NCP Agitation | मुख्यमंत्र्यांनी गोविदांना आरक्षण देण्याची घोषणा करुन आरक्षणाच्या जनकांचा अपमान केला | राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी गोविदांना आरक्षण देण्याची घोषणा करुन आरक्षणाच्या जनकांचा अपमान केला

| राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन

पुणे – भाजपाच्या कच्छपी लागून पन्नास आमदारांना खोक्यात घालून सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आरक्षणाची सरेआम खिल्ली उडविली. या सरकारमधील मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील यात तेल ओतण्याचे काम केले आहे. असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच या सर्वांचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागाने पक्षाने पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर मंगळागौरी ,डोंबारी, लुडो ,गोट्या खेळत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, देशात बेरोजगारीचा दर अतिशय गंभीर म्हणजे ७.८ एवढा असून केंद्र सरकारच्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) संस्थेच्या अहवालात बेरोजगारीचे हे भीषण वास्तव नमूद कऱण्यात आले आहे दुसरीकडे केंद्र सरकारने एकामागून एक सरकारी कंपन्या आपल्या मित्रांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून गोरगरीब, मेहनती तसेच होतकरु विद्यार्थ्यांच्या वाट्याच्या हक्काच्या नोकऱ्या संपविण्याचा उद्योग लावला आहे. त्यातच भरीत भर म्हणून लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यास सुरवात केली आहे.  हे सर्व प्रकार स्पर्धा परिक्षांचा दर्जा कमी करण्यासाठी येत असून जनतेच्या हक्काचा रोजगार हेतुपुरस्सरपणे संपविण्याचे कारस्थान आखले जात आहे. ही सर्व परिस्थिती एकीकडे तर दुसरीकडे महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विचारवंतांच्या अथक वैचारीक मंथनातून पुढे आलेल्या सामाजिक आरक्षणाची “गोविंदांना आरक्षण देण्याची’ सवंग घोषणा करुन खिल्ली उडविण्याचे कपट कारस्थान सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून आखण्यात येत आहे, हे अतिशय संतापजनक आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. नऊवारी नेसून आलेल्या महिला मंगळागौरीची गाणी गात फर्गुसन रस्त्यावर सोमवारी सकाळी पहावयास मिळाल्या. त्याच सोबत वेगवेगळे तरुण गोट्या खेळून सरकारचा निषेध करताना दिसले.
यावेळी काही युवक आणि युवती सापशिडी, विटी दांडू असे खेळ खेळून सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसले. याच प्रसंगी काही तरुणांनी तरुणांनी अभ्यास करत पुस्तके घेऊन अभ्यास करत, अभ्यास करणाऱ्यांना सरकार कमी लेखत असल्याचे दाखवून दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत दहीहंडीतील खेळाडूंनाही आरक्षण मिळेल असे सांगून गुणवत्तेची खिल्ली उडविली.’ पन्नास खोके, एकदम ओके’ यानुसार हे सरकार सत्तेत आले असून त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा नाही.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दहीहंडी फोडणे ,डोंबऱ्याचे खेळ करणे ,मंगळागौरी खेळ करणे, सापशिडी खेळणे , विटी दांडू खेळणे असे उद्योग करावे लागतील. सरकारने या गोष्टीचा वेळीच निर्णय घेऊन त्याबाबत ठोस पावले उचलावीत. अन्यथा, आगामी काळात आम्ही आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करू.

पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले, “या देशातील सामाजिक आरक्षणाला एक मोठी वैचारीक परंपरा आहे. आरक्षणाच्या माध्यमातून हळूहळू सामाजिक समतेचे तत्त्व प्रत्यक्षात येऊ लागले आहे. ज्यांच्या विचारसरणीचा पायाच मुळी विषमतेवर आधारलेला आहे, त्यांच्याकडून आरक्षणाची खिल्ली उडविण्याची अपेक्षित आहे.हे अतिशय दुःखद आणि असंवेदनशीलतेचा कहर आहे. मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या व्यक्तीकडे किमान विचारांचे हे सामाजिक अभिसरण समजून घेण्याचा आवाका असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या बाबतीत बेजबाबदार आणि असंवेदनशील विधाने करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान देखील केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. ”
याप्रंगी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख, सुषमा सातपुते, मूणलिनी वाणी ,संदीप बालवडकर , सायली वांजळे लक्ष्मण आरडे ,किशोर कांबळे महेश हंडे , विक्रम मोरे , चारुदत्त घाडगे , असिफ शेख़ , यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPSC and BEd CET exams | एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News Education Political महाराष्ट्र

