Water Closure | येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद

पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या सोमवारी व रविवारी  बाधित होणारे भागास  पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
आगम मंदिर ESR :- दि. १३/०२/२०२३ रोजी दत्तनगर, आगम मंदिर, संतोषीनगर, अंजलीनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता
Institute ESR :- दि. १४/०२/२०२३ रोजी वडगाव बु., निवृत्ती नगर, चरवड वस्ती, जाधवनगर, गोसावी वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच बंडखोरी उफाळून आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीचसमोर दाभेकरांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.

याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती. अखेर महाविकास आघाडीच्या शिष्टाईला मोठं यश आलं असून बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

AAP | Kasba By election | आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

Categories
Breaking News Political पुणे

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे,  एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे  आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल” असे त्यांनी सांगितले.

विजय कुंभार म्हणाले, “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

 

Voter ID | मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्रदेखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्रदेखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार

पुणे | जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचादेखील समावेश करण्यात आला आहे.

ओळखीसाठी बारा पुरावे:
मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्टकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (युनिक डिसेबिलीटी आयडी) यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

मतदार यादीवरून मतदाराची ओळख निश्चित होत नसल्यास मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी एक पुरावा ग्राह्य धरण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. परदेशातील मतदारांना केवळ ओळखीसाठी त्यांचा मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल.

मतदाराला त्याच्या/तिच्या मतदान केंद्राच्या मतदार यादीचा अनुक्रमांक जाणून घेण्याची सुविधा देण्यासाठी मतदानाची तारीख, वेळ आदी नमूद असलेली मतदार माहिती चिठ्ठी देण्यात येणार आहे. यात मतदान केंद्र, तारीख, वेळ आदी माहितीचा समावेश असेल. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या दिवसाच्या आधी माहिती चिठ्ठी वितरित केली जाईल, परंतू अशी चिठ्ठी मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Pune | Property Tax Hike | पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांना मिळणार दिलासा!  मिळकतकरात वाढ होणार नाही?

पुणे – पुणे महापालिकेकडून पुणेकरांवर मिळकत कर वाढीचा बोजा टाकण्यात येणार नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी याबाबत मिळकत कर विभागाला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे म्हटले जात आहे. (PMC pune)

पुणे महापालिकेच्या २०२२-२३ या वर्षासाठी प्रशासनाने मिळकतकरात ११ टक्के करवाढ सुचविली होती. मात्र मागील वर्षी नगरसेवकांनी कर वाढ फेटाळून लावली होती. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून २०१५ सालापासून कर वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा मिळकत करात वाढ सुचवली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. कारण सद्यस्थितीत महापालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे विरोध होणार नाही. या कारणास्तव कर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार याबाबत सकारात्मक नाहीत. मिळकत करात वाढ सुचवू नये, असे निर्देश त्यांनी कर विभागाला दिले आहेत. (Property tax pune)

कारण  आपल्या हक्काच्या घरात राहणाऱ्या मिळकत धारकांना महापालिका १९७० सालापासून मिळकतकरामध्ये  ४० टक्के सवलत देत होती. मात्र राज्य सरकारने ही सवलत रद्द केली आहे. त्याचा बोजा पुणेकरावर पडत आहे.  तसेच यंदा अभय योजना देखील लागू केली गेली नाही. शिवाय मिळकत करात वाढ हा धोरणात्मक निर्णय आहे. नगरसेवक असल्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही. असे आयुक्त यांना वाटते. त्यामुळे करवाढीचा बोजा टळेल, असे म्हटले जात आहे. (Pune Municipal corporation)

Pune Traffic | विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे | गणेशखिंड रस्त्यावर (Ganeshkhind Road) मेट्रोचे (Metro) काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात (University Chowk) होणारी वाहतूक कोंडी (Traffic) सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्यासंदर्भातील‌ प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

सदर कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी श्री. पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा असे निर्देश या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत सदर मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Affidavit | Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

Categories
Breaking News Political पुणे

रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) महा विकास आघाडीकडून काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

 

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.

Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

Categories
Breaking News PMC पुणे

वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

| पाटबंधारेने मागितली आहे 435 कोटींची थकबाकी

पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारे विभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये आज महापालिकेतच वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान महापालिकेने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने सांगितले. यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही महापालिकेला कुठलेच आश्वासन न देता निघून गेले.

