगाईमुळे ज्या कर्मचाऱ्याचे
दवाखान्याचा खर्च किंवा वैद्यकिय बिले यावर झालेला खर्च कर्मचाऱ्याला देण्यात यावा.
९) म.न.पा. चे ओळख पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याला त्वरित देण्यात यावे.
१०) आजपर्यंत प्रा. फंडात जमा केलेल्या रक्कमेचा तपशील प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावा.
११) प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाला दोन ड्रेस, दोन जोडी बुट, टोपी, बेल्ट, शिट्टी, लायनर, रेणकोट, स्वेटर, टॉर्च व काठी त्वरित देण्यात यावी. त्याची रक्कम रोख स्वरूपात प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावी.
१२) १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, २ ऑक्टोंबर या दिवशी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता दिलेला नाही. तो
त्वरित अदा करावा.
१३) ज्या महिन्यामध्ये २७ दिवस काम केले आहे. त्या महिन्यात सुध्दा २६ दिवसांचाच पगार दिलेला आहे. तो राहिलेला पगार कर्मचान्याला देण्यात यावा.
१४) सणांच्या सुट्या म.न.पा.मधील कायम कर्मचाऱ्याप्रमाणेच देण्यात याव्यात.
१५) वर्षाला देण्यात येणाऱ्या पगारी रजांची सुची व संख्या त्वरित संघटनेकडे कळविण्यात यावी.
१६) सुट्टीच्या दिवशी व आठवडा सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा अतिकालिन भत्ता ( ओ.टी. ) त्वरीत देण्यात यावा.

Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागांमध्ये व कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा, साफसफाई विभाग, स्मशानभूमी कर्मचारी या व इतर अनेक विभागांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी  पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर इशारा सभेचे आयोजन राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या सभेला खूप मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांनी हजेरी लावली. यावेळी कंत्राटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोरदार पाऊस आला तरी या पावसातही इशारासभा चालूच राहिली. याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना चर्चेसाठी बोलावले व निवेदन स्वीकारले. यामध्ये या प्रश्नांसाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीमध्ये कंत्राटी कामगारांचे सर्व प्रश्न एकत्रित आपण समन्वयाने सोडू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या इशारा सभेमध्ये कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या
1) या दिवाळीला कायम कामगारांप्रमाणेच एक पगार व एकोणीस हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे.
2) किमान वेतन कायद्यामध्ये जाहीर केलेला फरक फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2021 हा मिळाला पाहिजे.
3) कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील.
4) कंत्राटी कामगार व कायम कामगार हे समान काम करत असल्यामुळे कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांच्या एवढाच पगार मिळाला पाहिजे.
अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या इशारासभेला राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबोधित केले. श्री शिंदे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या वर गुलामासारखी वागणूक पुणे महापालिकेमध्ये मिळत असल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला. कधीही कंत्राटी कामगारांचा वेळेवर पगार होत नाही. प्र. फंड व ई एस आय सी चे कार्ड देखील या कंत्राटी कामगारांना मिळत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही याची दखल संबंधित अधिकारी घेत नाहीत. याचा निषेध यावेळी व्यक्त केला. जर या कंत्राटी कामगारांचे प्रश्न वेळीच सोडवले गेले नाहीत तर मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी हे सर्व कामगार सकाळी दहा वाजल्यापासून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर निदर्शने आंदोलने करतील व त्यावेळी सर्व कांत्राटी कामगार यामध्ये सहभागी होतील असा इशारा दिला.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, पुणे मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, स्मशानभूमीचे कर्मचारी, कचरा वाहतूक करणारे वाहन चालक, अशा विविध खात्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांची इशारा सभा

| राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे

पुणे महानगरपालिका मध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार सध्या कार्यरत आहेत. मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात सुरक्षा रक्षक,वाहन चालक, पाणी पुरवठा, स्मशान भूमी,सफाई कामगार तसेच कार्यालयात लेखनिक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. या दिवाळीला मनपाच्या कायम कामगारांना ८.३३ टक्के बोनस म्हणजेच एक पगार व १९००० रूपये सानुग्रह अनुदान इतकी रक्कम मिळणार आहे.परंतू कंत्राटी कामगारांना काहीच मिळणार नाही हा मोठा अन्याय कंत्राटी कामगारांवर होत आहे.अशा सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच बोनस व सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील , कंत्राटी कामगारांना कायम कामगारांए्वढाच पगार द्यावा अशा मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे, त्यासाठी जास्तीत जास्त कंत्राटी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री सीताराम चव्हाण आणि सेक्रेटरी श्री. एस. के. पळसे यांनी केले आहे

Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- कामगार कायद्यातील बदलांमुळे रोजगारामध्ये वाढ होईल, असे केंद्रीय कामगार मंत्री यांनी पुणे येथे जाहीर केले. हा त्यांचा दावा पूर्णपणे हास्यास्पद आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले वास्तविक पाहता नवीन रोजगार निर्मिती होईल व त्यांना कायम काम मिळेल. असे कोणतेही धोरण व तरतूद कामगार कायद्यामध्ये नाही. याउलट कामगारांना कायम न करता, कोणतेही लाभ न देता, कसे काम करून घेता येईल असे “फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट” सारखा काळा कायदा करण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. यामुळे यापुढे कायम कामगार ही संज्ञा संपुष्टात येईल. अशी भीती कामगार वर्गात निर्माण झाली आहे. आठ वर्षांमध्ये किती कामगारांना कायम रोजगार मिळाला. ते कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. जर आकडेवारी आपण पाहिली तर असे निदर्शनास येते की, कायम कामगारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असून, त्याठिकाणी कंत्राटी कामगार व तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार, रोजंदार कामगार, असंघटित कामगार ही संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आपल्या देशात काम करत असणाऱ्या कामगारांपैकी 95 ते 97 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रांमध्ये आलेले असून 3 ते 5 टक्के कामगार हे फक्त संघटित क्षेत्रामध्ये राहिले आहेत. परंतु कामगार कायद्यातील नवीन होऊ घातलेल्या धोरणामुळे कायम कामगार संख्या संपुष्टात येऊन, फक्त रोजंदारी, कंत्राटी आणि असंघटित कामगार हेच त्या ठिकाणी राहतील. त्यामुळे कामगारांना कोणताही फायदा मिळणार नाही.

दुसऱ्या बाजूला असंघटित कामगारांची नोंदणी केली. अशा बढाया कामगार मंत्री मारत आहेत. कोरोना महामारी च्या, लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशांमध्ये असंघटित कामगारांची अवस्था काय आहे. हे जगाने पाहिले आहे. त्या वेळेला सामाजिक संस्था, कामगार संघटना, न्यायालय यांनी सरकारला जाब विचारल्यावर, मग या कामगारांची नोंदणी करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केलं. आणि म्हणून ईश्रम पोर्टल या नावाखाली अनेक कामगारांची नोंदणी केली, परंतु या पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना सरकारने काय दिले? तेही कामगार मंत्र्यांनी जाहीर करावे. या सर्व कामगारांना कोणताही फायदा आतापर्यंत देण्यात आलेले नाही. किंबहुना आहे ते कामगार कायदे शिथिल करायचे, कामगार संघटना कमजोर करायच्या आणि उद्योग धारजिने धोरण स्वीकारायचे. असे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.

