Rain | Dams | धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ 

Categories
Breaking News पुणे

धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ

 

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या दोन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा २.९६ झाला आहे.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या दोन ते दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे चार दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ५० मिमी, वरसगाव ५३ मिमी तर टेमघर धरणात सर्वाधिक ६६ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

water at polling stations | पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

| निवडणूक विभागाची शिक्षण विभागाकडे मागणी

पुणे | आगामी महापालिका निवडणुकीची महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचनेननंतर आता मतदारयाद्या देखील अंतिम करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान  अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी  पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवडणूक विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी शिक्षण विभागाला तसे पत्र दिले आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात असून तद्नंतर लवकरच तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले विभागांतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून काही दुरुस्ती असल्यास किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास त्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेकामी आपणाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना योग्य ते आदेश होणेस विनंती आहे. असे पत्रात म्हटले आहे.

Water Storage | MWRRA | सरकार शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार | MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

सरकार शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी

दरम्यान महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या पाणी वापराबाबत आक्षेप घेत प्राधिकरण कडे याचिका दाखल करण्यात आली होती. यात जल शुद्धीकरण केंद्रामधून पाणी शुद्ध करून ते शेतीला सोडण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. याबाबत महापालिका उद्या आपली बाजी मांडणार आहे. यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे याच्यासाहित पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Anil Parab | Wari | वारकरी आणि भक्तासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा 

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

वारकरी आणि भक्तासाठी परिवहन मंत्र्यांची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री  परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे.

पंढरपूर येथे तात्पुरती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही श्री. परब यांनी बैठकीत दिले.

ग्रुप आरक्षणाला प्राधान्य

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले

Vishal Dhanawade | पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे | विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे

| विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी

पुणे | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात मुक्काची असल्याच्या दोन्ही दिवशी शहरात 24 तास पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या सोहळयानिमित्त सुमारे 8 ते 10 लाख वारकरी पुणे मुक्कामी असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मोठया प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता भासते अशा वेळी पालिकेने दरवर्षी प्रमाणे या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

 

याशिवाय, पालखी मार्गाचे रस्ते दुरूस्त करावेत, पावसाळयाचे दिवस असल्याने भवानीपेठ, नाना पेठ परिसरात मांडवाची व्यवस्था करावी, पालखी मार्गात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, स्वाती कथलकर, भाऊ शिंदे, योगेश खेंगरे , अनिकेत थोरात , अनिल ठोंबरे, सनी मुसळे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Water wasted : ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!  :  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!

:  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार

पुणे : बाणेर आणि बालेवाडी परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकडे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गंभीरपणे लक्ष वेधले आहे. पाषाण पंपिंग स्टेशन प्रत्यक्ष जाऊन पाणी टंचाई बाबत अमोल बालवडकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी करोडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://youtube.com/shorts/1kESO8wMEaE

याबाबत अमोल बालवडकर म्हणाले, मी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले. हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?

गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जर हि समस्या दिसत आहे तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हि समस्या का दिसत नाही..? झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे खरच कठीण आहे.

बालवडकर पुढे म्हणाले, येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.

सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन ना.मा.श्री.अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार मा.श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.

Irrigation Department Vs PMC : महापालिकेने पाटबंधारे विभागाला जाब विचारला खरा; मात्र पाटबंधारेचा महिना उलटूनही कसलाही प्रतिसाद नाही 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेने पाटबंधारे विभागाला जाब विचारला खरा; मात्र पाटबंधारेचा महिना उलटूनही कसलाही प्रतिसाद नाही

पुणे : महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिका खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी उचलते. त्याबदल्यात महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देते. मात्र पाणीपट्टी थकीत असल्याने आता जलसंपदा विभागाने महापालिकेवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या परस्पर जलसंपदाने 23 कोटी रुपये वळते करून घेतले आहेत. विशेष म्हणजे महापालिका म्हणते कि थकलेली पाणीपट्टी एवढी नाही. असे असतानाही जलसंपदा विभागाने जास्तीची रक्कम समायोजित करून घेतली आहे. दरम्यान जलसंपदा विभागाचे असे धोरण असताना देखील महापालिकेने मात्र गुळमुळीत भूमिका घेतली होती. मात्र टीका झाल्यानंतर महापालिकेने जलसंपदा विभागाला याचा जाब विचारला. समायोजित केलेली रक्कम तात्काळ परत करावी, असे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला मागील महिन्यात पाठवले होते. मात्र महिन्याभरापासून पाटबंधारे विभागाचा महापालिकेला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका अजून एकदा पत्र पाठवणार आहे.

: महापालिकेने काय म्हटले आहे पत्रात? 

