Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
———-
विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ! | हेमंत रासने यांचा विश्वास

गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.

kasbapeth Bypoll | कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर 

Categories
Breaking News PMC Political पुणे संपादकीय

कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर

पुणे | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेस ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोटनिवडणुकीच्या ही लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर होईल. मुख्य लढत आता हीच असणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची असणार आहे.
भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांना बराच विरोध सुरु झाला होता. टिळक कुटुंबातील एखादा उमेदवार दिला जाईल, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज झाल्याची चर्चा आहे. मात्र भाजपचा सर्वे सांगतो कि कसब्यात रासने याना पसंती आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली गेली. मात्र त्यामुळे नाराजी पसरली आहे, हे नक्की. असं असलं तरी भाजपने ही लढाई आपली संघटना म्हणून प्रतिष्ठेची केली आहे. भाजपकडून संदेश गेला आहे कि कसब्यात कमळ निवडून आणायचे आहे. त्यानुसार नाराज कार्यकर्त्या सहित सर्वांनी कमळ निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. किमान आपल्या मोबाईलचे तसे स्टेटस ठेवले आहेत. असं असलं तरीही भाजपचे संघटन मजबूत आहे, हे सर्वच जाणतात. त्यामुळे संघटन म्हणून काम केल्यांनतर भाजपसाठी सोपे काम होणार आहे.
काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यांनतर तसा फारसा कुणाचा विरोध झाला नाही. बागवे पिता पुत्र नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र ते वेगळ्याच कारणासाठी. धंगेकर यांना उमेदवारी दिली जावी, ही महाविकास आघाडीतील सर्वच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची भावना होती. नेहमीसारखे धक्के न देता काँग्रेसने ही धंगेकर यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत धंगेकर हे एकदम तगडा उमेदवार मानले जातात. गिरीश बापट यांना देखील धंगेकर यांनी टस्सल दिली होती. पूर्वी ते मनसेत होते. ते कुठेही असले तरी लोकांच्या कामासाठी ते नेहमीच धावून जातात, असे म्हटले जाते. जनमानसात त्यांची प्रतिमा ‘आपला माणूस’ अशी आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होणार आहे. कसंही असो धंगेकर उमेदवार असल्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत आहे.

Pune News | Road Devlopment | चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस 

Categories
Breaking News PMC पुणे

चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस

पुणे | महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या विकासावर चांगलेच लक्ष दिले आहे. येत्या काळात शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात  सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. G 20 च्या धर्तीवर या रस्त्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
शहरात नुकतीच G 20 परिषद झाली. यामध्ये वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधि सामील झाले आहे. शहरांचा पायाभूत विकास ही संकल्पना यामागे होती. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून थोड्या अवधीत शहर चकाचक केले होते. यामध्ये रस्त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास केला होता. त्याच धर्तीवर आता शहरातील महत्वाचे रस्ते विकसित केले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात  सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. असे दांडगे यांनी सांगितले.  यामध्ये बॅरीगेड्स आधुनिक पद्धतीचे लावले जाणार आहेत. जेणेकरून रस्ता चांगला दिसेल.  तसेच फुटपाथ, सायकल ट्रॅक व्यवस्थित केले जाणार आहेत.  ही सर्व सुशोभीकरणाची कामे G  20 च्या धर्तीवर केली जाणार आहेत. इतर खात्याबरोबर बैठक घेऊन priority ने कामे करावी लागणार आहेत. असेही दांडगे म्हणाले.

Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 

Categories
Breaking News Political पुणे

भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की!

पुणे | कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते आहे. मात्र भाजपने टिळक परिवार सोडून दुसरा उमेदवार का दिला, याचे कोडे मात्र भाजपच्या लोकांना सुटलेले दिसत नाही. कारण मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज आहेत. तसेच मतदार संघातील ब्राम्हण समाजाने देखील नाराजी दाखवली आहे. तसेच वारंवार एकाच माणसाला वेगवेगळ्या पदावर संधी दिली जाते, म्हणूनही अंतर्गत कलह आहे. त्यातच महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. रवींद्र धंगेकर सारखा तगडा उमेदवार आघाडीने दिला तर भाजप साठी ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी नसणार हे नक्की मानले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, पारंपारिक गड मानला जातो. राजकीय धुरंधर मानत होते कि या जागेवर दगड जरी उभा केला तरी भाजपच निवडून येईल. काही काळापूर्वी तशी परिस्थिती होती देखील. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या मतदारसंघावर खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व होते. मात्र आता भाजपनेच तीच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बापट मागे पडले होते. शिवाय बापटांना त्यांची तब्येत देखील आता साथ देत नाही. बापट यांना जनमानसातील नेता म्हणून ओळखले जायचे. बापट लोकांबरोबर वागायचे देखील तसेच. त्यामुळे कसबा पेठ फक्त भाजपचाच राहिला. बापट खासदार झाल्यामुळे मुक्ता टिळक यांना इथे संधी  मिळाली. त्यांनी संधीचं सोनं केलं. मात्र नियतीनं डाव टाकला आणि मुक्ता टिळक यांना हे सुख फार काळ लाभू दिले नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
पोटनिवडणुकीसाठी बऱ्याच इच्छुकांची नावे  चर्चेत होती. यामध्ये टिळक पिता पुत्र म्हणजे शैलेश टिळक आणि कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश होता. मात्र पक्षाने हेमंत रासने यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नाराजी वाढताना दिसून येत आहे. शैलेश टिळक यांनी फडणवीस यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे. साक्षात गिरीश महाजन याना टिळकांची मनधरणी करण्यासाठी केसरी वाड्यावर यावे लागले. मात्र एवढ्याने टिळकांचे समाधान होणार नाही. तसेच ब्राम्हण समाजाने देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात अपेक्षित होते कि टिळक परिवारातील आणि ब्राम्हण समाजाचाच उमेदवार दिला जाईल. मात्र तसे न झाल्याने लोक नाराज झाले आहेत.
भाजपने कितीही नाकारले तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत जे केलं, तो प्रसंग विसरायला लोक तयार नाहीत. अजूनही त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे. तसेच भाजपविषयी रोष देखील. तसेच भाजपमध्ये अंतर्गत कलह देखील आहे. कारण हेमंत रासने याना महापालिकेत 4 वेळा स्थायी समितीचा अध्यक्ष बनण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारकी साठी देखील त्यांचेच नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हा रोष वाढतानाच दिसतो आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ही निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे. कारण टिळक घराण्यातील जरी उमेदवार दिला असता तरी आघाडी ही निवडणूक बिनविरोध नकरता लढणारच होती. हे भाजपच्या गोटात कळायला उशीर लागला नाही. त्यामुळेच भाजपला देखील तशी तयारी करावी लागत आहे. कसबा मतदार संघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, फक्त ब्राम्हण समाज नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा इथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते मानतात कि धंगेकर उमेदवार असतील तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. असं झालं तर महाविकास आघाडीचं पारडं जड होईल. भाजपासाठी सध्या तरी जमेच्या गोष्टी कमी आहेत. भाजपला काहीतरी चमत्कार करावा लागणार. तसा तो होऊही शकेल. मात्र पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की आहे.

cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

| ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations)

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.

Hemant Rasane | गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट

Categories
Breaking News Political पुणे

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता

| गणपती मंडळाना वंदन करणार

कसबा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप शिवसेना बाळासाहेबांची महायुतीच्या वतीने मला मिळालेली उमेदवारी हा गणपती मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असे मी मानतो म्हणून पुढील दोन दिवसात मतदारसंघातील सर्व गणपती मंडळांना भेट देणार असून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची भावना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली. (Hemant Rasane)

भाजपच्या वतीने रासने यांना उमेदवारी मिळाल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि ग्रामदैवत कसबा गणपतीचे आरती करून या मोहिमेला आज प्रारंभ केला. पुढील दोन दिवसात ते मतदार संघातील सर्व गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. रासने यांच्या सामाजिक राजकीय कारकीर्दीची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे कार्यकर्ता म्हणून झाली होती.

•गेली ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं फळ मला पक्षानी उमेदवारी देऊन दिलं. पक्षाने दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करेन. कसबा हा भाजपाचा अनेक वर्षांपासूनचा असलेला गढ आहे.
पक्षातील सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने हि निवडणूक विक्रमी मतांनी जिंकू असा विश्वास आहे. सर्वांना मान्य, सर्व सामान्य, गणेश मंडळाचा कार्यकर्ता, ही आमची टॅगलाईन आहे. नागरिकांचा आशीर्वाद हिच आमची संपत्ती आहे.कोरोनाकाळात पुणे महापालिकेचं उत्पन्न मी वाढवून दाखवलं होतं. पुणे शहरात विविध उपक्रम राबवून शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला होता. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याला प्रमोशन व्हावं हि अपेक्षा असते, नगरसेवक म्हणून काम करत असतांना राज्याच्या विकासात आपला हातभार असावा हि स्वाभाविक इच्छा असते.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट दिली त्यानंतर मामलेदार कचेरी येथे जाऊन उमाजी नाईक यांना अभिवादन केले रासने यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कुटुंबीयांची टिळक वाड्यात जाऊन भेट घेतली. मुक्ताताईंच्या प्रतिमेला अभिवादन केले.

By Election | Devendra Fadnavis | उमेदवारी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना आवाहन करणार | देवेंद्र फडणवीस

भाजपच्या राष्ट्रीय समितीने पुणे आणि चिंचवड च्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा साठी हेमंत रासने तर चिंचवड साठी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान विद्यमान आमदारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्याने ती बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच विरोधी पक्षांना करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कसबा पोट निवडणुकीसाठी अपेक्षित होते कि मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार दिला जाईल. त्यानुसार शैलेश आणि कुणाल टिळक यांनी तयारी देखील सुरु केली होती. मात्र भाजपने रासने याना उमेदवारी दिली आहे. चिंचवडला मात्र भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या घरातील उमेदवार देण्यात आला आहे. चिंचवड ची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. कारण घरातील उमेदवार असेल तर आम्ही निवडणूक लढणार नाही, असे अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. कसब्यात मात्र टस्सल होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला नसला तरी जागावाटप निश्चित केले आहे. त्यानुसार काँग्रेस कडे कसबा तर राष्ट्रवादीकडे चिंचवड देण्यात आला आहे. त्यानुसार कस्ब्यासाठी काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यानुसार रासने आणि धंगेकर यांच्यात लढत होईल.
असे असले तरी या दोन्ही पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना आवाहन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 
पुणे जिल्ह्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी श्री हेमंत रासने (कसबा) आणि श्रीमती अश्विनी ताई जगताप (चिंचवड) यांना विजयासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! मात्र विद्यमान आमदारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असल्याने ती बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच विरोधी पक्षांना करणार!

हेमंत नारायण रासणे

* सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक
* सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद
* अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड
* उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती स्ट
* सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

महत्त्वाची विकासकामे
* स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ
* पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास
* मंडईत भुयारी मेट्रो
* समान पाणीपुरवठा – 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा
* भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय
* शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.
* मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती
* कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा
* नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती

महत्त्वाचे उपक्रम
* साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन
* कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
* कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण
* कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य
* कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान

Art Of Living | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे | जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हींगने (Art of living) अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काढले.

कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गुरूदेव श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायित्वही गुरूदेवांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हींग अग्रेसर होती.

गुरूदेव भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक

गुरूदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi shankar) यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे संदेश वाहक पहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य गुरूदेवांनी केले. हे करत असताना भारतीय विचारांचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंद यांच्यानंतर जगाला पटवून देण्याचे कार्य गुरूदेवांनी केले.

विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यात झाल्याचे नमूद करून पुणे हे बुद्धी अणि विद्येचे माहेरघर असल्याने इथेच अथर्वशिर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे आणि अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा सोहळा साजरा होतो. तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामुहिक अथर्वशिर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ.चित्रा आणि वर्ड बुक ऑफ लंडनचे डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.

BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून सादर करण्यात आला. अशी माहिती पुणे महिला मोर्च्याच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरआण्णा मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे मार्गदर्शक खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच इतर महिला मैत्रिणी, आणि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.
यावेळी महिलांना प्रोत्साहन देताना चित्राताई म्हणाल्या, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल.
या बैठकीतून अनेक महिलांनी त्यांची मते मांडली. प्रश्न समोर ठेवले आणि त्यातून त्यांना अनेक धुरंधर राजकीय नेत्यांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन, सल्ले आणि सहकार्य लाभले. असे पाटील यांनी सांगितले.

Tata Group Vs PMC | ‘उज्वल’ चे काम असमाधानकारक | महापालिकेकडून टाटा ग्रुप च्या उज्वल कंपनीबाबत राज्य सरकार कडे अभिप्राय

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

‘उज्वल’ चे काम असमाधानकारक | महापालिकेकडून टाटा ग्रुप च्या उज्वल कंपनीबाबत राज्य सरकार कडे अभिप्राय

पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. तर दुसरीकडे कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला होता. यावर आता महापालिकेने राज्य सरकारला आपला सविस्तर अहवाल पाठवला आहे. त्यानुसार कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने म्हटले आहे. त्यामुळे २०% बिल देखील अडवले असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. (PMC Pune Vs Ujwal pune Ltd)
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला. (Pune Municipal corporation)
महापालिकेच्या विद्युत विभाग मार्फत २०१० सालापासून शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील प्रकाशासाठी एलईडी पथदिवे उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले होते कारण यामुळे उर्जा बचत होत होती. त्यानुसार इस्को तत्वावर टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये पथदिवे सहित प्रत्येक फिडर स्काडा सिस्टीम च्या अंतर्गत बसवण्याचा कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले. कंपनीला कामानुसार रनिंग बिले देखील देण्यात येऊ लागली. आतापर्यंत ११८ कोटींची बिले देखील देण्यात आली. मात्र कंपनी प्रत्यक्ष जागेवर बसवलेल्या फिटिंग नुसार बिले न देता वाढीव बिले देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी निदर्शनास आणून दिली.
लेखापरीक्षक यांनी दुसरा आक्षेप काढला आहे. त्यानुसार कंपनी कडून स्काडा सिस्टीम चालू केली नसतानाही काही बिले विद्युत विभागाकडून अदा करण्यात आली आहेत. टेंडर मधील अटीनुसार बिल अदा करण्यासाठी स्काडा consumption रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र हा रिपोर्ट नसताना देखील बिल अदा केले गेले. त्यामुळे अदा केले गेलेल्या बिलापैकी ५ कोटी ४४ लाख कंपनी कडून वसूल करावेत. असे एकूण १५ कोटी उज्वल कंपनी कडून वसूल करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत. (tata groups Ujwal pune ltd)
त्यानुसार विद्युत विभागाने कंपनीवर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. कंपनी कडून १५ कोटी वसूल करण्या बाबत देखील पत्र देण्यात आले आहे. शिवाय काम चोख करण्याबाबत बजावले आहे. यावर कंपनी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. कारण कंपनीने याबाबत महापालिकेची राज्य सरकार कडे तक्रार केली आहे. महापालिका वेळेवर बिले देत नसल्याने आमचे नुकसान होत आहे. असे कंपनीचे म्हणणे आहे. राज्य सरकारने देखील यावर महापालिकेचा अभिप्राय मागवला होता. (state government)
महापालिकेने आपला सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यानुसार उज्वल कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. कंपनीकडे कामाचा सर्वे रिपोर्ट वारंवार मागितला होता, मात्र तो ही अद्याप दिलेला नाही. अशी तक्रार महापालिकेने केली आहे. कंपनी कडून कामाची पूर्तता न झाल्याने मार्च २०२२ पासून आजपर्यंत २०% बिल अदा करण्यात आलेले नाही. असे देखील महापालिकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.