Traffic changes | १ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

Categories
Breaking News cultural social पुणे

१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

पुणे | नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

१ जानेवारी रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.

त्यानुसार पूरम चौकातून बाजीराव रोडने शनिवार वाडा हा मार्ग बंद करण्यात येणार असून नागरिकांनी त्याऐवजी पूरम चौकातून टिळक मार्गाने अलका टॉकीज चौकातून इच्छितस्थळी जाणाचा पर्याय अवलंबवावा. अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक हा मार्ग बंद असणार आहे, त्याऐवजी नागरिकांनी आप्पा बळवंत चौक- बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा व पुढे इच्छीतस्थळी जावे.

स.गो.बर्वे चौक ते पुणे महानगरपालिका भवन तसेच शनिवारवाडा हा रस्ता बंद राहील. त्याऐवजी नागरिकांनी स.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोडमार्गे झाशीची राणी चौकातून इच्छितस्थळी जावे. गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक हा रस्ता देखील बंद असणार असून त्याऐवजी गाडगीळ पुतळा-डावीकडे वळून कुंभारवाडा किंवा सूर्या हॉस्पिटल समोरून इच्छितस्थळी जाता येईल, असे पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Navale Bridge | Pune | पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पुणे येथे नवले ब्रिजवर (Navale Bridge Pune) रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) पोलिसांकडून माहिती घेतली आहे.

हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. (Navale bridge Accident)

Traffic in pune | PMC Pune | वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी |अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

Categories
Breaking News PMC social पुणे

वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी

|अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पुणेकर नागरिक अडकून पडत आहेतच. यामुळे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे.  अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

 

Video | Chadani Chowk bridge demolition | चांदणी चौकातील जुना पूल पाडला

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

चांदणी चौकातील जुना पूल पाडला

पुणे | अखेर २ वाजून ३३ मिनीटांनी चांदणी चौकातील जुना पुल पडला. पूल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत अशी माहिती उत्कर्ष मेहता, एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर यांनी दिली आहे. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला, आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात. जे पद्धत ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टींग असं म्हणले जाते, असेही त्यांनी सांगितले. तसेच सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला. अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला. 600 किलो स्फोटकांच्या माध्यमातून हा पूल पाडण्यात आला. आता उर्वरित पाडकाम पोकलेनच्या सहाय्यानं पडण्याचं काम सुरू झालं आहे. रात्री दहापासूनच चांदणी चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. पूल रविवारी पहाटे एकच्या सुमारास पाडण्यात आला आहे.

चांदणी चौकातील पाडलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु

पूल पाडल्यानंतर गेल्या सहा तासांहून अधिक काळ तिथला राडारोडा हटवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं दोन्ही बाजूंनी काम सुरु आहे. स्वतः जिल्हाधिकारी रात्रीपासून या कामावर लक्ष ठेवून आहेत. चांदणी चौकातली वाहतूक अजूनही बंदच आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचं काम काही तास सुरुच राहणार आहे. तोपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे.

 

District Collector | Pune | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा

Categories
Breaking News social पुणे

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा

पुणे |: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी दिले.

बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त श्री.शिंदे यांनी दिले.

पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.

असा पाडला जाईल जूना पूल

पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.

सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

Categories
Breaking News Political social पुणे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली.

एनडीए चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुलाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम ८ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे महानगर पालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतून चांदणी चौक ते रावेत / किवळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पुल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महामार्गाच्या आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना श्री.गडकरी यांनी दिले.

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी श्री.गडकरी यांना चांदणी चौकातील पुल पाडण्याच्या कामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

Chandni Chowk | चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

Categories
Breaking News social पुणे

चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.

शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेपासून २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद करुन २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता ब्लास्ट करण्यात येईल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम सुरू आहे. श्रृंगेरी मठाच्या समोरील सेवा रस्त्याचे कामदेखील करण्यात येत आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ च्या खडकामध्ये ब्लास्टींगद्वारे खोदकामही सुरू आहे.

एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसाठी रॉक ब्लास्टींगचे काम करण्यात येत आहे. अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस (मुंबई बाजू व सातारा बाजू) थांबवावी लागणार आहेत. त्यासाठी टोल नाक्यावर व इतर ठिकाणी सूचना फलक लावण्याचे काम सुरू आहे.

इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक बसविण्याचे कार्यवाहीदेखील सुरू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना नियोजित पुल पाडण्याच्या वेळेत वाहतूक नियोजनाबाबत अवगत करण्यात आले आहे.

