Employment | यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार

Categories
Breaking News Commerce Education Political social पुणे महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार

| पुण्याच्या रिलायन्स स्टोअरसाठी नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन

पुणे|यशवंतराव चव्हाण सेंटरने आता समाजातील मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे ठरवले आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअर्स मध्ये अशा व्यक्ती नोकऱ्या करताना दिसतील, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली. त्यांच्या कल्पनेला रिलायन्स रिटेल लिमिटेडने सकारात्मक प्रतिसाद दिला असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअरच्या संयुक्त विद्यमाने हे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील औंध, वाकड, हिंजवडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, गायकवाड नगर, पाषाण, फातिमा नगर, मांजरी, कल्याणी नगर, बीटी कावडे, वाघोली, खराडी, चाकण, आळंदी, मोशी, एरंडवणे, वारजे, नऱ्हे या ठिकाणच्या रिलायन्स स्टोअर्स मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

इच्छुकांनी अर्ज केल्यानंतर योग्य उमेदवार निवडून त्यांना पुण्यातील रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट स्टोअर्समध्ये ट्रेनी कस्टमर सर्व्हीस असोसिएट पदी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी शिक्षणाची बारावी पास ही अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलाखती दरम्यान १२ वी पास प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र, PAN कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. बारावी पास झालेल्या इच्छुकांनी आपली नावे यशवंतराव चव्हाण सेंटरकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ८४५९९००८३१, ८००७१८२५१० किंवा ८६५२११८९४९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Girish Gurnani | स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

कोथरुड मधील किनारा चौकात असलेल्या भुयारी मार्गावरील उच्छवासाचे (व्हेंटीलेशन) बांधकाम रस्त्याच्या मध्ये आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हे बांधकाम हटवावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. पौडरस्त्यावर एमआयटी व जयभवानीनगर येथे असलेल्या भुयारी मार्गाला मध्यभागी कोठेही व्हेंटीलेशनसाठी सोय केलेली नाही. मात्र किनारा चौकात मध्यभागी व्हेंटीलेशनसाठी काही जागा सोडली आहे. या जागेला बंदिस्त केले असल्याने तेथून व्हँटीलेशन होत नाही. तसेच मेट्रोच्या कामानंतर हे बांधकाम नेमके रस्त्याच्या मध्ये येत असल्याने छोटेमोठे अपघात होतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे बांधकाम हटवावे व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अपघाताला कारण असलेले हे बांधकाम हटवावे. या बांधकामाचा आडोसा घेवून येथे काही मालवाहू ट्रक लावले जातात. त्यामुळे आधीच अरुंद बनलेला रस्ता आणखी अरुंद बनून वाहतुक कोंडी होते. हे बांधकाम न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. खाजगी अभियंता कैलाश मारुती पारगे म्हणाले की, किनारा चौकात भुयारी मार्गावरील मधोमध असलेलं बांधकाम भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्याच्या उद्देशाने केले असावे. परंतु या बांधकामाची व भुयारी मार्गाची पाहणी केली असता त्याचा तसा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसते. वातानुकूलन करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याने हे बांधकाम हटवण्यास तांत्रिक दृष्ट्या काही अडचण आहे असे वाटत नाही. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, हे बांधकाम हटवण्यासंदर्भात मागणी आली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा यासांठी प्रकल्प विभागाकडे सल्ला मागवला आहे. हवा खेळती राहण्यासाठी केलेले हे बांधकाम आहे. ते हटवल्यास त्याचा भुयारी मार्गावर काय परिणाम होईल, काय पर्याय असू शकतात हे पाहून प्रकल्प विभागाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल.

Teacher Recruitment | शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

शिक्षक भरतीसाठी राज्य सरकार कडून अर्ज मागवले

| शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Uruli Devachi and Fursungi | उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या | महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय

Categories
Breaking News PMC पुणे

उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या

| महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय

पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र याबाबत अजून कुठलेही आदेश नाहीत. दरम्यान राज्य सरकारने या गावांबाबत महापालिकेकडे अभिप्राय मागितला आहे. महापालिका आयुक्तांनी नगर अभियंता यांना अभिप्राय देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने आपला अभिप्राय तयार केला आहे. त्यानुसार ही दोन्ही गावे महापालिकेतच राहू द्यावीत अशी भूमिका मांडण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्ताकडे पाठवला जाईल. यावर आयुक्तच निर्णय घेतील. अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
पुणे महापालिका हद्दीत 2017 साली 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची लोकसंख्या अडीच लाख इतकी आहे. दरम्यान सरकारने निर्णय घेऊन बरेच दिवस झाले असले तरी याबाबतची कुठलीही अधिसूचना काढण्यात आलेली नाही.

