PMC Election | BJP | NCP | बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप  विरोधात नाराजी!

Categories
Breaking News PMC Political पुणे

बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप  विरोधात नाराजी

: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आता प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीकडे  लक्ष देण्यास सुरुवात

पुणे : महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असली तरी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूकपूर्व घडामोडींना वेग आला आहे. शहरातील बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप भारतीय जनता पार्टी विरोधात असलेली नाराजी  बैठकांमधून जाणवते आहे. त्यामुळेच इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वजण एक दिलाने काम करतील व येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेत असेल” असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी व्यक्त केला.

 

गेल्या दोन वर्षांमध्ये सातत्याने पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवणारा प्रमुख पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुणे शहरात ओळख निर्माण झाली आहे. सातत्याने होणारी आंदोलने , फेसबुक लाईव्ह, समाविष्ट गावांमधून येणारे मोर्चे या सर्वांमुळे पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता प्रभागनिहाय संघटनात्मक बांधणीकडे देखील लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

“निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुका कधीही झाल्या तरी आदरणीय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज आहे”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले आहे. कालपासून शहरातील सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी सर्व पदाधिकारी , इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांसमवेत बैठका सुरू केल्या असून शहरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुकांची मोठी संख्या आहे.

“गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत असतानादेखील अपेक्षित कामगिरी करता आली नाही, त्यामुळे शहरातील बहुतांश प्रभागात सत्ताधारी भाजप भारतीय जनता पार्टी विरोधात असलेली नाराजी या बैठकांमधून जाणवते आहे. त्यामुळेच इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सर्वजण एक दिलाने काम करतील व येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेत असेल” असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी व्यक्त केला. काल कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७,१८,२८,२९ या प्रभागनिहाय बैठका आज संपन्न झाल्या. तर आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील १०,११, १२,१५ व १६ या प्रभागातील आढावा बैठक आज संपन्न झाल्या तसेच पुढील काही दिवसात कोथरूड ,पर्वती ,खडकवासला ,हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट व वडगांवशेरी या विधानसभा मतदारसंघातील बैठकी देखील संपन्न होणार आहेत.

BJP Vs NCP | राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

शहरातील राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणार्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मुळीक पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

MVA Vs BJP | Pune | महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या विरोधात मूक आंदोलन

दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची  घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि,  सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही.  याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुशअण्णा काकडे, वैशालीताई नागवडे, काँग्रेसचे रमेश दादा बागवे, मोहन जोशी, संगीताताई तिवारी, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,आप्पा रेणूसे,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

NCP activists show black flags | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे

२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.

स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”

हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, जेष्ठ नेंते अंकुश काकडे, वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP : Arti : राष्ट्रवादीच्या आंदोलनातील या आरतीची झाली खूपच चर्चा 

Categories
Breaking News Political पुणे

राष्ट्रवादीच्या आंदोलनातील या आरतीची झाली खूपच चर्चा

पुणे :  देशांतर्गत वाढलेली महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शनिपार चौक येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली. ही आरती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लिहिली आहे. ज्याची दिवसभरात खूपच चर्चा चालू आहे.

जयदेवी जयदेवी जय कमळाबाई
महागाई असह्य होई जेंव्हा तु राज्यावर येई …..
जयदेवी जयदेवी
||जय कमळा बाई ||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी, जय देवी जयदेवी |१|

अदानी -अंबानी चं तुझे पिता
गरीबांची कर्दनकाळ तु
नफाखोरांची त्राता ….
जयदेवी जयदेवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जय देवी जयदेवी |२|

झोलावाल्या फ़क़ीराचे चे तू विश्वदर्शन करवीशी
सामान्यांच्या इंधनातदरवाढ करशी
जयदेवी जयदेवी
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |३|

त्रिलोकी तुझ्या भ्रष्टाचाराच्या
गाथा
भारतीय आता पिटतायत आपलाच माथा
जय देवी जय गवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |४|

जेव्हा भाजप मुक्त होशील भारतदेशा, तेव्हाच पुर्ण होतील तुझ्या सगळ्या आशा
जय देवी जय देवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जयदेवी जयदेवी |५|

*प्रदीप देशमुख
प्रवक्ता व प्रदेश प्रतिनिधि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

सुप्रियाताई सुळे यांनी सदर आंदोलनात …. यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात ही महागाईची आरती म्हणून पक्षााच्यावतीने गॅस व इंधन दरवाढीची आंदोलने होतील असे जाहीर केले

NCP against inflation : Video : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘कमळाबाई’ ची आरती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘कमळाबाई’ ची आरती

: खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यातील शनिपार चौक येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदारसुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली.

वेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की, ” मला आजही आठ वर्षांपूर्वी स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचे एक वाक्य आठवते ” आकडों से पेट नही भरता साहब धान से भरता है” आज केंद्रातील भाजप सरकारने किमान स्व.सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्याची जाण ठेवत देशातील महागाई कमी करावी नागरिकांना दिलासा द्यावा. गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे .आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत”.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,  देशातील सर्व प्रश्न सुटले असून, हनुमानाची आरती केल्याने उर्वरित प्रश्न देखील सुटणार आहेत असा संदेश गेल्या काही दिवसांत भाजप,मनसे,नरेंद्र मोदी , राज ठाकरे देत असून त्या अनुषंगाने सर्वसामान्य पुणेकरांना हनुमान प्रसन्न व्हावे व महागाई कमी व्हावी यासाठी आज शनिपार येथे हनुमानास साकडे घालण्यात आल्याने आता येत्या काळात सिलेंडर १ हजार रुपयांवरून ३०० रुपये , पेट्रोल १२५ रुपयांवरून ५० रुपये व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे.

जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.टी लागू करणे, सरकारी कंपन्या – बँका विकणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे,निलेश निकम,नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्यासौ.रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune NCP : Prashant Jagtap : राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार

:  रष्ट्र्वादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

पुणे : कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिकीट वाटपात ओ.बी.सी बंधु भगिनींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत. ओ.बी.सी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घेईल. असे आश्वासन पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

: पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज

जगताप म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास ओ.बी.सी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओ.बी.सी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील. ओ.बी सी बांधवांना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. परंतु कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध उखडून टाका

: शरद पवार यांचा घणाघात

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (NCP Followers) या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (NCP supremo Sharad Pawar) यांनी  येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(NCP) परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.

या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

एका संघर्षाच्या काळातून आपण जात आहोत. आज आपल्यासमोर हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. २०१४ पर्यंत देशाची स्थिती वेगळी होती. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती व्हावी याची खबरदारी घेतली. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपच्या हातात सत्ता आली. लोकांचा हा कौल आम्ही अंतःकरणापासून स्वीकारला. मात्र सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसामध्ये एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचे दुखणे कसे कमे होईल, याची जबाबदारी राष्ट्रप्रमुखांची असते. पण आज चित्र वेगळे दिसत आहे.
मागच्या काही दिवसात आपण पाहिले तर दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात हल्ले झाले, जाळपोळ झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असले तरी दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. अशावेळी तेथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी ही काळजी घेतली नाही. दिल्लीत एखादी घटना घडली तरी त्याचा संदेश जगामध्ये जातो आणि या देशात अस्थिरता आहे, अशाप्रकारची भावना निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही.
दोन दिवसांपूर्वी मी कर्नाटकात होतो. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले की, हुबळीसारख्या ठिकाणी जातीय दंगली झाल्या. आज कर्नाटकमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधात जाहीर फलक लावले गेले आहेत. अमुक एका गावात अल्पसंख्याकांच्या दुकानात कुणी जाऊ नये, त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नये, असे जाहीर फलक लावले जात आहेत. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी भाजपचे आहेत. जिथे जिथे भाजपच्या हातात सत्ता आहे, तिथे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे.
मी कोल्हापूरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. देश अडचणीत जात असताना येथील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी केले. मी अंतःकरणापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीच्या येथील सर्व नेत्यांनी उत्तम कामगिरी करुन आघाडीचा धर्म पाळला.

‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था 


‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.

Jayant Patil Vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी १९७८ काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता ? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता ? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ? १९९९ साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का ? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का ? काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन ५० वर्षेही झाली नाहीत व त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना १९५१ साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. १९७५ साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे १९८० साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही.

त्यांनी सांगितले की, देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नाही.

Sanvad yatra by NCP : महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा

: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचे आवाहन

पुणे : “सरकार म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देत पुणेकरांच्या सेवेत उतरावे व महाविकास आघाडीचे सर्व निर्णय पुणे शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावे”. असे आवाहन राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा असंख्य कार्यकर्त्यांचा परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्यांसोबत संवाद साधण्यासाठी “संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी” या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले.सौ. सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे शिवाजीनगर,कोथरूड,कसबा व खडकवासला या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. याअंतर्गत सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गेल्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये या चार विधानसभेपैकी खडकवासला विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून खडकवासला विधानसभा मतदासंघांत आपण थोड्या फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असे जयंत पाटील म्हणाले.

याप्रसंगी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, “सरकार म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देत पुणेकरांच्या सेवेत उतरावे व महाविकास आघाडीचे सर्व निर्णय पुणे शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावे”

ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिवार संवाद यात्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप,आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे ,जयदेवराव गायकवाड यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.