Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

| हॉस्पिटल हलवण्याची मागणी

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.

शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Potholes | PMC Pune | महापालिकेच्या पथ विभागाच्या कामाचा दर्जा झाला उघड | पुन्हा झाली रस्त्यांची चाळण | विभागप्रमुख म्हणतात काम सुरु आहे लवकरच रिपोर्ट देऊ

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेच्या पथ विभागाच्या कामाचा दर्जा झाला उघड | पुन्हा झाली रस्त्यांची चाळण

| विभागप्रमुख म्हणतात काम सुरु आहे लवकरच रिपोर्ट देऊ

पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळय़ात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल करोडो रुपयांचा खर्च केला आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने हा खर्च पाण्यात गेल्याने उधळपट्टीच ठरला आहे. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.

यंदाच्या पावसाळय़ात शहर आणि उपनगरातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र पुढे आले. वर्षभर सतत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले.

समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळय़ातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. पावसाळापूर्वी कामे करताना रस्ते पूर्ववत करण्यासाठी चार कोटी, तर पावसाळय़ात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने चार कोटी, असा एकूण आठ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्याशिवाय क्षेत्रीय कार्यालयाकडून स्वतंत्र खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्डय़ांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे, हे विशेष. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाने याआधी केलेल्या कामाचा दर्जा उघड झाला आहे. आता नव्याने कामे सुरु केली आहेत. याबाबत विभाग प्रमुख वी जी कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत, याचा लवकरच रिपोर्ट देऊ.

MLA Sunil Tingre | आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!

Categories
Breaking News PMC Political पुणे

आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!

| वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला

गेल्या काही महिन्यांपासून धानोरी, लोहगांव पोरवाल रोड व फाइव-नाइन परिसरात सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीने परिसरातील नागरीक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मनपा व पोलीस अधिकार्‍यांनी अनेक वेळा परिसराचे निरीक्षण केले आहे. परंतु प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल केला गेला नाही. यामुळे वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची तत्काल सुटका करण्याचा तसेच समस्या सोडविण्यासाठी आता प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला. संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली.


धानोरी सीटी हॉस्पिटल ते फाइव-नाइन रस्त्याचे प्रलंबित काम, धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करणे तसेच लोहगाव पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी मंगलवारी करण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मनपा रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी तसेच मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसातील प्रलंबित रस्ते प्रश्‍नांची माहिती मनपा अधिकार्‍यांना देताना आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमण भूमिका घेतली. प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. जे कामे अपूर्ण असतील त्यांना पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करा. परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राथमिकता देण्यास अधिकार्‍यांना सांगितले गेले.

संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली. धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करण्यासाठी संबंधित मारथोफिलस शाळा प्रशासनास जागेची कागदपत्रे घेऊन भू-संपादन प्रक्रिया करण्यासाठी तत्काल मनपा कार्यालयामध्ये येण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच या संबंधी २७ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याचे अपूर्ण काम बुधवारी सुरू करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोरवाल रोड येथे तात्पुरता वन-वे सुरू केला जाईल, जेणे करून परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळेल.

7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या  | अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश | आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम 

Categories
Breaking News PMC पुणे

सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या

| अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

 पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त/ मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी विवरण पत्र तपासणी करून घेण्यात आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत आदेश देत आठ दिवसाच्या आता हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे सातवा वेतन आयोगापोटी देय असलेली फरकाची रक्कम अदा करणेकामी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र तयार करून वेतन ऑडीट विभागामार्फत तपासून घेणे आवश्यक आहे. तथापि आमचे निदर्शनास आले आहे की बरेचसे कार्यालये व क्षेत्रिय कार्यालयांकडील सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र अद्यापपर्यंत तपासून घेतलेले नाही याबाबत सेवानिवृत्त सेवकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत. तरी पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांनी सेवानिवृत्त / मयत सेवकांचे विवरण पत्र कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील आठ दिवसात वेतन-ऑडीट विभागामार्फत तपासून घेण्यात यावे.

| आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम

दरम्यान महापालिका कर्मचारी आणि अधिकारी फरकाच्या रकमेची वाट पाहत आहेत. 20 तारखेला ही रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र ती मिळालेली नाही. याबाबत संगणक विभागाला विचारणा केली असता सांगण्यात आले कि शनिवारी आणि रविवारी कर्मचाऱ्यांनी कामचुकार केल्याने हा उशीर होत आहे. जवळपास 60 बिलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व बिलावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. आगामी 4 दिवसात कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Animal Hospital | हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

Categories
Breaking News PMC Political पुणे

हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत 30 वर्षाचा करार केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलाहोता. याला समितीने मंजुरी दिली आहे. मात्र आता हडपसर मधून या प्रकल्पांला विरोध वाढला आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/ प्राणी अपघाताने जखमी किवां इतर कारणाने जखमी/आजारी झालेली असतात. अशा जखमी आजारी प्राण्याविषयी नागरिक व  सभासद आरोग्य खात्याकडे तक्रारी करत असतात. तसेच शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची/प्राण्याची अपघाताची संख्या वाढत असल्यामुळे मनपाच्या कुत्रा बंदोबस्त गाड्यामधून कोणत्याही वेळी मोफत उपचारासाठी आणलेली कुत्री हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट नं.५६ येथे मिशन पॉसिबल या संस्थेद्वारे निर्माण होणाऱ्या हॉस्पिटल /दवाखान्यामध्ये घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कुत्र्यांच्या मोफत उपचारासाठी २० केनेल्स राखीव ठेवणे, उपचारासाठी दाखल असलेल्या कुत्र्यांवर/प्राण्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करणे मिशन पॉसिबल या संस्थेला बंधनकारक राहणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी  दिली आहे. मात्र आता याचा विरोध सुरु झाला आहे.

कोर्टात दाद मागणार | योगेश ससाणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पांला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार
पुणे महनगरपालिका व मिशन पॉसिबल यांच्या संयुक्त विदयमाने आपण नुक्ताच मंजुर केलेला प्राण्यांच्या हॉस्पीटलचा प्रकल्प सुमारे ३२१७ चौ.मी. या जागेवर ( भटक्या व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटल साठी सुमारे ३० वर्षासाठी संयुक्त प्रकल्पाला देण्यासाठी जो निर्णय झाला आहे. त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. सदर प्रकल्प महानगरपालिकेने हडपसर विधानसभा मतदान
क्षेत्राच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत करावा.
२०१७ ते २०२२ या कालावधी मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये केशवनगर, रामटेकडी, उरूळी देवाची इ. ठिकाणी सुमारे २२०० मेट्रिकटनाचे नविन कचरा प्रकल्प महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाने बहुमताने मंजुर करून घेतला आहे. त्यात
प्राण्यांच्या हॉस्पीटलची भर नको. तरी माझी आपणास विनंती आहे की, सदर हडपसर नगररचना क्र. २ रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट मधील फायनल प्लॉट क्र. ५६ चे एकूण क्षेत्र ३२९७ चौ. मी ही मोकळी जागा प्राण्यांचे ( भटक्या
व मोकाट श्वानांचे) हॉस्पीटलसाठी ३० वर्ष कालावधीसाठी संयुक्त प्रकल्प रद्द करावा. अन्यथा या प्रकल्पा विरोधात मला कोर्टात दाद मागावी लागेल. असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

PMC Pune Recruitment Exam Dates | पुणे महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाणून घ्या 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेतील विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाणून घ्या

| परीक्षा प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावे लागणार

पुणे | पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. आता परीक्षा घेणे बाकी आहे. iBPS संस्था यासाठी परीक्षा घेणार आहे. महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यातील काही तारखा अंतिम आहेत तर काही तारखा या संभाव्य आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्या माहितीनुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात येणार आहे. ही तारीख अंतिम आहे. याचे जाहीर प्रकटन देखील देण्यात आले आहे. शिवाय याची माहिती उमेदवारांना देखील देण्यात आली आहे.
तर काही पदांच्या परीक्षाही लवकरच घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत; मात्र या तारखा संभाव्य आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा होण्याची शक्यता आहे तर 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल.
याची माहिती उमेदवारांना 7 दिवस अगोदर दिली जाईल. उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. याची सर्व माहिती प्रशासनाकडून उमेदवारांना इ मेल आणि मेसेज च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.

