PMPML | NCP | पी.एम.पी.एम.एल ची सेवा पूर्ववत करण्यात यावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

पी.एम.पी.एम.एल ची सेवा पूर्ववत करण्यात यावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

पी.एम.पी.एम.एल ला सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने आज पी.एम.पी.एम.एल.चे व्यवस्थापक ओमप्रकाश बकोरिया यांना केली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसचे संचलन पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व जवळपासच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात होत असते. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिकांची वाहतुकीची उत्तमरीत्या सोय होत असून, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सेवेला पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून संबोधले जाते.

काल दिनांक ०५/०३/२०२३ रोजी दुपार पाळीनंतर भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांनी अचानकपणे संप पुकारलेला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. तसेच १० वी व १२ वी च्या परीक्षा चालू असून या संपाची झळ विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात बसलेली आहे. पर्यायाने परीक्षेला जाणे-येणेकरीता अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

परिवहन महामंडळाच्या भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी याबाबत तातडीने बैठक घेऊन बसेस कशा पध्दतीने पुर्ववत सुरू करता येतील, याकरीता निर्णय घेणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी सल्ला मसलत करून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांची झालेली गैरसोय दूर करणेकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी खंबिरपणे उभी असून याकरीता सर्वतोपरी आपणास मदत करण्यास आम्ही तयार आहोत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुर्ववत सुरू करून पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

 

Maharashtra Samman Parishad | ३ फेब्रुवारी पासून पुणे येथून महाराष्ट्र सन्मान परिषदेस सुरुवात

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

३ फेब्रुवारी पासून पुणे येथून महाराष्ट्र सन्मान परिषदेस सुरुवात

“आवाज बहुजनांचा , सन्मान महाराष्ट्राचा..!!” या ब्रीद वाक्यासह सुरू होत असलेल्या महाराष्ट्र सन्मान परिषदेचा शुभारंभ शुक्रवार, दि.०३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातून होत आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे होत असलेला हा कार्यक्रम ज्येष्ठ कामगार नेते मा.डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून ,मा.गृहनिर्माणमंत्री.डॉ.जितेंद्र आव्हाड,शिवसेना उपनेत्या मा.सौ.सुषमा अंधारे , सुप्रसिद्ध शाहिर मा.श्री.संभाजी भगत ,सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या मा.ॲड.सौ.वैशाली डोळस हे प्रमुख वक्ते या कार्यक्रमासाठी लाभणार आहेत. अशी माहिती पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचा , येथील महापुरुषांचा अवमान होईल या पद्धतीची कृती या राज्यात सातत्याने घडत आहे.या सर्व अवमानानांचा निषेध करण्यासाठी व अश्या प्रकारच्या प्रवृत्तींना खऱ्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी ही यात्रा घेण्यात येत असल्याचे यात्रेचे संयोजक प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या यात्रेसाठी लोकायत , अखिल भारतीय मराठा महासंघ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच भारतीय बौद्ध महासंघ ,म. फुले समता परीषद ,गणराज्य संघ, जमाईत उलेमा ए हिंद , मातंग एकता आंदोलन ,मुलनिवासी मुस्लिम मंच , लहुजी समता परिषद , रिजनल ख्रिश्चन सोसायटी , माळी महासंघ ,हमाल पंचायत पुणे मर्चेंट संघटना, अखिल छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड युनियन, छत्रपती शिवाजी टेम्पो संघटना महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान अंगमेहनतीची कष्टकरी संघर्ष समिती,युवा मातंग सेवा संघ, राष्ट्रीय बहुजन महासंघ,पुणे महासंघ,कागद-काच – पत्रा पंचायत आदी सहयोगी संस्था या यात्रेत सहभागी होतील.
प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , महेश शिंदे इ प्रमुख पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थीत होते

Divyang and senior citizens | दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

| राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका

पुणे| दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आजचे आंदोलन कोणाच्याही विरूद्ध नसून जेष्ठ आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाने वयोश्री योजनेअंतर्गत तपासणीचा संपूर्ण देशात विक्रम केला आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी ही योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिकांच्या खर्चातुन ही योजना संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी पाहून केंद्र शासनाला शंका आली. त्यामुळे तपासणीसाठी एक स्पेशल टिम पाठवण्यात आली होती. त्या टीमने सुद्धा लाभार्थी संख्या योग्य असल्याचे मान्य केले आहे.

साहित्य वितरण होत नसल्यामुळे आपण स्वतः केंद्रिय मंत्र्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यात पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. कारण आपल्यासाठी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांची सेवा महत्वाची आहे. असे असूनही इतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप होत असून महाराष्ट्राला मात्र डावलण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातही काही ठराविक जिल्ह्यात याचे वाटप झाले आहे. असे असेल, तर केंद्र सरकारची ही योजना देशातील दिव्यांगासाठी आहे की कुठल्या राजकीय पक्षासाठी आहे. याचा खुलासा व्हायला, अशी मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.

शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे त्याचवेळी मावळ आणि पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचे खासदार असूनही केवळ राजकारणासाठी त्या दोन खासदारांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा सवाल करत सुळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ”याच केंद्र सरकारने, ‘दिव्यांगाना लाभपासून वंचित ठेवणे गुन्हा आहे’, असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार आहे. केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी”.
महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

NCP Pune | पथ विभागाच्या टेंडर वरून राष्ट्रवादीचे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

पथ विभागाच्या टेंडर वरून राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune)  रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत (Road repairing Tender) सुरू असलेल्या भाजपच्या (BJP) हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने पुणे महानगर पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

याबाबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुणे शहरातील विविघ भागातील रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार ,माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत याची सर्व वर्तमानपत्रांनी दखल घेत याबाबतचे वृत्त प्रसारित होऊनही हा प्रकार थांबलेला नाही. गेल्या ५ वर्षात सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सुरू असलेले “टेंडरराज” राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा सुरू झाले असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररुपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. (PMC Pune)

या निविदेतील अटी -शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिका-यांची चौकशी करावी या मागणी करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात आले.
व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट धेवून यासंदर्भात त्वरीत योग्य तो निर्णय ध्यावा, ही मागणी करण्यात आली.

सदर आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप , आमदार चेतन तुपे ,सौ. राजलक्ष्मी भोसले योगेश ससाणे, फारूक ईनामदार , सुनिल बनकर ,गफूर पठान , प्रदीप गायकवाड , महेन्द्र पठारे , चंन्द्रकांत कवडे , शंतनू जगदाळे , अमर तुपे , संदीप बधे , पुनम पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते. (NCP Pune)

NCP Strike | हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे आज विधान सभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली योगेश पवार सुशांत ढमढरे, गणेश दामोदरे, गौरव घुले, आदीसह बेमुदत आमरण उपोषण आज सुरू करण्यात आले.

वारंवार पर्वती जलकेंद्रातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची उंची भरत नसल्यामुळे, वीज विद्युत वितरण कडून खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे, मुख्य पाईपलाईनचे गेट पडल्यामुळे, तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या विविध कारणे रोज अधिकारी देत असल्यामुळे त्याला वैतागून स्थानिक नागरिक, महिला, यांच्यासह पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह उपोषणास सुरुवात झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून पर्वती मतदार संघातील बिबेवाडी या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्वच भागाला पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे विशेष करून प्रभाग क्रमांक जुना 28, 36, 35, 37, 39 या प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे तर काही ठिकाणी पाणी येत नाही त्याच्या मुळे नागरिक त्रस्त झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या संदर्भामध्ये 9 मे 2022 रोजी देखील दोन दिवसांचे उपोषण केलं होतं काही दिवस समस्या सुटल्या परंतु त्या पुन्हा उदभवू लागल्या आहेत. त्याकरिता हे उपोषण सुरु करण्यात आले.

आंदोलनाला दुपारी मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पुणे शहर अनिरुद्ध पावसकर व त्यांचे खात्याचे संबंधित अधिकारी यांनी आंदोलन स्थळला भेट दिली. तसेच यावेळी नागरिकांनी महिलांनी तसेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या अडचणीचा पाढा त्यांच्यासमोर मांडला व त्यांनी देखील पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, त्रुटी येत्या येत्या शनिवार पर्यंत सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसे लेखी पत्र उप अभियंता अजित नाईकनवरे व सौ अंजुषा रेड्डी यांनी दिले.

आपण जर दिलेल्या मुदतीत समस्या सोडविल्या नाहीतर अत्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विधासभा अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिला.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रविंन्द्र माळवदकर , महेश शिंदे, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब अटल, दिलीप अरुंदेकर, समीर पवार, संजय दामोदरे, विजय बगाडे, राहुल गुंड, सतीश धर्मावत, विनय पाटील, विद्या ताकवले, रुपाली बिबवे, राणी दामोदरे, अमोल ननावरे, लखन वाघमारे, तुषार शेषनाईक, राजेंद्र चोरघे, शंकर सहाणे,प्रतिक कोंडे,अमोल शिंदे, कृणाल गायकवाड, सौरभ माने, संतोष पोले, अविनाश शिखापुरे , अमोल परदेशी, संदेश नाक्ते आदी पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते

G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

Categories
Breaking News PMC Political पुणे

G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

G20 परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या कामांबाबत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण सुशोभीकरणावर आक्षेप नोंदविला आहे.