पाटबंधारे विभागाकडून पाणी वापराच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. त्यावर पाटबंधारे विभागाने बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा वाढीव बिल दिले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे 99 कोटी बिल देत आजपर्यंतची थकबाकी 435 कोटी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. शिवाय याबाबत पत्र देत बिल देण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला कायदा समजावून सांगत एवढे बिल नसल्याचे म्हटले होते.

महापालिका प्रशासनानुसार महापालिका फक्त घरगुती वापरासाठी पाणी देते. औद्योगिक वापरासाठी नाही. महापालिका कायद्यात तसे म्हटले आहे. त्यामुळे दंड वगैरे धरून महिन्याला फक्त 5 कोटी बिल येऊ शकते. त्यानुसार बिले द्यावीत असे महापालिकेने पाटबंधारे ला पत्र लिहिले होते. शिवाय आजपर्यंत ज्यादा घेतलेले पैसे देखील देण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने आपलाच हेका लावून 435 कोटींचे बिल पाठवले आहे.

दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज महापालिकेत आले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि अकाऊंटंट यांचा समावेश होता. सुरुवातीला मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता रामदास तारू यांच्याकडे ही बैठक झाली. यावेळी तारू यांनी सांगितले कि तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात. कायद्यानुसार फक्त घरगुती पाणी वापराचे बिल देणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही औदयोगिक वापराचे बिल देणार नाही. मात्र पाटबंधारे विभागाला ही भूमिका पटली नाही. त्यामुळे तिथे चांगलाच वाद झाला. तारू यांनी या अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता यांना भेटण्यास सांगितले. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देखील असाच वाद झाला. पावसकर यांनी देखील घरगुती वापराचे बिल देण्याची मागणी लावून धरली. पाटबंधारे विभागाने यावर काही आश्वासन दिले नाही. ते तसेच उठून गेले.

Affidavit Hemant Rasane | हेमंत रासने यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती  | निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती 

Categories
Breaking News Political पुणे

हेमंत रासने यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती 

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातून त्यांच्याकडे जवळपास 17 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. त्यात जमीन विकत घेण्याकडे त्यांचा जास्त कल असल्याचे दिसून आले.

यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी मृणाली रासने यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ६२ लाख २६ हजार ८५२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम २२ हजार २०० रुपये इतकी आणि १८ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १७ कोटी इतकी असून त्यांचा जमीन खरेदी करणे याकडे जास्त कल असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी आपला मुलगा आणि मुलीच्या नावाने जवळपास एक कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

हेमंत रासने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते स्वतः बांधकाम व्यवसायाचे काम करत असून तीन कंपन्यामध्ये भागीदार आहेत. तर त्यांच्या पत्नी या व्यवसाय तसेच शेती करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळच्या बोरघर, टाळसुरे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जवळील पोंभुर्ले तसेच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हाळुंगे आणि भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली येथे शेतजमीन आहे. हेमंत रासने आणि त्यांची पत्नी मृणाली रासने अशी दोघांच्या नावे २५ एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील सदाशिव पेठ येथे दोन फ्लॅट बुधवार पेठ येथे एक फ्लॅट देखील आहे.

हेमंत रासने यांनी आपले वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. तसेच हेमंत रासने यांच्याकडे एक इनोव्हा कार आणि एक दुचाकी वाहन आहे.

Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

पुणे| भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत.

सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जागृती करत आहेत.

८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२ डी’ नमुना अर्ज भरुन घेत आहेत.

त्याशिवाय दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हीलचेअर, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, आदीसंबंधाने चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

चिंचवड मतदारसंघात किर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती

जिल्ह्यातील 205-चिंचवड विधानसभा मतदारसंघात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांना मतदान करण्यासाठी आग्रह धरावा यासाठी किर्तनाच्या माध्यमातून त्यांना मतदानाचे महत्व समजविण्यात आले.

श्री आनंद विद्या प्रसारक मंडळाच्या संचेती शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध कीर्तनकार श्री गजानन व्हावंल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी मतदानाचे असलेले महत्व समजावले. विद्यार्थ्यांना मतदानासाठी कुटुंबातील पात्र मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शपथ देण्यात आली. विविध शाळांमधून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू रहाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवडणूक नायब तहसीलदार श्वेता आल्हाट यांनी मतदान जागृती उपक्रमाविषयी माहिती दिली. विद्यार्थीदेखील मतदान जनजागृतीत सहभागी होऊन लोकशाळी बळकट करण्यासाठी योगदान देऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश मोरे, शिक्षण अनिल शिंदे, उद्धव वाघमारे, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.