NCP Vs BJP | भाजपच्या ठेकेदारीराजने शहर खड्डेमय | राष्ट्रवादी काँग्रेस चा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे

भाजपच्या ठेकेदारीराजने शहर खड्डेमय | राष्ट्रवादी काँग्रेस चा आरोप

गेल्या पाच वर्षात पुणे शहरात भाजपच्या ठेकेदारीराजने केलेल्या निकृष्ठ कामांमुळे संपूर्ण पुणे शहर खड्डेमय झालेले आहे. असा आरोप करत प्रभाग 39 मध्ये भवानीपेठ – मार्केट यार्ड रस्त्यावर खड्ड्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत केल्याने असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेव्हन लव्हज चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गेल्या ५ वर्षातील गैरकारभाराचा निषेध व्यक्त केला.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, गेल्या ८-१० दिवसांपासून पुणे शहरात पावसाची संततधार सुरू आहे. या काळात  पुणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे.हजारो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे गेल्या ५ वर्षात होऊन देखील जर पुणे शहरातील रस्त्यांची ही अवस्था असेल तर या कामांच्या गुणवत्तेच्या बाबत निश्चितच प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत . या शहरात साडेआठ हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी महानगरपालिका जर पुणेकरांचा टॅक्स गोळा करून पुणेकरांना सोयी सुविधा देऊ शकत नसेल तर निश्चितच पुणेकरांच्या मनामध्ये गेल्या ५ वर्षातील सत्ताधारी भाजपच्याबाबत मोठा रोष आहे.या खड्ड्यांमुळे शहरात दररोज अपघात होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,महिला शहराध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,दिनेश खराडे,बाळासाहेब अटल,योगेश पवार,मीनाताई पवार,विद्या ताकवले,जयश्री त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Water Budget | PMC Pune | जलसंपदा विभाग पुणे मनपाला देणार फक्त 12.41 TMC पाणी!  | वॉटर बजेट च्या माध्यमातून महापालिकेने मागितले होते 20.34 TMC 

Categories
Breaking News PMC social पुणे

जलसंपदा विभाग पुणे मनपाला देणार फक्त 12.41 TMC पाणी!

| वॉटर बजेट च्या माध्यमातून महापालिकेने मागितले होते 20.34 TMC

पुणे | पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत ही मागणी केली आहे. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी आरक्षित केले गेले आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदाविभागाने महापालिकेला पत्र पाठवत 2022-23 वर्षासाठी फक्त 12.41 TMC पाणी मंजूर केले आहे. महापालिकेला वर्षाला 20 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जास्तीचे पाणी हवे असेल तर त्यासाठी तीन पट दर द्यावा लागेल, असे ही जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या या भूमिकेने आता पुणे महापालिकेची चांगलीच अडचण वाढली आहे.
सन २०२२ – २०२३ मध्ये पुणे महानगरपालिकेसाठी आवश्यक वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार तयार करण्यात आले  आहे. सन २०१९ मध्ये पुणे महानगरपालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलीत करण्यात आली असून पुणे शहराची लोकसंख्या एकूण ५२,०८,४४४ इतकी निश्चित झाली होती व संदर्भान्वये वार्षिक २% वाढ गृहीत धरुन ५४,१८,८६४ इतक्या लोकसंख्येसाठी सन २०२१-२०२२ चे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते. सन २०२२ मध्ये या लोकसंख्येमध्ये २% वाढ गृहीत धरण्यात आली आहे त्यानुसार होणाऱ्या ५५, २७, २४१ या लाकसंख्येस १५० एल.पी.सी. डी. प्रमाणे तसेच महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या (२९२८५७) तसेच नव्याने समाविष्ठ झालेल्या २३ गावांच्या लोकसंख्येस (८०००००) ७० एल.पी.सी. डी. प्रमाणे पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ही लोकसंख्या 69 लाख 41 हजार 460 होत आहे. त्यानुसार ही मागणी करण्यात आली आहे. शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये 35% पाणी गळती गृहीत धरण्यात आली आहे.