असंघटित कामगारांमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर सामील झाला आहे. त्याच्यामध्ये स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर यासारख्या कंपन्या कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा करायचं काम कोठेही कामगारमंत्री करीत नाहीत. आणि म्हणून नवीन कामगार धोरणामुळे व कामगार कायद्यामध्ये होऊ घातलेल्या सुधारणांमुळे देशांमध्ये रोजगार निर्मिती होईल, हे केंद्रीय कामगार मंत्री यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आता तरी त्यांनी जागे होऊन या सर्व कामगारांना, कामगार संघटना ना भेट देऊन, चर्चा करून, त्यावर अपेक्षित बदल ते सर्वसमावेशक करावेत. असे कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.

contract workers in the crematorium | स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक

Categories
PMC पुणे

स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक

| कामगारांना विविध सुविधा देण्याची केली गेली मागणी

पुणे महानगर पालिकेतील स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (देखभाल व दुरुस्ती)  श्रीनिवास कंदूल यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीमध्ये आपल्या संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, स्मशान भूमी कर्मचाऱ्यांचे नेते, बाबा कांबळे व इतर पदाधिकारी, कंत्राटदार अधिकारी हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले.

पगार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला देण्याचा आदेश कंत्राटदाराला करण्यात आला.  कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याला नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी त्याच्या पदापेक्षा वेगळे काम सांगू नये. असे आदेश दिले. विनाकरण कोणाचीही बदली करू नये. अचानक कामाच्या ठिकाणमध्ये बदल करू नयेत.
कोणतेही अतिरिक्त काम कर्मचाऱ्यांना सांगू नये.

प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार स्लिप, सुरक्षेची सर्व साधने, ई एस आय सी कार्ड व प्रॉ. फंडाचे डिटेल्स कंत्राटदाराने प्रत्येक कर्मचाऱ्याला द्यावेत असे आदेश कंत्राटदाराला यावेळी दिला.

कामगार नेते सुनील शिंदे साहेबांनी 2015 ते 2021 या कालावधीचा राहिलेल्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम द्यावी.  15 ऑगस्ट, 26 जानेवारी, एक मे आणि दोन ऑक्टोबर, या राष्ट्रीय सणांचा डबल पगार, एक सुट्टी देण्यात यावी, रजा व बोनस कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. अशी मागणी कंदुल यांच्याकडे केली.
या मागण्यांबाबत  कंदुल यांनी आपण मनपा आयुक्त यांच्याकडे ही बाब निर्णयासाठी पाठवू. असे सांगितले व यासंदर्भात आयुक्तच निर्णय घेतील असे सांगितले.

RMS | देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे | उदित राज

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे – उदित राज

पुणे| – देशांमधील अनेक मोठ्या संघटना कमजोर झाल्या असताना राष्ट्रीय मजदूर संघासारखी संघटना कामगारांसाठीचा लढा ताकदीने देतेय, वाढतेय हे कौतुकास्पद आहे. हा लढा अजून वाढावा अशा शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या असंघटित कामगारांचे नेतृत्व करणार्‍या असंघटित कामगार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार उदित राज यांनी दिल्या. मागील २२ वर्षे अविरतपणे कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘असंघटित कामगारांची एकूण संख्या देशभरात ४५ कोटींच्या आसपास आहे. नोटबंदी, जीएसटी य़ासारख्या केंद्र सरकारच्या देशविघातक निर्णयांमुळे हा वर्ग पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. यासोबतच महागाई मुळे या वर्गाचे जगणे अधिकच मुश्किल झाले आहे. हा वर्ग गंभीर संकटात असताना दुसरीकडे या देशातील भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. कामगारांना काहीही सुविधा किंवा मदत न देणारे सरकारने या भांडवलदारांचे मात्र लाखो करोडो रूपयांचे कर्ज माफ केलेले आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे कामगार कायदे लागू करण्यात आलेले नाहीत कारण सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढू इच्छित नव्हते. पण हे नवीन कामगार कायदे आल्यानंतर कामगारांचे जे काही हक्क आहेत ते सर्व हक्क संपतील.
देशातील कामगार आणि इतर जनतेला त्यांच्या या मूळ समस्यांवरून भरकटविण्यासाठी हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्या जात आहेत, देशामध्ये धर्मांध वातावरण तयार केल्या जात आहेत. आपल्या हक्कांसाठी लढत असताना कामगारांनी या धर्मांधतेच्या हल्ल्याला वेळीच ओळखून याविरोधात लढा दिला पाहिजे. देशामध्ये हे धर्मांध वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक घरामध्ये दोन कार्यकर्ते आहेत – एक न्यूज चॅनेल आणि दुसरे वर्तमानपत्र. या दोन्हींपासून दूर राहत कामगारांनी आपले प्रश्न सोशल मिडिया मार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे.

देश हा विपक्ष मुक्त व्हावा असा प्रयत्न केला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडल्या गेले ते त्याचेच उदाहरण आहेत. विपक्ष मुक्त झाला तर या देशातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्यासाठी लढण्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही. मुळातच केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विरोधात आहेत. याचे अजून एक उदाहरण म्हणजे आता मंत्री, खासदार यांना काहीही अधिकार राहिलेले नाहीत. सर्व कारभार हुकूमशाही पद्धतीने फक्त प्रधानमंत्री कार्यालयातून चालत असल्याने मंत्र्यांना निवेदन देऊन आता काहीही फायदा हो नाही. कॉंग्रेसच्या काळात विविध मंत्र्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सर्व सामाजिक संस्था, कामगार संघटना संपविण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत. यासोबतचं कामगारांच्या मूलभूत बाबी जसे शिक्षण, पेंशन इ. वरचा खर्च केंद्र सरकार दरवर्षी कमी करत आहेत. अश्या परिस्थितीत जर भाजप सत्तेवर राहिला तर कामगारांना काहीही मिळणार नाहीत. हे सरकार भांडवलदारांना सोडून कुणालाही काहीही देत नाही. अश्या परिस्थितीत कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्रात सत्ता परिवर्तन हाच एक पर्याय आहे. कामगार संघटनांना सुध्दा जिवंत राहायचे असेल तर यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कामगरांचा फक्त आर्थिक स्वार्थ न बघता कामगारांनी व्यापक राजकीय भूमिका घ्यावी यासाठी संघटनांना प्रयत्न करावा लागेल. यामध्येच कामगार वर्गाचे आणि देशाचे ही हित आहे.

राष्ट्रीय मजदूर संघाचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्त संघटित व असंघटित कामगारांचा मेळावा, कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष डॉ उदित राज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार संग्राम थोपटे, कामगार राज्य विमा महामंडळ पुणे प्रदेशाचे उपनिदेशक हेमंत पांडे, प्रदेश काँग्रेस समन्वयक प्रज्ञा वाघमारे, एडवोकेट अभय छाजेड, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, सुरक्षारक्षक, मनपा मधील कंत्राटी चालक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, कंत्राटी सुरक्षा रक्षक, त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉस्पिटल, कंपन्या, कारखाने येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर, अशी पदयात्रा संघटनांचे बॅनर हातामध्ये घेऊन काढण्यात आली.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी संग्राम थोपटे यांच्याकडे करण्यात आली. त्याच बरोबर बदलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करू नये त्यामध्ये कामगार विरोधी निर्णय रद्द करावे अशी मागणी यावेळी केली. कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढे वेतन द्यावे, माथाडी कामगारांना कामगार राज्य विमा महामंडळ चे सर्व फायदे द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात तात्काळ आपण पुणे महापालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बैठक घेऊ व इतरही कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना दिले ते पुढे म्हणाले राष्ट्रीय मजदूर संघाने विविध क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे यापुढेही त्यांनी असेच काम चालू ठेवावे त्यासाठी लागणारी राजकीय शक्ती पूर्णपणे सुनील शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्याचे काम आमच्याकडून केले जाईल व त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू असेही त्यांनी सांगितले व संघटनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कामगार मेळाव्यात हेमंत पांडे यांनीही आपले विचार व्यक्त केले व कामगार राज्य विमा महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत यावेळी माहिती दिली.
मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन निता परदेशी यांनी केले व आभार प्रदर्शन एस के पळसे यांनी केले.

Municipal contract workers | मनपा कंत्राटी कामगार गुलाम नाही |  कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कंत्राटी कामगार गुलाम नाही |  कामगार नेते सुनील शिंदे

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारा मार्फत, सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार पुणे महापालिकेतील सुरक्षा विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, वाहन चालक, स्मशान भूमी, वेगवेगळ्या महापालिकेचा आस्थापना, यामध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. महानगरपालिके मध्ये हे सर्व कामगार गेली दहा ते पंधरा वर्षापासून सलग कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. पुणे शहरात आलेल्या वेगवेगळे आपत्तीमध्ये पूर परिस्थिती, कोरोना महामारी, अतिवृष्टी त्यांनी आपली सेवा व कर्तव्य योग्य बजावले आहे. परंतु त्यांचा व्हावा तेवढा सन्मान मात्र झालेला नाही. आजही या सर्व कामगारांना तात्पुरते कामगार किंवा कंत्राटी कामगार म्हणून हिणवले जाते. गुलामासारखी वागणूक मिळते. ही बाब चीड आणणारी आहे. त्याच बरोबर या सर्व कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व फायदे व पगार देणे कायद्याने बंधनकारक असून, ते देण्यासाठी, मिळवून घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध आहे. असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा पत्रकार भवन येथील हॉलमध्ये पार पडला, यावेळी ते बोलत होते. कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे समान काम समान वेतन हे दिले गेले पाहिजे, त्याच प्रमाणे बोनस व पगारी सुट्ट्या व इतर आर्थिक लाभ हे कायम कामगार प्रमाणेच मिळाले पाहिजे, हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. कारण हे सर्व कामगार कायम कामगारांच्या बरोबरीने काम करीत आहेत. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाने, वेळोवेळी तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केला आहे.

किमान वेतन कायद्याच्या दरामध्ये 24/ 2 /2015 पासून वाढ झाली. परंतु ही सर्व वाढ या कंत्राटी कामगारांना 16 फेब्रुवारी 2021 पासून लागू करण्यात आली. जवळजवळ सहा वर्ष पगार वाढ होऊनही, या कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. हा सर्व फरक देणे महापालिकेला बंधनकारक असून, याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाने आदेश काढले आहेत. किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनाचा फरक हा कामगारांचा हक्क असून, तो दिलाच पाहिजे. जर याबाबत सकारात्मक निर्णय महापालिकेने लवकरात लवकर घेतला नाही. तर महापालिकेसमोर मोठे आंदोलन कंत्राटी कामगारांकडून केले जाईल. असे यावेळी सुनील शिंदे यांनी सांगितले. त्याबरोबर ते पुढे म्हणाले की, कंत्राटी कामगार हा तात्पुरता कामगार नाही, कंत्राटी कामगार हा पण कायम कामगारच आहे. त्याला केव्हाही कामावर ये आणि कामावरून काढून टाक, असे करता येणार नाही. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर असून, या विरुद्धही आपण लढा देत आहोत.

या मेळाव्यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे त्याच बरोबर कंत्राटी कामगार प्रतिनिधी विजय पांडव, संदीप पाटोळे, बाबा कांबळे, सचिन भालेकर यांनी त्यांच्या विभागातील अडचणी यावेळी बोलताना मांडल्या.
या मेळाव्यामध्ये संजीवन हॉस्पिटल मधील संघटनेच्या अध्यक्ष मेघा वाघमारे व वाडिया कॉलेज युनियनचे सेक्रेटरी संतोष शिंदे यांनी त्यांचे अनुभव कथन केले. या मेळाव्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Security Guard Issues | मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा सुरक्षारक्षकांना न्याय देणार |अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार

पुणे :- महानगरपालिकेतील सुरक्षारक्षकांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघाने अनेक तक्रारी केल्या होत्या व आंदोलने केली होती. या सर्वांची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक घेतली. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असा विश्वास यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

या बैठकीला सुरक्षारक्षक विभागाचे प्रमुख व मनपा उपायुक्त माधव जगताप, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, सुरक्षारक्षक प्रतिनिधी विजय पांडव, जानवी दिघे, उज्वल साने, अरविंद आगम स्वप्नील कामठे, उमेश कोडीतकर, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक  काळे हे उपस्थित होते.