पुल पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या भा.रा. रा. प्रा. चे ठेकेदार मे. एनसीसी लि. यांनी प्राप्त केल्या आहेत. एकूण १३०० छिद्रांच्या ड्रीलिंगचे सर्व काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मुंबई बाजू व सातारा बाजूकडील स्लॅबवरील जिओ टेक्टाईल लावण्याचे काम पुर्ण झाले आहे. ए-१ व ए-२ अबटमेंटमध्ये एक्सप्लोजीव मटेरीयल भरण्याचे काम झाले आहे. ए-२ अबटमेंट भागात सिमेंट राउटींगचे काम पूर्ण झाले आहे. कन्वहेअर बेल्ट शिप्टींग चे काम पूर्ण झाले आहे. सॅन्ड बॅग भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

इतर अनुषंगीक कामेदेखीक करण्यात येत आहेत, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी दिली आहे. नागरिकांनी पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यावश्यक असल्यासच या मार्गाने प्रवास करावा, अन्यथा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Pune | Traffic Congestion | गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन  | मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत 

Categories
Breaking News PMC social पुणे

गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन

| मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत

पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत ते पाहून त्याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण कार्यालयाकडे सादर करावा. जर मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नसल्यास त्यास पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी परवागनी देऊ नये असे स्पष्ट प्रस्ताव सादर करा असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले होते. मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही.

यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेने परवाना शुल्क माफ केल्याने व पुढील पाच वर्षांसाठी एकच परवाना ग्राह्य धरला जाणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर मंडळांनी, खासगी कंपन्यांनी रस्ते व पादचारी मार्गावरील देखावे साहित्य, मिरवणूक साहित्य, बोर्ड, बॅनर, जाहिराती तीन दिवसात काढून घेणे बंधनकारक आहे. पण मंडळांनी व खासगी व्यक्तींनी मुदतीत साहित्य व बोर्ड काढलेले नाहीत. त्याच प्रमाणे मांडव काढल्यानंतर खड्डेही बुजविले नाहीत. त्यामुळे पादचारी व वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील मंडळांनी मांडव काढला की नाही, रस्ते स्वखर्चातून दुरुस्त केले की नाही याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचा अहवाल १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा. ज्या मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नाही, त्यांना पुढील वर्षी परवानगी देऊ नये असा प्रस्तावही सादर करावा असे आदेशात नमूद केले होते.

मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही. याबाबत अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले, याबाबत आधीच आदेश देण्यात आले आहेत. आमच्याकडे अहवाल नाही आले तर आम्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. तसेच मांडव देखील काढून घेतले जातील.

Ferguson College | फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

Categories
Education social पुणे

फर्ग्युसनमध्ये ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना | राज्यातील पहिलेच महाविद्यालय

| विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुकीचे धडे आणि शिकाऊ परवाना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.’’

वाडकर म्हणाले, ‘‘छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, नेहा जाधव, शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

Chandani Chauk | ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास NHAI जबाबदार राहणार नाही चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन

Categories
Breaking News पुणे

ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास  NHAI जबाबदार राहणार नाही

| चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन

महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रं. ४ वरील चांदणी चौक जंक्शन येथे कि.मी. ८४२.५८० वर फ्लायओव्हर व त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम प्रगतीवर आहे.
या प्रकल्पांतर्गत हायवेवरील अस्तित्वात असणारा पुणे (बावधन) एन.डी.ए / मुळशी ओव्हरपास तोडून त्या ठिकाणी नवीन ओव्हर पास बांधणे प्रस्तावित आहे. अस्तित्वातील ओव्हरपासची पाहणी केली असता त्यावरुन काही सेवा वाहिन्या (पाणी पुरवठा, टेलीफोन, विदयूत वाहीनी, ओएफसी केबल्स इ.) टाकलेल्या निदर्शनास आले. सदरील अस्तित्वातील ओव्हरपास दि. १२.०९.२०२२ ते १५.०९.२०२२ च्या दरम्यान पाडण्याचे नियोजन आहे.
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व जनतेस विनंती करण्यात येते की, संदर्भीय ओव्हरपासच्या दरम्यान आपल्या काही सेवा वाहिन्या असल्यास दि. १०.०९.२०२२ पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्यात याव्यात. त्यानंतर जर ओव्हरपास तोडताना काही नुकसान / असुविधा झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. राष्ट्रीय कामास सहकार्य करावे ही विनंती. असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी म्हटले आहे.