– जलसंपदा ने फक्त 12.41 TMC कोटा मंजूर केला

पुणे महानगरपालिकेने स मा. म.ज.नि.प्रा. मुंबई यांनी संदर्भ- ५ अन्वये दिलेल्या विहित नमुन्यात पुणे म.न.पा.च्या लोकसंख्येच्या पाणीवापराच्या वर्गवारीनुसारच्या निकषाप्रमाणे (उदा. Regular household water supply, community stand Posts, Water Provided through Tankers, Floating Population (With and without bathing facility), Village water Supply Outside corporation limits thr. Stand post and piped water supply etc.) तसेच
औद्योगिक पाणी मागणी इत्यादी तपशिलासह पुणे म.न.पा.ने वार्षिक पाणी वापराचे अंदाजपत्रक (Water budget) सादर केलेले आहे. पुणे महानगरपालिकेने  सादर केलेल्या सन २०२२-२३ च्या वार्षिक पाणी वापराच. अंदाजपत्रकानुसार (Water budget) व म.ज.नि.प्रा. मुंबई यांचेकडील निर्धारीत मापदंडानुसार पुणे महानगरपालिकेस बिगर
सिंचनाचा पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement)  वार्षिक १२.४१ टीएमसी (९६२.७३ एमएलडी) परिगणित होत आहे. पुणे महानगरपालिकेने गृहीत धरलेल्या लोकसंख्येसाठी आवश्यक आधार (proof) सादर केलेले नाहीत, तथापी सदर लोकसंख्या मा. आयुक्त, पुणे म.न.पा.यांनी प्रमाणित केली आहे. पुणे म.न.पा. च्या वाढीव हद्दीत नव्याने समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी ४९.७७१३ दलघमी (१.७६ TMC) पिण्यासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजुर असुन  पुणे म.न.पा. हद्दीत समाविष्ट असलेल्या इतर १८ संस्थाना जलसंपदा विभागामार्फत पिण्यासाठी व औद्योगिक कारणासाठी एकुण १३.६१७३ दलघमी (०.४८ TMC) पाणी आरक्षण मंजुर असुन पुणे म.न.पा. हद्दीतील पाणीपुवठा योजनांसाठी व इतर संस्थासाठी एकुण ६३.३९ दलघमी (२.२३८ TMC) पाणी आरक्षण मंजुर आहे. सदर संस्थांना जलसंपदा विभागामार्फत नविन मुठा उजवा कालव्यामध्ये धरणातुन पाणी सोडुन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तथापी पुणे म.न.पा. हद्दीतील वरील संस्था असल्यामुळे व त्यांना जलसंपदा
विभागकडुन पाणी पुरवठा होत असल्याने वरील पाणीकोटा ६३.३९ दलघमी (२.२३८ TMC) पुणे म.न.पा.च्या मागणीतून कमी करणेत येत आहे.  शासन निर्णयातील निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेस सन २०२२-२३ ( कालावधी
दि. १.७.२०२२ ते दि. ३०.६.२०२३) करीता खालील अटींच्या अधीन राहुन पुढीलप्रमाणे बिगर सिंचनाचा पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) मंजुरीस्तव सादर करण्यात येत आहे.