ही गावे महापालिकेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षात सुमारे २५० कोटी रुपये या गावांमध्ये खर्च झाले आहेत. तर ३९२ कोटी रुपयांच्या मलःनिसारण प्रकल्पामध्ये या दोन्ही गावांमध्ये सुमारे ४२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच या दोन्ही गावात ३७१ हेक्टरची टीपी स्कीम शासनाने मंजूर केली आहे. पुणे महापालिकेत ३३ वर्षानंतर टीपी स्कीम होत असताना ही दोन गावे हद्दीबाहेर जात असल्याने मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावात मिळकतकर चुकीच्या पद्धतीने लागला असल्याने लाखो रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. त्याविरोधात नागरिकांनी तक्रारी सुरू करून ही गावे वगळण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय झाला व या दोन्ही गावांची नगर परिषद स्थापन केली जाणार आहे. ही बैठक झाल्यानंतर १५ दिवसात त्याचे आदेश निघणार होते, पण महिना उलटून गेला तरी काहीच होत झाले नव्हते. अखेर नुकतेच शासनाने महापालिकेला पत्र पाठवून ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळावीत असा मुख्यसभेत ठराव करून शासनाकडे पाठवावा असे आदेश दिला आहे.

महापालिका प्रशासनाने यासंदर्भात आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणारआहे, पण त्यात ही गावे वगळू नये अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे प्रतिनिधी या नात्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे अंतिम निर्णय काय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्यानंतर नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीच्या हद्दीत त्यांचा समावेश होईल. या दोन्ही गावातील टीपी स्कीमचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेनेच काम करावे अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे, पण शासन पीएमआरडीएकडे ही जबाबदारी देऊ शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांना आहे.

Supriya Sule | प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

| बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय

पुणे|बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.

रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात. बारामती एमआयडीसीतही अनेक कामगार काम करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. या प्रवासाठी केवळ एस टी बसची सेवा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारामती ते मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी एकदमच लवकर आहे. परिणामी बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत. बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटी ने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागतो.

ही बाब लक्षात घेता प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस पुण्याऐवजी बारामतीहून पहाटे पाच वाजता सोडली, तर ती गाडी पुण्यात तिच्या नियोजित वेळी येईल, आणि बारामती परिसरातील प्रवाशांचाही वेळ आणि खर्चही वाचेल, असा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेणू दुबे यांच्यासमोर रेल्वे खात्याला दिला. त्या म्हणाल्या, ‘बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान दोन पैकी एक गाडी सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल व तेथून मुंबईकडे रवाना होईल तसेच मुंबईहून परतताना तीच गाडी बारामतीकडे मुक्कामी आल्यास अनेकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ देखील वाचणार असल्याने ही सेवा लाभदायक ठरेल’

Divyang and senior citizens | दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू – खासदार सुळे

| राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका

पुणे| दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आजचे आंदोलन कोणाच्याही विरूद्ध नसून जेष्ठ आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाने वयोश्री योजनेअंतर्गत तपासणीचा संपूर्ण देशात विक्रम केला आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी ही योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिकांच्या खर्चातुन ही योजना संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी पाहून केंद्र शासनाला शंका आली. त्यामुळे तपासणीसाठी एक स्पेशल टिम पाठवण्यात आली होती. त्या टीमने सुद्धा लाभार्थी संख्या योग्य असल्याचे मान्य केले आहे.

साहित्य वितरण होत नसल्यामुळे आपण स्वतः केंद्रिय मंत्र्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यात पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. कारण आपल्यासाठी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांची सेवा महत्वाची आहे. असे असूनही इतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप होत असून महाराष्ट्राला मात्र डावलण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातही काही ठराविक जिल्ह्यात याचे वाटप झाले आहे. असे असेल, तर केंद्र सरकारची ही योजना देशातील दिव्यांगासाठी आहे की कुठल्या राजकीय पक्षासाठी आहे. याचा खुलासा व्हायला, अशी मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.

शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे त्याचवेळी मावळ आणि पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचे खासदार असूनही केवळ राजकारणासाठी त्या दोन खासदारांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा सवाल करत सुळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ”याच केंद्र सरकारने, ‘दिव्यांगाना लाभपासून वंचित ठेवणे गुन्हा आहे’, असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार आहे. केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी”.
महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

PMRDA Recruitment | PMRDA मध्ये कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा!

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

PMRDA मध्ये कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा!

| पीएमआरडीएच्या आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची मान्यता

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमांना प्राधिकरणाच्या कार्यकारी समिती ने 30 जानेवारी रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्राधिकरण सभे समोर ठेवण्यास मान्यता दिली आहे.  मनोज सौनिक अपर मुख्य सचिव वित्त तथा अध्यक्ष कार्यकारी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर मान्यता देण्यात आली. यामुळे प्राधिकरणाला स्वत:चे कर्मचारी, अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (PMRDA Recruitment)

या बैठकीला नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला , सह आयुक्त बन्सी गवळी व स्नेहल बर्गे , मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर , मुख्य लेखा व वित्त अधिकारा श्रीमती सविता नलावडे प्रत्यक्ष तसेच दोन्ही महानगरपालिका आयुक्त दोन्ही पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण हे व्हिडिओ कॅान्फरन्स द्वारे उपस्थित होते.