पुणे महानगरपालिकेचा शासन मान्य पाणीपुरवठा १६.३६ TMC असून पुणे महानगरपालिका खडकवासला घरणामधून, जॅकवेल व बंद पाईपलाईन द्वारे पाणी घेत आहे. पुणे महानगरपालिका प्रत्यक्ष वापर केलेल्या पाण्याचे मीटर
रिडिंग नुसार व MWRRA च्या मान्य दरानुसार पाणीपट्टी पाठबंधारे विभागाकडे अदा करत आहे.  पुणे महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाकडे मार्च २०२२ अखेर कोणतीही थकीत पाणीपट्टी असल्याबाबत
कळविले आहे. आपल्या विभागाकडे पुणे महानगरपालिकेची स्थानिक उपकरा पोटी जमा असलेली रक्कम रुपये २३,०१,७७,११०/-, थकीत पाणीपट्टी दर्शवून समायोजित केल्याचे दिसून येते. पुणे महानगरपालिकेस देय असलेली रक्कम परस्पर वर्ग करून घेण्यात आलेली आहे. तरी पाणीपट्टी थकबाकीपोटी समायोजित केलेली स्थानिक उपकराची रक्कम रुपये २३,०१,७७,११०/- त्वरित पुणे महानगरपालिकेकडे
वर्ग करण्यात यावी हि विनंती.

हे पत्र मागील महिन्यात पाठवण्यात आले होते. मात्र पाटबंधारे विभागाने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही.

23 Villeges Water Supply : समाविष्ट 23 गावांच्या पाण्याबाबत उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

समाविष्ट 23 गावांच्या पाण्याबाबत उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

: टँकर ने पाणीपुरवठा करा

पुणे – महापालिकेत (Pune Municipal) समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील (Villages) पाणी पुरवठ्याची योजना (Water Supply Scheme) पूर्ण होत नाही, तो पर्यंत पुणे महापालिकेने या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी २३ गावातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी बनविण्यात आले आहे. जुलै २०२१ मध्ये राज्य सरकारने पुणे शहराच्या हद्दी लगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांना प्रचंड मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

२३ गावे महापालिकेत येण्यापूर्वी तेथे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी दिली जात होती. त्यावेळी त्यांनी बिल्डरांकडून भोगवटा प्रमाणपत्र देताना नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करून घेतला जाईल असे लिहून घेतले आहे. दरम्यान ही गावे महापालिकेत आल्यानंतर तेथील नागरिकांनी पुणे महापालिकेकडे पाणी पुरवठ्याची मागणी केली. पण ती अमान्य करत महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत संबंधित बिल्डरने पाणी द्यावे अशी सूचना केली. यावादात या भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतः पैसे खर्च करून टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.

प्रशासकीय वादात नागरिकांचे हाल होत असल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये न्यायालयात सुनावणी झाली. ४ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे, त्यावेळी राज्याच्या महाधिवकत्यांना उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे महापालिकेची पाणी पुरवठ्याची योजना जो पर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा असेही आदेश न्यायमूर्ती अभय अहुजा आणि ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात आमदार भीमराव तापीकर व याचिकाकर्ते दिलीप वेडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Water Supply for merged villeges : Ganesh Dhore : समाविष्ट गावांत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपट्टी माफ करा :

Categories
Breaking News PMC Political पुणे

समाविष्ट गावांत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी पट्टी माफ करा

: स्थायी समिती समोर प्रस्ताव

पुणे : नागरीकांना पिण्याचे पाणी स्वखर्चाने विकत घ्यावे लागत आहे. परंतु या नागरिकांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपातील टॅक्स मनपा प्रशासन दंडासह सक्तीने वसुल करत आहे. ज्या सुविधेचा लाभच या समाविष्ट गावातील नागरिकांना मिळत नाही, त्या सुविधेचा/ गोष्टीचा टॅक्स पुणे महानगरपालिकेने सक्तीने वसूल करणे, हे या समाविष्ट ११ व २३ गावांमधील नागरिकांवर अन्यायकारक आहे. या समाविष्ट गावातील सर्व नागरीकांना पुणे महानगरपालिकेने २४ तास पाणीपुरवठा तातडीने करावा अन्यथा, जोपर्यंत पुणे महानगरपालिका पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा या नागरिकांना करू शकत नाही, तोपर्यंत या गावातील नागरीकांना एकूण टॅक्स मधून पाणीपट्टी ची रक्कम माफ करण्यात यावी.  अशी मागणी नगरसेवक गणेश ढोरे यांनी केली आहे. याबाबत प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: धोरण करण्याची मागणी