या असतील अटी –

१. पुणे महानगरपालिकेने वरील पाणीवापराच्या मर्यादेतच वार्षिक पाणी वापर करणे बंधनकारक राहील.
२.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणी वापरासंदर्भातील निर्देश/अटी पालन करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर राहील.
३. खडकवासला धरणातुन पाणी घेण्याची पुणे महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा ( पंप हाऊस, जॅकवेल, Gravity valve इ.) असल्यामुळे महानगरपालिकेच्या पाणीवापरावर जलसंपदा विभागामार्फत नियंत्रण
करता येत नाही. यास्तव मा. प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा  मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने पाणी घेण्याची यंत्रणा/ठिकाण कार्यकारी
अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात यावी.
४. पुणे महानगरपालिकेने वरील मंजुर पाणीकोट्याच्या मर्यादेमध्ये पाणी वापर करावा. या मर्यादेपेक्षा जादा पाणी वापरल्यास उन्हाळ्यात पिण्यासाठी व सिंचनासाठी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच यामुळे मा.न्यायालयीन/मा.म.ज.नि.प्रा. कडील प्रकरणे उद्भवु शकतात. तरी पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विहित केलेल्या मापदंडाच्या मर्यादेमध्ये पाणी वापर ठेवणे आवश्यक राहील.
5. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे दि. १७.१२.२०१८ चे आदेशानुसार खडकवासला धरणातून वार्षिक पाणी वापर ११.५० टीएमसी इतक्या मर्यादेतच करण्याचे निर्देश आहेत व उर्वरित पाणीवापर हा
पवना, भामा आसखेड धरणातून होणे आवश्यक आहे. याअनुषंगाने खडकवासला धरणातून ११.५०TMC या मर्यादेतच वार्षिक पाणी वापर करणे पुणे म.न.पा.स बंधनकारक राहील.
६. पुणे म.न.पा.स खडकवासला धरणातून ११.५० TMC वार्षिक पाणी आरक्षण मंजूर आहे. तथापि पुणे म.न.पा. खडकवासला धरण व कालव्याद्वारे दैनंदिन जवळपास १५८७ MLD (वार्षिक २०.४५ TMC) इतका होत आहे.
याअनुषंगाने पुणे म.न.पा.स खडकवासला धरणातून ११.५० TMC च्या मर्यादेत पाणीवापर करणेबाबत म.ज.नि.प्रा.चे आदेश आहेत. परंतु पुणे म.न.पा. या मर्यादेपेक्षा जवळपास वार्षिक ९.३४ TMC इतका जादा पाणीवापर करीत आहे. तसेच जलसंपदा विभागाने सांडपाणी नदीत सोडण्यावरूनही महापालिकेला आरोपी ठरवले आहे.

Water Closure | Pune | शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

गुरूवार दिनांक २२/०९/२०२२ रोजी पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, पर्वती LLR षरिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे
अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २३/०९/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर :-
 गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :-
 सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट,
ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – 
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग-
संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे एअरपोर्ट, राजीव गांधी नगर नॉर्थ व साऊथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं.१ ते ६, एकतानगर झोपडपट्टी, सिध्देश्वर, कुमार समृध्दी, प्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

Recovery | PMC pune | पहिल्या 6 महिन्यातच 28 कोटींची वसुली  | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

पहिल्या 6 महिन्यातच 28 कोटींची वसुली

| मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची कारवाई

पुणे | महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने मोकळ्या तसेच बांधीव जागा भाड्याने दिल्या जातात. खाजगी संस्था तसेच सरकारी यंत्रणांना या जागा भाडे तत्वावर दिल्या जातात. मात्र त्यांच्याकाडून वसुली करताना खूप अडचणी येतात. मात्र यंदा विभागाने वसुली मोहीम राबवत चांगली वसुली केली आहे. विभागाने चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यातच 28 कोटींची वसुली केली आहे. अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.
पुणे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने  मिळकत वाटप नियमावली नुसार भाडेतत्वावर जागा दिल्या जातात. विभागाच्या वतीने गाळे, दुकाने तसेच बहुउद्देशीय हॉल भाड्याने दिले जातात. यांची संख्या 232 आहे. मोकळ्या जागा 1446 आहेत. खाजगी तसेच सरकारी संस्थांना या जागा भाडेतत्वावर दिल्या जातात. मात्र या संस्थांकडून वसुली करताना अडचणी येतात. मात्र विभाग प्रमुखांनी वसुली मोहीम राबवली आहे. त्यामुळे वसुली होताना दिसत आहे. कारण एप्रिल पासून आजपर्यंत 28 कोटी 57 लाखाची वसुली करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाने 38 कोटींची वसुली केली होती. यामध्ये पीएमपी कडून वसूल केलेल्या 8 कोटींचा देखील समावेश आहे. तर 2020-21 मध्ये 50 कोटींची वसुली केली होती.
कालावधी               उत्पन्न 
2016-17.               18 कोटी 89 लाख
2017-18.               16 कोटी 69 लाख
2018-19.               22 कोटी 10 लाख
2019-20.               15 कोटी 76 लाख
2020-21.               50 कोटी 13 लाख
2021-22.                38 कोटी 12 लाख
एप्रिल-सप्टें 22.          28 कोटी 57 लाख