या बैठकीत प्राधिकरणाच्या आकृतीबंध मान्यतेचा एक टप्पा पूर्ण झाला. मार्च महिन्यात होणार्‍या प्राधिकरण सभेत आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर व सेवा प्रवेश नियमावलीला शासन मान्यता मिळाले नंतर प्राधिकरणाला स्वत:चे कर्मचारी अधिकारी भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे काम यशदा चे उप महासंचालक प्रताप जाधव यांचे अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केले. या समिती मध्ये सेवा निवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी श्री प्रमोद रेंगे व सेवा निवृत्त उप जिल्हाधिकारी मुकेश काकडे यांनी सदस्य म्हणून व अभिषेक देशमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सचिव म्हणून काम केले असून त्यांना बंसी गवळी सह आयुक्त व राहुल महिवाल महानगर आयुक्त यांचे मार्गदर्शन लाभले.

उप अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक अशी विविध पदे थेट पद्धतीने mpsc मार्फत भरली जाणार आहेत. एकूण 407 पदांच्या आकृतीबंधामध्ये 157 पदे सरळ सेवेने भरली जाणार असून तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील. तत्कालीन पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसाना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत pcntda चे 40 कर्मचारी कार्यरत असून 50 अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

Sant Tukaram Maharaj | भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या माघ दशमी सोहळ्यात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील तीर्थस्थाने भव्य दिव्य व्हावीत अशी सर्वांची भावना असून श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील. मंदिर उभारण्याशी निगडीत अडचणी दूर केल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाठ, भरत गोगावले, माजी मंत्री बाळा भेगडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशिद पाटील आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन करायला आणि वारकऱ्यांना भेटायला आल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भंडारा डोंगर येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. अशा पावन भूमीत येण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. भंडारा डोंगर आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरला आहे. या परिसराचा विकास करताना या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहिले पाहिजे. विकासकामे करताना वारकऱ्यांच्या श्रद्धेला ठेच लागू देणार नाही. त्यामुळेच रिंगरोडच्या मार्गातही बदल करण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे जगातील अतिशय भव्य मंदिर इथे उभे राहिल. श्रद्धा आणि तळमळ असल्यास अशी कामे उभी राहतात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसराचा चांगला विकास आराखडा तयार करावा, त्यासाठी शासनाचे सर्व सहकार्य राहील, असे श्री.शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाच्या रुपाने समाजाला दिशा देणारी मोठी शक्ती महाराष्ट्रात आहे. आपले सण, उत्सव, परंपरा पुढे नेण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. ही परंपरा आपणही पुढे न्यायला हवी. वारकरी संप्रदायाने समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य सातत्याने केले आहे. आध्यात्मिक विचाराने जीवन सफल होतं. आध्यात्मिक सोहळ्यातून अनेकांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होत असते. उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरापासून भक्ती, श्रद्धा, मांगल्याची भावना आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पालखी मार्गाचे काम आणि पंढरपूर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी वारकरी दत्तात्रेय कराळे यांनी पाच लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला

प्रास्ताविकात श्री. काशिद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामाची माहिती दिली.

Indrayani Thadi Jatra | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे ८०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले.

आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Dr Siddharth Dhende | अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती – 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

Categories
Breaking News PMC Political पुणे

अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती

– 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. महापालिकेच्या पथ विभागातर्फे सध्या उर्वरीत रस्त्याच्या 60 लाख रुपयांच्या कामाची सुरूवात झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या कामाचे उद्धाटन भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआय आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य अध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, सचिन धीवार, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, माजी नगरसेविका फरजाना शेख प्रभाग दोन मधील विविध धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आरपीआय आठवले गट, भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक, सामाजिक मंडळांचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, अग्रेसन शाळा ते ई-कॉमरझोनचा रस्ता पुर्ण झाल्यास वाहनधारकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे. वाहनधारकांना मारावा लागणारा मोठा वळसा कमी होणार असून अंतर आणि वेळ वाचणार आहे. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची संपलेली मुदत यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा रस्ता पुर्ण करून नागरिक, नोकरदार, कामगार, वाहनधारकांची गैरसोय दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.

विश्रांतवाडी चौक सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पुणे महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी महापालिकेकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे या वेळी केली.

कॉमरझोन चौकातील वाहतूक कोंडी सुटणार –

प्रभाग दोन मधील कॉमरेझोन चौकात नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केल्याने विद्युत पथदिवे (सिग्नल) बसविन्यात आले आहेत. तसेच डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने चौक सुशोभीकरणाचा आराखडा (डिझाईन) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक आकर्षित होऊन वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे.