Katraj-Kondhva Road | भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार 

Categories
Breaking News PMC पुणे

भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलणार

| सल्लागारास सुधारीत रचनेचा आराखडा करण्याच्या सूचना

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी करोडो रुपयाचा खर्च होणार आहे. हा यातील ज्यादा खर्च हा भूसंपादन साठी होणार आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च वाचवण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा आराखडा बदलला जाणार आहे. त्यासाठी, या रस्त्याचा सुधारीत आराखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचना या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या सल्लागारास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आता पर्यंत केलेला कोटयावधीचा खर्च मात्र वाया जाणार आहे. अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

 

हडपसरकडून नवीन पुणे-बेंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. सध्याच्या स्थितीत हा रस्ता अवघा 18 मीटर रूंद असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला अनेक भागात अतिक्रमणे झाल्याने या रस्त्यांवर मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेडून हा रस्ता तब्बल 84 मीटर रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी करावे लागणार भूसंपादनासाठी तब्बल 650 कोटींचा खर्च अपेक्षित होता तर या रस्त्याचे काम करण्यासाठी पालिकेने 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी तब्बल 149 कोटींच्या खर्चास मान्यता दिली तर हे काम भूसंपादनासह तीन वर्षात करण्यात येणार होता. मात्र, भूसंपादनासाठी नागरिक रोख मोबदला मागत असल्याने तीन वर्षांच्या मुदतीनंतरही या रस्त्याचे 20 टक्केच काम झाले आहे. तर आता पर्यंत भूसंपादन झालेल्या रस्त्यावर 39 कोटींचा खर्च करण्यात आला असून या कामास दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मात्र, आता पालिकेकडे सर्व जागामालक रोख मोबदला मागत असल्याने पालिकेची भूसंपादनाची क्षमताच नाही. तर रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अपघात थांबण्यास तयार नाहीत. त्यामुळे, हा रस्ता अर्धवटच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या रस्त्याची रूंदीच कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, महापालिकेचा भूसंपादनाचा खर्च निम्म्या पेक्षा अधिक वाचणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्चही कमी होणार असून रस्ता तातडीनं पूर्ण करता येणार आहे. महापालिका आयुक्तांसह, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर याबाबत चर्चा झाली असून त्यानुसार, रस्त्याची रूंदी 40 मीटर केल्यानंतर भूसंपादनाचा खर्च किती वाचेल, किती ठिकाणी 40 मीटर रस्त्याचे भू संपादन पूर्ण झाले असून उर्वरीत ठिकाणी भूसंपादन करावे लागेल का ? प्रकल्पाचा खर्च किती कमी होईल याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना सल्लागारांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.
——————

Property Tax | पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांना चुकीच्या पद्धतीने कर आकारणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांना चुकीच्या पद्धतीने कर आकारणी

| मा. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई | २०१७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यांना मिळकत कर हा चुकीच्या पद्धतीने लावण्याची बाब निदर्शनास आली.

“महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १२९ अ” अन्वये ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना कशा पद्धतीने कर आकारणी केली पाहिजे याबाबत अत्यंत सुस्पष्टता आहे.

ज्या आर्थिक वर्षात ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली असतील ते वर्ष सोडून पुढच्या आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे (जुन्या दराने) मिळकत कर वसूल व्हायला पाहिजे होता. परंतू पुणे महानगरपालिकेने ते आर्थिक वर्ष संपल्यावर पुढच्या आर्थिक वर्षाची वाट न पाहता बदललेल्या दराने मिळकत कराची वसूली चालू केली. बदलेल्या दराची वसूली करतांना पहिल्या वर्षी महानगपालिकेच्या दराच्या २० टक्के, दुसऱ्या वर्षी ४० टक्के असे करत करत शेवटी पुर्ण महानगरपालिकेच्या दराने वसूली करणे अभिप्रेत असते.

परंतू पुणे महानगरपालिकेने अधिनियमांच्या तरतूदीशी विसंगत प्रक्रीया करुन दुसऱ्या वर्षीच महापालिकेच्या दरात २० टक्क कर आकारणी केल्याचे दिसून आले. ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार श्री. चेतन तुपे, श्री. सुनिल टिंगरे यांनी निदर्शनास आणून दिले असे मा. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नमूद केले.

मा. नगरविकास राज्यमंत्री यांच्या दालनात पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व नगरविकास विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व मुद्यांवर सारासार विचार करुन मा. राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी पुणे महानगरपालिकेस संबंधित कराची पुनर्रचना करण्यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठकीचे इतिवृत्त देखील तयार करण्यात आले आहे.

हा निर्णय लागू झाल्यास या ११ गावातील सुमारे १ लाख ५० हजार मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे असे मत श्री. तनपुरे यांनी व्यक्त केले.

New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद!

पुणे | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लवकरच नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. यामध्ये कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील कांबळे हे पुणे भाजपचे जुने नेते आहेत. तसेच त्यांनी नगरसेवक पदी निवडून येण्याचा देखील विक्रम केला आहे. आमदार होण्या अगोदर ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कॅंटोन्मेंट मध्ये आपल्या कामामुळे नेहमी निवडून येतात. खास करून मागासवर्गीय समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. याचाच फायदा कांबळे यांना नवीन मंत्रिमंडळात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या आमदारांमध्ये मागासवर्गीय आमदार कमी आहेत. कांबळे आणि उमरखेड चे नामदेव ससाणे ही ती नावे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जर पद द्यायचे असेल आणि मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून सुनील कांबळे यांना सामाजिक न्याय मंत्री पद दिले जाऊ शकते. असा कयास व्यक्त केला जात आहे. दिलीप कांबळे यांना देखील हे पद देण्यात आले होते. त्यावेळी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे पुणे परिसरातून तशी मागणी देखील होत आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

मात्र दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरातील या दोन आमदारापैकी कुणाला मंत्री पद मिळणार आणि कुणाला पुण्याचा पालकमंत्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पुण्याकडे सर्वांचे लक्ष असते. आता आगामी काळात महापालिका निवडणूका येऊ पाहताहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

Draft Voter List | महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

प्रारूप मतदारयादी | हरकती सूचनांसाठी दोन दिवसाचा अवधी वाढवला | 3 जुलै पर्यंत दाखल करू शकता हरकती

| राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यात खूप चुका आहेत. त्यामुळे हरकती सूचना दाखल करण्यासाठी जास्तीचा वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दोन दिवसाचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. 3 जुलै पर्यंत हरकती दाखल करता येऊ शकतात. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

| असे आहेत आदेश

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार  २३ जून, २०२२ ते १ जुलै, २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून  ९ जुलै, २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची वेळ वाढवून मिळण्याबाबत मागणी होत आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या टू व्होटर अॅपच्या माध्यमातून देखील हरकती व सूचना दाखल होत
आहेत. यास्तव, सदर १४ महानगरपालिकांकरिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अखेरचा दिनांक १ जुलै, २०२२ ऐवजी ३ जुलै, २०२२ असा सुधारित करण्यात येत आहे. मात्र मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याच्या दिनांक ९ जुलै, २०२२ हाच राहील.  ३ जुलै, २०२२ रोजी रविवारची सुट्टी असली तरी हरकती व सूचना दाखल करुन घेण्याच्या अनुषंगाने योग्य ती व्यवस्था महानगरपालिकेने करावी तसेच हरकती व सूचना दाखल करण्याच्या सुधारित
दिनांकास योग्य ती प्रसिध्दी महानगरपालिका क्षेत्रात देण्यात यावी.

Water Storage | MWRRA | सरकार शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार | MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

सरकार शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी

दरम्यान महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या पाणी वापराबाबत आक्षेप घेत प्राधिकरण कडे याचिका दाखल करण्यात आली होती. यात जल शुद्धीकरण केंद्रामधून पाणी शुद्ध करून ते शेतीला सोडण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. याबाबत महापालिका उद्या आपली बाजी मांडणार आहे. यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे याच्यासाहित पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के (20.30 लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Dental treatment | तीनशे रुग्णांवर मोफत  दंत उपचार | रामकृष्ण मठ दंतउपचार विभाग व  रोटरी क्लब ऑफ पुणे चा उपक्रम

Categories
social आरोग्य पुणे

तीनशे रुग्णांवर मोफत  दंत उपचार

पुणे-  रामकृष्ण मठ दंतउपचार विभाग व  रोटरी क्लब ऑफ पुणे, (सिनर्जी) यांच्या  वतीने मोफत   दंत चिकित्सा व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये  तीनशेहुन अधिक रुग्णांवर  दंत उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे अक्कलदाढेच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या सत्तरहुन अधिक रुग्णांना शिबिराचा मोठा लाभ झाला. तसेच मुखकर्करोग तसेच तोंडाचे इतर आजार असलेल्या रुग्णांची चिकित्सा व मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.
या  शिबिरामध्ये  डॉ जनार्दन गार्डे, डॉ श्रुती गार्डे, डॉ दत्तप्रसाद दाढे, डॉ अनुजा खाडेलकर, डॉ राहुल दिघे व डॉ धृति गार्डे यांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार घेतले.
रामकृष्ण दंतउपचार विभागाच्या पूर्व प्रमुख व रोटरी क्लब (सिनर्जी) आरोग्य विभाग प्रकल्प प्रमुख डॉ.श्रुति गार्डे यांनी या शिबिरासाठी विशेष मार्गदर्शन केले. योग्य वेळी तोंडाच्या कर्करोगाचे निदान होणे व तरुण पिढीला तंबाखू /धूम्रपानासारख्या घातक व्यसनांपासून परावृत्त करणे ही काळाची गरज आहे असे मत डॉ श्रुति गार्डे यांनी व्यक्त केले.
हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी रामकृष्ण मठाचे आरोग्य विभाग प्रमुख स्वामी कृपाघनानंद, अरुणा कुडले, डॉ चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे (सिनर्जी)चे अध्यक्ष  विकेश छाजेड व डॉ अर्चना शिंगवी यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकाये केले.
‘मानव जातीची निस्वार्थी सेवा हेच रामकृष्ण मिशनचे खरे ध्येय आहे व त्यासाठी तळागाळातील रुग्णांसाठी वेळोवेळी निःशुल्क सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील’ असे प्रतिपादन स्वामी कृपाघनानंद यांनी शिबिराचा समारोप प्रसंगी केले.

Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी!

| महापालिका लवकरच निर्णय जाहीर करणार

पुणे | पावसाने ओढ दिल्याने पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पावसाची कुठलीच चिन्हे दिसेनात. त्यामुळे पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणेकरांना आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याचे नियोजन देखील महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. या आठवड्यापासूनच म्हणजे गुरुवार – शुक्रवार पासूनच एक दिवसाआड पाणी देण्याबाबत अमल करण्यात येणार आहे. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय भामा आसखेड आणि पवना धरणातून देखील पाणी घेतले जाते. शहर आणि समाविष्ट गावांना या धरणातून पाणी दिले जाते. शहराला महिन्याला 1.50 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता आहे. मात्र शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा अभाव आहे. जून महिना संपत आला तरीही पाणीसाठा वाढलेला नाही. आहे तो पाणीसाठा नाममात्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देखील अपुरा पाऊस असणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. यामुळेच महापालिका प्रशासन पाणीकपात करण्याचा निर्णय घेत आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आज बैठक होणार होती. मात्र ती होऊ शकली नाही. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणी देण्याबाबत नियोजन सुरु केले आहे. शहरात पाणीपुरवठा विभागाचे तीन झोन आहेत. यामध्ये पर्वती, एसएनडीटी आणि लष्कर  विभागाचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या परिसरात कशा प्रकारे एक दिवसाआड पाणी देण्यात येईल याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कारण काही परिसरात एक दिवसाआड पाणी देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. तिथे पाणी कमी कसे देता येईल. याचेही नियोजन सुरु आहे.
प्रशासनाच्या या नियोजनावर या आठवड्यातच अंमल करण्यात येणार आहे. लवकरच महापालिकेकडून याची घोषणा केली जाईल.

Side margin | साईड मार्जिनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या मिळकतींना बिगरनिवासी दराने तीनपटीने कर आकारणी  | महापालिका आयुक्तांचा निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

साईड मार्जिनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या मिळकतींना बिगरनिवासी दराने तीनपटीने कर आकारणी

| महापालिका आयुक्तांचा निर्णय

पुणे |. पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल इ. मिळकतीमधील साईड मार्जीनमध्ये अनेक व्यावसायिक अनाधिकृतपणे व्यवसाय चालू ठेवतात तसेच काही बिगरनिवासी मिळकतीवरील ओपन टेरेसवर देखील बिगरनिवासी व्यवसाय चालू ठेवतात. अशा अनाधिकृत वापरातून मिळकतधारक उत्पन्न मिळवत आहे. महापालिकामार्फत अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाते. कारवाई होऊनही सदर मिळकतधारकाकडून पुन्हा पुन्हा अतिक्रमणे केली जातात. यावर आळा घालण्यासाठी आता साईड मार्जिनमध्ये अतिक्रमण करणाऱ्या मिळकतींना बिगरनिवासी दराने तीनपटीने कर आकारणी करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
  वेळोवेळी काही हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल इ. मिळकतींची पाहणी केली असता बन्याच बिगरनिवासी मिळकती मधील साईड मार्जीनमध्ये अनाधिकृतपणे जागेचा वापर व अतिक्रमणे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनाधिकृतपणे जागेचा वापर करून व्यवसाय / अतिक्रमणे करणाऱ्या मिळकतीना खालील प्रमाणे शास्ती लावणे आवश्यक आहे. जेणेकरून उपरोक्त मिळकतीमधील साईड मार्जीनमध्ये अनाधिकृतपणे व्यवसाय / अतिक्रमणे करण्यास वाव मिळणार नाही.
१. पुणे शहरातील मिळकतीचे ओपन टू स्काय टेरेसचा वापर बिगरनिवासी कारणासाठी असल्यास त्याची करआकारणी त्या भागातील बिगरनिवासी दराने तीनपटीने करणेस.
२. पुणे शहरातील बिगरनिवासी मिळकतीचे हॉटेल, रेस्टॉरंट इ. चे साईड मार्जीनमध्ये व्यवसाय चालू असल्यास त्याची करआकारणी देखील त्या भागातील बिगरनिवासी दराने तीनपट करणेस
३. पुणे शहरातील मिळकतीमधील पार्कंगमध्ये बिगरनिवासी वापर चालू असल्यास त्याची करआकारणी त्या भागातील बिगरनिवासी दराने तीनपट करणेस.

असा कर व शास्ती बसवणे व ती गोळा करणे, यांचा असे अवैध बांधकाम किंवा पुनर्बाधकाम ते अस्तित्वात असे तो पर्यंतच्या कोणत्याही कालावधीसाठी ते अवैध बांधकाम किंवा पुनर्बाधकाम विनियमित झाले आहे. असा अन्वयार्थ लावला जाणार नाही. मग असा कालावधी कितीही असो. असे ही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Ajit Deshmukh | थकबाकी असलेल्या 121 मिळकती टॅक्स विभागाने केल्या सील  | उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती 

Categories
Breaking News PMC पुणे

थकबाकी असलेल्या 121 मिळकती टॅक्स विभागाने केल्या सील

| उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती

महापालिकेच्या मिळकत कर आकारणी  आणि कर संकलन विभागाने आज एका दिवसांत मिळकतकर थकलेल्या तब्बल १२१ मिळकती सील केल्या आहेत. या थकबाकीदारांकडे  ११ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

यंदाच्यावर्षी पहिल्याच दोन महिन्यांत 1 हजार कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न अधिक आहे.

यानंतर आता या विभागाने मोठ्या थकबाकीदारांकडे पुन्हा मोर्चा वळविला आहे. आज एका दिवसांत विशेष मोहीमेअंतर्गत आज एका दिवसांत मिळकतकर थकलेल्या तब्बल १२१ मिळकती सील केल्या आहेत. या थकबाकीदारांकडे  ११ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर २४ मिळकत धारकांनी तातडीने ४५ लाख रुपये थकबाकी भरली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh ) यांनी दिली.

Education | शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे

भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्रि-प्रायमरी शाळेत नुकतेच आदर्श शिक्षक, वाबळेवाडी(ता. शिरूर जि. पुणे) येथीलजागतिक कीर्तीच्याशाळेचे शिल्पकार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, शिक्षण राज्यमंत्र्यांचे स्वीय, मा.श्री. दत्तात्रेय वारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

दत्तात्रय वारे सरांचे स्वागत ,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नारायण हट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: श्री. संदीप बेंडुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी:  दिगंबर ढोकले {ज्येष्ठशिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार) हे होते.
आदरणीय दत्तात्रेय वारे सर आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले,”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेस जागतिक दर्जाची करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी स्वतः करेन! ते पुढे म्हणाले
“शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे, शाळेत येताना मुलांनी घाई केली पाहिजे व घरी जाताना ती रेंगाळली पाहिजेत , मुलांना खाजगी शिकवणी लावण्याची गरज पडायला नको, अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांवर उत्कृष्ट संस्कार व्हावेत व त्यातून शाळांच्या इमारतीत उद्याचा आदर्श नागरिक निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळांनी लक्ष द्यावे, समाजाचे ही आपल्याबद्दल उत्तरदायित्व असल्यामुळे चांगल्या शाळा गावागावात निर्माण व्हावयास हव्यात!”
आपल्या एक तासाच्या व्याख्यानामध्ये स्वतःच्या कामाचे अनुभव सांगताना व शाळेविषयी दृष्टीकोण मांडताना त्यांनी पालकांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यापूर्वी वाबळेवाडी, तालुका शिरूर येथे शाळेत केलेले उल्लेखनीय व अप्रतिम नेत्रदीपक काम व जागतिक कीर्ती पर्यंत शाळेचा पोचवलेला दर्जा, व सध्या कनेरसर ता. खेड जि. पुणे येथे कार्यरत असताना चालू असलेले काम , नाविन्यपूर्ण उपक्रमा विषयी सखोल माहिती व्याख्यानातून त्यांनी दिली.


नारायणहट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”आदरणीय दत्तात्रेय वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेची आपली शाळा एक आदर्श व नामवंत शाळा बनवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र करण्यात येईल”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष: दिगंबर ढोकले सर आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले” ” नारायण हट शिक्षण संस्थेची शाळा भोसरी परिसरात एक नामवंत शाळा म्हणून नक्की उदयास येईल असा आशावाद व्यक्त केला. व शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या!”
या कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, परिसरातील नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन:अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे,  रोहिदास गैंद,  मुकुंद राव आवटे, डॉ.वसंतराव गावडे, डॉ. बाळासाहेब माशेरे, शिवराम काळे, सौ. उज्वला थिटे, सौ. रोहिणी पवार, यांनी केले.
सूत्रसंचालन: सौ मीनल बागुल यांनी केले. आभार: सौ. सायली संत यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी: विजय चौगुले, सौ.प्रतिभा तांबे, श्री. प्रवीण भाकड, सुरेखाताई मुके, सौ.भाग्यश्री नगरकर यांनी विशेष प्रयत्न केले.