Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

Categories
Breaking News Education social महाराष्ट्र

Dress code for Teachers | राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेस कोड! शिक्षकांनी जिन्स व टी शर्ट चा वापर शाळेत करू नये

| राज्य सरकार कडून आदेश जारी

Dress Code for Teachers – (The Karbhari News Service) – राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून शिक्षक संवर्गाच्या पेहरावाबाबत राज्य सरकार कडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

सरकारच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक, इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. तसेच, जनमानसात त्यांचेकडे गुरु/मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांचेशी येत असतो. तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. असे सरकारने म्हटले आहे.

सरकारने पुढे म्हटले आहे कि शिक्षकांच्या  वेशभूषेवरुनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरुक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरुप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तसेच, त्यांचेसमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांचेवर होत असतो.
ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरीता दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत :-
१) सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरुन असावा.
२) सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पध्दतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करुन परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम / चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करु नये.
३) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
४) उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
५) पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे.
६) पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
७) महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे (उदा. पुरुषांनी शूज ) यांचा वापर करावा.
८) स्काऊट गाईड च्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहतील.
९) वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना / महिला शिक्षकांना बूट (शूज) वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत “Tr. ” तर मराठी भाषेत “टि” असे संबोधन लावण्यात यावे. तसेच,
यासंदर्भातील बोधचिन्ह आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सुनिश्चित करुन त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल. असे ही सरकारने आदेशात म्हटले आहे.

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी

| महापालिका कामगार युनियन ची आयुक्तांकडे मागणी

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ४ टक्के वाढ मंजूर केली आहे.  आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.  हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.  ते मार्चअखेर पगारासह जमा केले जाईल.  यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे.  याच धर्तीवर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) सुधारित महागाई भत्ता लागू करावा आणि त्याचा फरक दिला जावा, अशी मागणी महापालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar union) ने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

कामगार युनियन चे अध्यक्ष उदय भट यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार गर्व्हमेंट ऑफ इंडीया, मिनिस्ट्री ऑफ फायनन्स, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, नॉर्थ ब्लॉक, न्यु दिल्ली यांचे  १२ मार्च, रोजीचे कार्यालयीन परिपत्रकान्वये महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून 1 जानेवारी  पासून ४६ टक्के वरून ५० टक्के इतकी वाढ केल्याचे परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

The Karbhari - Ministry of finance

पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांना  केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याबाबत पुणे मनपा व कामगार संघटना यांचेमध्ये करार झालेला असून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण व प्रचलित कार्यपध्दती आहे.

तरी, पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी यांना संदर्भाकित परिपत्रकानुसार महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून 1 जानेवारी पासून ४६ टक्के वरून ५० टक्के दराने माहे मार्च, २०२४ पेड इन एप्रिल २०२४ चे वेतनामध्ये फरकासहीत अदा करणेबाबत संबधितांना आदेश व्हावेत. अशी मागणी कामगार यूनियन ने केली आहे.

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

 

Maharashtra Cabinet Meeting – (The Karbhari News Service) – आज (सोमवार दि.११ मार्च) महाराष्ट्र  मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय जाणून घ्या.

 

 

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार
( गृहनिर्माण विभाग)

बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.
( गृहनिर्माण विभाग)

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू
( वस्त्रोद्योग विभाग)

एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
( नगरविकास )

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार
( नगरविकास विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
( राज्य उत्पादन शुल्क)

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
( वित्त विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
(गृह विभाग)

एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने
(कामगार विभाग)

विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
(विधि व न्याय विभाग)

राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
(नियोजन विभाग)

अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
(सार्वजनिक बांधकाम विभाग)

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार
( नगरविकास विभाग)

शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
( महिला व बालकल्याण विभाग)

उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
( ऊर्जा विभाग)

६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
( आदिवासी विकास विभाग)

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
( आदिवासी विकास विभाग)

राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
( सामाजिक न्याय विभाग)

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना
५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता
( शालेय शिक्षण)

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अल्पसंख्याक आयुक्तालय
( अल्पसंख्याक विभाग )

आनंदाचा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडव्याला देणार
( अन्न व नागरी पुरवठा)

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक
( सामाजिक न्याय विभाग)