नगरसेवक ढोरे यांच्या प्रस्तावानुसार सन २०१७ साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झालेली ११ गावे व नुकतीच समाविष्ठ २३ गावे सोई सुविधांच्या बाबतीत मागास आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सोई सुविधापूर्ण क्षमतेने पुरवण्यात पुणे महानगरपालिका अक्षरश: अपयशी ठरलेली दिसत आहे. याठिकाणी पुणे महानगरपालिकेने किमान मुलभूत सुविधा तातडीने पुरविणे क्रमप्राप्त आहे. या ११ व २३ गावातील बहुतांशी भागातील रहिवासी सोसायट्या, वाड्या-वस्त्या, नागरी वसाहतींमध्ये पुणे महानगरपालिका पिण्याचे पाणी पुरवठा करण्यास असमर्थ आहे. नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे. या नागरीकांना पिण्याचे पाणी स्वखर्चाने विकत घ्यावे लागत आहे. परंतु या नागरिकांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपातील टॅक्स मनपा प्रशासन दंडासह सक्तीने वसुल करत आहे. ज्या सुविधेचा लाभच या समाविष्ट गावातील नागरिकांना मिळत नाही, त्या सुविधेचा/ गोष्टीचा टॅक्स पुणे महानगरपालिकेने सक्तीने वसूल करणे, हे या समाविष्ट ११ व २३ गावांमधील नागरिकांवर अन्यायकारक आहे. या समाविष्ठ गावातील सर्व नागरीकांना पुणे महानगरपालिकेने २४ तास पाणीपुरवठा तातडीने करावा अन्यथा, जोपर्यंत पुणे महानगरपालिका पूर्ण क्षमतेने, २४ तास पाणीपुरवठा या नागरिकांना करू शकत नाही, तोपर्यंत या गावातील नागरीकांना एकूण टॅक्स मधून पाणीपट्टी ची रक्कम माफ करण्यात यावी. यासाठी प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेवून, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर, ऑनलाइन पद्धतीने असे अर्ज स्वीकारून पुढील सवलत नागरिकांना लागू करणेसाठी यंत्रणा राबवण्यात यावी. असे ढोरे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

समाविष्ट गावांतील सोसायटीत राहणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाणी विकतच घ्यावे लागते. त्यामुळे किमान पाणीपट्टी तरी माफ करावी, म्हणून हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

            गणेश ढोरे, नगरसेवक.

Jayant Patil : Prashant Jagtap : “खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील. असा टोला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.

: पाणी कपात नाही : जयंत पाटील

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील प्रतिनिधींसोबत जलसंपदा मंत्री .जयंत पाटील  यांनी सिंचन भवन येथे आज ४.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी  शिष्टमंडळाने  बाबतचे निवेदन जलसंपदा मंत्र्यांना दिले असता .पाटील  म्हणाले की, “अश्या प्रकारची कुठलीही पाणी कपात करण्यात आलेले नाही किंवा राज्य सरकार अश्या प्रकारच्या विचाराधीन नाही. गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारच्या काळात देखील तब्बल ११ वेळा अश्या प्रकारचे पत्र जलसंपदा विभागाकडून महानगरपालिकेला पाठवण्यात आली होती तसेच फडणवीस सरकारने एक महिना 180 mld क्षमतेचा एक पंप बंद ठेवत पुणेकरांवर पाणी कपात लादली होती. आम्ही मात्र कुठल्याही प्रकारच्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसून पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात रिसायकलिंगद्वारे तसेच पश्चिम घाटातील पाणी या महानगरांकडे वळवण्याच्या विचाराधीन आहोत.”

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेतली : जगताप

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष .प्रशांत जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या १७ वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या काळात कधीही पाणी कमी पडू दिले नाही, परंतु केवळ अधिकारी स्तरावरील एका पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस पाण्याचे राजकारण करू पाहत आहे. या शहराच्या पाणी व्यवस्थापनात नेहमीच आदरणीयअजितदादांनी पुणे शहराचा नव्याने होणारा विस्तार विचारात घेत पाणी व्यवस्थापन करण्यात आले.एवढेच नाही तर या पाण्याव्यतिरिक्त भामा-आसखेड प्रकल्पातील २.५ TMC पाणी अजितदादांमुळे पुणे शहरास मिळाले. गेल्या ५ वर्षांच्या काळात पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हातात महानगरपालिकेची सत्ता दिली मात्र देशात,राज्यात सत्ता असूनही फडणवीसांना पुणे शहरासाठी काहीही करता न आल्याने पाणी प्रश्नाआडून महापालिकेचे राजकारण फडणवीस करू पाहत आहेत.विशेष म्हणजे यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदर अश्या प्रकारचे पत्र बाहेर येणे हे सुद्धा संशयास्पद आहे.  जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील साहेबांच्या या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. खर बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरील नेत्यांपासून सर्वांचीच “खोट बोल पण रेटून बोल ” ही प्रवृत्ती असून पुणेकर या प्रवृत्तीला येत्या काळात निश्चितच धडा शिकवतील.
या शिष्टमंडळात आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,विरोधीपक्षनेत्या दिपालीताई धुमाळ,  जयदेवराव गायकवाड,  रविंद्र माळवदकर, देशमुख आदी उपस्थित होते.