जगताप म्हणाले, “G20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील सुमारे वीस देशांचे प्रतिनिधी व मंत्री गट देशात येत आहेत. देशभरात घेण्यात येणाऱ्या विविध शहरातील बैठकांमध्ये पुणे शहराचा देखील नंबर लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या २० देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करते.या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुणे शहराचे १५ दिवसात रूप बदलण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु ज्या २० देशातील प्रतिनिधी भारतात येणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून जो काही ओवर नाईट विकास सुरू आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्षेप आहे. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे गेल्या पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अक्षरश: पडदे लावत लपवाछपवी सुरू केली आहे.

आज G20 परिसराच्या निमित्ताने शहराची अवस्था सुधारण्याच्या नादात पुणे महानगरपालिका प्रशासनाची जी दमछाक होत आहे, त्याचे कारण केवळ गेल्या पाच वर्षातील भारतीय जनता पार्टीने पुणेकरांच्या पायाभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल यांची घाईगडबडीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. कित्येक ठिकाणी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच राडा- रोडा उचलला गेला आहे. कित्येक ठिकाणी राडा- रोडा उचलता न आल्याने पडदा टाकून तो कचरा झाकण्यात आलेला आहे. एकूणच काय तर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पाहुण्यांच्या डोळ्यातच धूळफेक केली जात आहेत.
पुणे महानगरपालिकेचे वार्षिक बजेट दहा हजार कोटींचे असले तरी या पुणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात विकास कामांचा राहिलेला बॅकलॉग म्हणून भरून काढण्यासाठी काही हजार कोटींची आवश्यकता असताना राज्य सरकारने अवघे 50 कोटी रुपये पाठवून पुणे शहराच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, राज्यातील सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या टॉप फाईव्ह शहरांपैकी एक शहर, आयटी हब, राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात नियमितपणे टॅक्स भरणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी ज्या गोष्टी गेल्या ५ वर्षात केल्या गेल्या नाहीत, त्या गोष्टी या पाहुण्यांसाठी केल्या जात आहेत. ठराविक पक्षाचा लोगो, पक्षाच्या नेत्यांचे फोटो डोळ्यासमोर ठेवत करण्यात आलेली रंगरंगोटी ही अक्षरशः हास्यस्पद आहे. पुणे विमानतळाच्या समोरचा रस्ता देखील कापड टाकून झाकण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी या पाहुण्यांची राहण्याची सोय आहे, त्या सेनापती बापट रस्त्यावरील काही ठिकाणे देखील शेडनेटचा कपडा टाकून झाकण्यात आलेली आहेत. गेल्या पाच वर्षात पुणेकरांच्या टॅक्सरुपी पैश्याची केवळ मर्जीतील ठेकेदारावर टेंडरद्वारे उधळपट्टी करत आपले खिसे भरणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींचे अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे.

यातील निकृष्ट दर्जाच्या कामांचा पडदा फाश करण्यासाठी उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दररोज एका ठिकाणी लाईव्ह करणार आहे. या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या टॅक्सरुपी पैश्यांची करण्यात आलेली उधळपट्टी, पाच वर्षात पुणेकरांना ज्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, अशी सर्वच ठिकाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना लाईव्ह दाखवणार आहे”.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, “जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे.सरकारी कार्यक्रम आहे.भारताला त्याचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाचीच बाब आहे.मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष या परिषदेचे राजकीयीकरण करत आहे.प्रशासनही त्यांचेच सर्व ऐकत आहे.परिषदेच्या पुण्यात बैठका होत असून त्यासाठी पुण्याचे खासदार, आमदार यांनाही साधे निमंत्रणसुद्धा दिलेले नाही.लोकप्रतिनिधी असलेल्यांचे त्यांच्या स्वत:च्या शहराबद्दल काय म्हणणे आहे हे संयोजक म्हणून केंद्र सरकारने ऐकून तरी घ्यायला हवे होते, मात्र प्रशासनावर त्यांचा दबाव असल्याचे दिसते आहे. महापालिका आयुक्तांना आपण खासदार म्हणून स्वत: सहभाग तसेच शहरात सुरू असलेल्या दिशाहिन सुशोभीकरणाबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांचा ‘सगळे चांगले आहे’ असा आश्चर्यकारक प्रतिसाद आला.हा सरकारी कार्यक्रम आहे तर भाजपने त्यासाठी समन्वय समिती कशी स्थापन केली? राजकीय व्यक्ती नको असे असेल तर मग या तथाकथित समन्वय समितीच्या प्रमुखाला थेट परिषदेत सहभाग कशासाठी?त्यांना तिथे स्थान कसे काय दिले जाते?”

Ajit Pawar | NCP Pune | पुणे राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे शहरात दाखल झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

“एकच वादा.. अजितदादा…” ,”आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे..” , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करण्याची एक मालिका सुरू आहे, यावेळी पुणे शहर भाजपमधील एकाही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अशी भूमिका मांडल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अजितदादांच्या विरोधात आंदोलने केली यावर अजितदादांनी मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” याच नावाने संबोधनार, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी घेतली. या भूमिकेचे स्वागत करत, आदरणीय अजितदादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते बारामती होस्टेल येथे अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी आलो आहोत” ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.

प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर , बाळासासाहेब बोड़के , निलेश निकम , उदय महाले , शारदा ओरसे , गफूर पठान , रुपाली पाटील , विनोद पवार , संदीप बालवडकर, महेश हंडे , दिपक कामठे, रोहन पायगुडे , गुरूमीत गिल यांसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.

NCP Women Wing | उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने उद्या दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे.

शहर राष्ट्रवादी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तत्कालीन समाज सुशिक्षित झाला त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या जागरामुळे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचारा विरोधात समाज पेटून उठला व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यात आल्या व एका आदर्श समाजाची निर्मिती फुले दांपत्याकडून त्यावेळी करण्यात आली.

आजच्या काळात गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारी च्या अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असून, संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार असून ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व तालुक्यात जाणार आहे.

गेल्या ९ वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल , डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, सर्वसामान्य लोकांच्या खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळविण्याचे सुरू असलेले उद्योग व राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवरती समाजाचे जागर करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे. पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जन -जागर यात्रेचा शुभारंभ उद्या दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असे करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार आहे, माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशालीताई नागवडे, मृणालिनी वाणी, आशा मिरगे यादेखील यांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Kasaba By-Election | ही पुण्याची राजकीय संस्कृती नाही | कसबा पोटनिवडणूक वरून प्रशांत जगताप यांनी स्वपक्षातील लोकांना सुनावले

Categories
Breaking News Political पुणे

ही पुण्याची राजकीय संस्कृती नाही | कसबा पोटनिवडणूक वरून प्रशांत जगताप यांनी स्वपक्षातील लोकांना सुनावले

पुणे | पुण्याच्या माजी महापौर आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र त्यांचा दशक्रिया विधी होण्या अगोदर राष्ट्रवादीतील (NCP) काही मंडळी आमदारकी साठी बाशिंग लावून बसले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (city president prashant jagtap) यांनी अशा कार्यकर्त्याना सुनावले आहे. ही पुण्याची संस्कृती (Punes culture) नाही. त्यामुळे या चर्चा बंद करा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधान सभा मतदार संघाची (kasaba constituency)  जागा रिक्त झाली आहे. इथे पोट निवडणूक होणे अपेक्षित आहे. असे असले तरी त्यांचा दशक्रिया विधी होण्या अगोदर निवडणुकी बाबत चर्चा होऊ लागली आहे. काही पक्ष त्यांच्या घरातील उमेदवार बिनविरोध निवडून द्या म्हणतात. तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे आव्हान दिले आहे. मात्र यावरून उलट सुलट चर्चना उधाण आले आहे. यावरून यामध्ये राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उडी घेतली आहे. जगताप यांनी स्वपक्षातील लोकांसोबत दुसऱ्या पक्षातील लोकांनाही सुनावले आहे. जगताप म्हणाले, मुक्ता टिळक यांना जाऊन काहीच दिवस झाले तर लगेच त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चर्चांना उधाण आले आहे. अशी पुण्याची राजकीय संस्कृती नाही. मी आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना याविषयी चर्चा न करण्याचे आदेश दिले आहेत. (kasaba constituency by election)

Layoff of Contract employees | ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा पुणे महापालिकेवर मोर्चा

Categories
Breaking News PMC Political पुणे

४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा पुणे महापालिकेवर मोर्चा

ठेकेदारांच्या हितासाठी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेचे कारण देत काढून टाकणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे (NCP Pune) महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना ४५ वर्ष वय झाल्याचे कारण देत कामावरून कमी करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, केंद्र शासनाने निवृत्तीचे वय ६० व ५८ वर्ष निश्चित केलेले असताना पुणे महानगरपालिका प्रशासन केवळ ठेकेदारांच्या हितासाठी मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना अचानकपणे या वयात कामावरून काढून टाकत त्यांच्यावर उपासमारीचे संकट पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामुळे येणार आहे. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात रोजगार तर मिळाले नाहीत परंतु आहेत ते रोजगार कसे जातील याकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे. तसेच येत्या काही दिवसात स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील अशाच प्रकारे कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांमुळे या शहराची संपूर्ण घडी व्यवस्थितपणे चालते त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत बेरोजगार करण्याचे पाप पुणे महानगरपालिका प्रशासन करत आहे या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दांमध्ये निषेध करते. तसेच सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीचे निवेदन या मोर्चाच्या वेळी यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आले.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सौ.नंदा लोणकर,योगेश ससाने, रुपालिताई पाटील , प्रदीप देशमुख,प्रदीप गायकवाड ,अशोक कांबळे,वनराज आंदेकर,नितीन कदम,मृणालिनी वाणी,किशोर कांबळे , आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.