CNG Price Decrease | MNGL ने पुणे परिसरात CNG च्या किमती कमी केल्या

Categories
Breaking News social पुणे

CNG Price Decrease | MNGL ने पुणे परिसरात CNG च्या किमती कमी केल्या

Pune – (The Karbhari News Service) – CNG Price Decrease | सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांसह पुणे शहरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किरकोळ विक्री किंमतीत कपात केली आहे, जे 5/6th मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून लागू होत आहेत.  सीएनजीच्या दरात रु. 2.50/- प्रति किलोग्रॅम प्रमाणे (करांसह) कपात करण्यात आली आहे.. सीएनजी किरकोळ विक्री किंमत रु. ८६.०/- प्रति किलो वरून रु. 83.50/- प्रति किलो करण्यात आली आहे.
 कपातीनंतर , MNGL चे पुणे शहरातील CNG, पेट्रोलच्या तुलनेत प्रवासी कार विभागासाठी सुमारे 50% आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 30% ची आकर्षक बचत देते आणि ऑटोरिक्षांसाठी सुमारे 30% पेक्षा जास्त बचत देते.
26 जानेवारी, 2024 पासून, देशात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार आणि Regulatory Body नि दिलेल्या प्रायोरिटी वर , CGD कंपनींद्वारे देशभरात ‘राष्ट्रीय PNG ड्राइव्ह’ हाती घेण्यात आला आहे.
या संदर्भात, MNGL ने 14.02.2024 पासून देशांतर्गत घरगुती गॅस च्या किमती कमी केल्या. आणि आता काही दिवसांपासून, आम्ही पाहत आहोत की डोमेस्टिक PNG साठी नवीन नोंदणी आणि वापर वेगाने होत आहेत. पीएमसी आणि पीसीएमसी क्षेत्रातील ग्राहकांमध्ये नैसर्गिक वायू वापरा बद्दल सकारात्मकता विकसित झाली आहे.
हा अनुभव लक्षात घेऊन, MNGL ने अंतिम ग्राहकांमध्ये पसंतीचे इंधन म्हणून CNG ची सकारात्मकता आणि आकर्षकता निर्माण करण्यासाठी ही CNG किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MNGL पुण्यासह 6 वेगवेगळ्या भौगोलिक भागात CGD प्रकल्प चालवत आहे आणि सगळीकडे CNG च्या किमती रु. 2.50/- प्रति किलोग्राम ने कमी केल्या आहेत. 2.50/- प्रति किलोग्राम या सर्व करांसह.

Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन | काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी

Categories
Breaking News Political social पुणे

Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन

| काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी

 

पुणे : (The Karbhari News Service) – Ruby Hall to Ramwadi Pune Metro | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती, या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला, त्याला यश आले, परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. (Mohan Joshi Pune Congress)

पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल आणि रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होईल. मात्र, ते लक्षात न घेता पंतप्रधानांच्या सोयीसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. अलीकडेच समाजसेवक सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलनही केले होते. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. ‘वेकअप’ पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी ६ तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो सेवा मुळात काँगेसचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल २ विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस! 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस!

| ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक

 

PMC Vidyaniketan School Katraj |Pune – (The Karbhari News Service) – राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन शाळेने बाजी मारली आहे. अभियानात ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात विद्यानिकेतन क्र १९ शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यासाठी २१ लाख इतके बक्षीस आहे.येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  (Pune Municipal Corporation Schools)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 1 कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता.

बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे आहे. या गटात पुणे महापालिकेच्या कात्रज मधील डॉ यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन क्रमांक १९ या मराठी माध्यमाच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक हा पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळेचा आहे.

या पुरस्कारा बाबत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगतिले कि, आम्ही पुणे महापालिकेच्या शाळा या आदर्श शाळा करतो आहोत. या अंतर्गत पहिल्या टप्यात १५ शाळा आदर्श शाळा करण्यात येत आहेत. त्यातीलच प्रथम क्रमांक मिळालेली विद्यानिकेतन शाळा आहे. ढाकणे यांनी पुढे सांगितले कि, एकूण ४५ शाळा आम्ही आदर्श करणार आहोत.  या शाळा करताना आम्ही एकूण ८९ मानके तयार केली आहेत. यात शाळेची रचना कशी असावी, इथपासून ते गुणवत्ता कसी असावी, या सर्वांचा समावेश आहे. राज्य सरकारचा आमच्या शाळेला पुरस्कार मिळाल्याने महापालिकेच्या आदर्श शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

| आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

पुणे – (The Karbhari News Service) –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे (Lahuji Vastad Salve Smarak) यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते.

The karbhari - Lahuji smarak sangamwadi pune

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य क्रांतीगुरू म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकारकाचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचार स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील. मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरुळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. स्मारकासाठी साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात संग्रहालय, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याशिवाय नगर नियोजन योजनेअंतर्गत उरुळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

PMC Sewerage Maintenance and Repair Department | नाला बेसिन आणि पावसाळी लाईनच्या कामासाठी जायका प्रकल्पाचा (JICA) निधी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sewerage Maintenance and Repair Department | नाला बेसिन आणि पावसाळी लाईनच्या कामासाठी जायका प्रकल्पाचा (JICA) निधी

| 35 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव

Pune : (The Karbhari Online) – पुणे शहरात पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी (Pune Monsoon Water Management) नाला सुधारणा कामे करणे (Nala Basin), कल्व्हर्टस बांधणे, पावसाळी लाईन (Monsoon Line) टाकणे अशी कामे सुरु करण्यात आली आहेत. मात्र या कामांसाठी 35 कोटींचा निधी अपुरा पडत आहे. हा निधी जायका प्रकल्पाच्या (PMC JICA Project) कामातून वर्गीकृत करून घेतला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर (PMC Standing Committee) ठेवण्यात आला आहे. (PMC Sewerage Maintenance and Repair Department)

पुणे शहरातील कोथरुड बेसीन, औंध बेसिन, बावधन पाषाण बेसिन, मंगळवार पेठ बेसिन, शनिवार पेठ बेसिन, दत्तनगर बेसिन, हिंगणे बेसिन, वडगाव बु. बेसिन, कोंढवा बेसिन याठिकाणी पावसाळी पाण्याच्या व्यवस्थापनासाठी नाला सुधारणा कामे करणे, कल्व्हर्टस बांधणे, पावसाळी लाईन टाकणे व तदनुषंगिक कामे जागेवर सुरु झाले आहेत. यासाठी 54 कोटीची टेंडर प्रक्रिया लागू केली होती. मात्र मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभागास ३१ मार्च २०२४ पूर्वी ही  काम पूर्ण करणेसाठी वाढीव 35 कोटी रक्कमेचा निधी लागणार आहे. त्यानुसार वर्गीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

पुणे महानगरपालिकेकडील मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाकडील बजेटकोड ZE16D103/MP4-11 राष्ट्रीय नदी सुधारणा अंतर्गत मुळा-मुठा सुधारणा कामे करणेसाठी मैलापाणी व्यवस्थापन विषयक योजना राबविणे (JICA) या कामासाठी 200 कोटी इतकी तरतुद उपलब्ध आहे. त्यातून 35 कोटींचे वर्गीकरण केले जाणार आहे.

Kasba Constituency | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची हेमंत रासने यांची महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी 

Categories
PMC Political social पुणे

Kasba Constituency | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची हेमंत रासने यांची महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी

 

पुणे | (The Karbhari Online ) – कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Assembly Constituency)  नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपा कसबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख  हेमंत रासने (Hemant Rasane Pune BJP) यांनी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune)  आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, वीजपुरवठा सुधारणे, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांची यादीही निवेदनात देण्यात आली.

श्री. हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी मी नियमितपणे पुणे महापालिका आणि इतर संबंधित विभागांशी संपर्कात आहे. गेल्या वर्षभरात अनेक कामेही पुणे महानगपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली. परंतु महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मतदारसंघातील अजून काही प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र बिनवडे यांनी निवेदन स्वीकारत सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले आहे”

यावेळी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत भाऊ रासने यांच्यासोबत कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, राजू परदेशी, प्रणव गंजीवाले, प्रशांत सुर्वे, वैशालीताई नाईक, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, संजय मामा देशमुख प्रभाग अध्यक्ष भारत जाधव, अभिजीत रजपूत, सनी पवार, भस्मराज तिकोने, संदीप इंगळे, जयदीप शिंदे, माधव साळुंखे, अभिषेक मारणे, संकेत थोपटे, सिद्धेश पांडे, तन्मय ओझा तसेच कसबा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Dr Siddharth Dhende | रोजगार प्रशिक्षण केंद्रातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील : डॉ. सिद्धार्थ धेंडे

Categories
cultural Political social पुणे

Dr Siddharth Dhende | रोजगार प्रशिक्षण केंद्रातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील : डॉ. सिद्धार्थ धेंडे

– प्रभाग क्रमांक २ मध्ये महिलांसाठी घरगुती उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन | माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांचा पुढाकार

 

Dr Siddharth Dhende | राज्यासह देशभरात महिला उद्योजकांची मोठी संख्या वाढत आहे. महिलांना प्रोत्साहन दिल्यास आणखीन उद्योजक वाढतील. त्यासाठी महिलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. उद्योग प्रशिक्षण केंद्रामधून महिलांना उद्योग सुरु करता येईल. त्यामधून आर्थिक स्वावलंबी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील पंचशील विहार, धम्म ज्योती संघटना क्रियाशील आदर्श सेवा मंडळ, चर्च शेजारी, नागपूर चाळ या ठिकाणी महिलांकरिता घरगुती उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. धम्म ज्योती संघटना व सुजाता महिला मंडळ यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लिज्जत पापड उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. धेंडे बोलत होते. महिलांनी देखील या यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

The karbhari - PMC Ward no 2

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, विजय कांबळे, विशाल सोनवणे, अरविंद रणपिसे,अनिल कांबळे, अजय कांबळे, कमल वाघमारे, मंगल गमरे, कमल कांबळे, आरती माने , रेखा जाधव , सुजाता महिला मंडळ, धम्म ज्योती संघटना यांचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच प्रथम सामाजिक संघटना, आदीसह प्रभागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात लिज्जत पापड उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी घरगुती उद्योगांची माहिती दिली. त्यामधील संधी, आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. त्याचा प्रभागातील महिलांना मोठा लाभ झाला.

The karbhari - PMC Ward no 2

या कार्यक्रमाबरोबरच प्रथम, आयबीएम, स्किल्स बिल्ड नोकरी / रोजगार कौशल्य मोहीम अंतर्गत मोफत कोर्स / रोजगार मेळावा देखील आयोजित केला. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. रोजगाराची माहिती मिळावी या उद्देशाने १८ ते ३५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते. सुजाता महिला मंडळ आणि धम्म ज्योती संघटना यांच्या पुढाकाराने हे उपक्रम पार पडले.
—————————————————–