यावेळी सुरक्षारक्षकांना कधीच वेळेवर पगार मिळत नाही, कामगार कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोयी सवलती मिळत नाहीत, ड्रेस, बूट, स्वेटर, काठी, सिटी इत्यादी साहित्य मिळत नाही. किमान वेतन कायद्यामध्ये झालेल्या वाढीच्या दराचा फरक मिळत नाही. कोणतेही कारण न सांगता पगारातून कपात केली जाते, कामावरून काढून टाकण्यात येते, अशा सर्व तक्रारींचा पाढा यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त  यांच्या समोर वाचला. या सर्व बाबींकडे महापालिकेकडून हेतुपुरस्सर डोळेझाक होत असल्याचा आरोप यावेळी शिंदे यांनी केला.

या सर्व प्रश्नांची गंभीर दखल कुणाल खेमनार यांनी घेतली. वेळेवर पगार करण्यास संदर्भातली व इतर सोयी सवलती व सुरक्षेची साधने देण्यासंबंधी चे आदेश संबंधित कंत्राटदाराला दिले. जर कंत्राटदाराने दिलेले आदेश पाळले नाहीत तर संबंधित कंत्राटदारा वर कडक कारवाई करण्यासंदर्भातले आदेश देण्यात येतील, असे सांगितले. सुरक्षारक्षकांनी आपले काम व्यवस्थित पार पाडावे त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत महापालिका संरक्षण करेल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले व कामगार कायद्यामध्ये असणाऱ्या विविध सवलती बाबत कामगार उपायुक्त कार्यालय पुणे यांचे कडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही खेमनार यांनी या बैठकीत सांगितले.

contract workers | कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा पगार द्या

Categories
Breaking News PMC पुणे

“कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा पगार द्या”

-कामगार नेते सुनील शिंदे

पुणे | कंत्राटी कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व सेवा सवलती व पगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असेल असे कामगार नेते सुनील शिंदे यांनी यावेळी सांगितले. ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला तर त्यासाठी चालकांनी तयार रहावे, असे यावेळी शिंदे यांनी   सांगितले.

पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी चालकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुणे महानगरपालिकेतील विविध आस्थापनांमध्ये काम काय करणारे कंत्राटी चालक उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी राष्ट्रीय मजदूर संघाचा नाम फलकाचे उद्घाटन व्हेईकल डेपो, गुलटेकडी मार्केट यार्ड येथे कामगार नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कंत्राटी चालकांचा मेळावा पार पडला.

मेळाव्याचे सूत्रसंचालन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन संघटनेचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले.
या मेळाव्यामध्ये चालकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार यांबाबत माहिती दिली. सर्वांपासून संरक्षण देण्याची व कामगार कायद्यातील सर्व फायदे मिळवून देण्याची मागणी केली.

कामगार नेते सुनील शिंदे यांनी या सर्व कंत्राटी कामगारांना कोणीही कामावरून काढणार नाही, यासाठी संघटना सदैव तत्पर राहील, असे सांगितले. सर्व कंत्राटी चालकांना, कामगार कायदा प्रमाणे मिळणारे सर्व फायदे मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले. चालकांच्या प्रश्नांसाठी जर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर मोठे आंदोलन देखील छेडण्याचा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला. देशातच कंत्राटीकरण चालू असून या कंत्राटी कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारी धोरणच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून आखले जात आहे, ही कामगार क्षेत्र बाबत अतिशय गंभीर बाब आहे. त्याचा राष्ट्रीय मजदूर संघातर्फे निषेध करण्यात येत आहे.
कंत्राटी कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व सेवा सवलती व पगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असेल असे यावेळी त्यांनी सांगितले. ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला तर त्यासाठी चालकांनी तयार रहावे, असे यावेळी सांगितले.