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई| एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar Vs Chandrakant Patil | पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार

| चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात गेल्याने पुण्यात भाजप आक्रमक दिसणार

 पुण्यातील एकमेव मंत्रिमंडळ सदस्य म्हणून चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांना थेट आव्हान देणार अशी चिन्हे आहेत.  आगामी काळात दोन मोठ्या महापालिका निवडणुका होणार  आहेत. यावेळी भाजप आक्रमक पाहायला मिळणार, असे चित्र दिसते आहे.
 मंगळवारी महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील  युती सरकारमध्ये भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव निवडून आलेले आमदार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले पाटील हे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.
 महाराष्ट्रात एक  प्रथा आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांची नियुक्ती केली जाते आणि त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष असावे, असे अपेक्षित असते.  सामान्यत: राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातील मंत्र्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले जाते.  राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नसेल तर बाहेरच्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते.
 2019 मध्ये, पाटील यांना सहा महिन्यांसाठी पुण्याचे पालकमंत्री करण्यात आले होते.  गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि राज्यमंत्रीपद सोडले होते. त्यामुळे पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती.  पाटील पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले तर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.
 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार पडेपर्यंत अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते.  सध्या ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते असून जिल्ह्यातील बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.  अशाप्रकारे, पवार घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे पाटील हे त्यांच्या पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यात पवारांना थेट आव्हान उभे करतील, जे पीएमसी आणि पीसीएमसी या दोन्ही निवडणुका घेण्यास सज्ज आहेत.  2017 ते 2022 पर्यंत चाललेल्या मागील टर्ममध्ये प्रथमच भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे आता भाजप आक्रमक होईल, असे मानले जात आहे.

Rekha Tingre | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात 

Categories
Breaking News PMC पुणे

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे (Rekha Tingre) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका झालेल्या टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. रेखा टिंगरे यांना राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सदस्य पदी देखील संधी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकांची आपल्याकडे मोठी यादी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुमारे दोन महिनयांपूर्वी जाहीर केले होते. सुमारे २५-३० माजी नगरसेवकांची ही यादी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्याने आता भाजपाकडे येणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या सोयीची प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप करण्यात आला.त्यामुळे भाजपात असलेले अनेकजण राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी तशी तयारी केली होती. मात्र, राज्यात पुन्हा सत्तापालट झाली. भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यामुळे भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणाऱ्या अनेकांनी आपला पक्षांतराचा बेत रद्द केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत टिंगरे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. याच काळात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. परिणामी टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनीच आज भाजपात प्रवेश केला.

 

Dr Tessie Thomas | लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

पुणे : थोर स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर विचारावरच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया रचला गेला आहे. उद्याच्या बलाढ्य देशासाठी जे संशोधन सुरू आहे. त्यासही लोकमान्यांच्या विचारांचीच
प्रेरणा आहे. असे प्रतिपादन मिसाइल वुमन’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका डॉ. टेसी थॉमस यांनी सोमवारी केले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक- मोेेने आदी उपस्थित होेते.

डॉ. थॉमस म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून क्षेपणास्त्रात भारताला आत्मनिर्भर करण्याची आम्हाला
प्रेरणा मिळेल. या आनंददायी क्षणी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार असून तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या घोषणेची आठवण होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये लोकमान्यांचा स्वदेशीचा विचार क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये संशोधनासाठी महत्वाचा आहे. देश जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र तयार करत आहे. त्यात स्वदेशीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे थॉमस यांनी सांगितले.

भारतीय संशोधन आणि विकास संस्थेमध्ये  (डीआरडीओ) मी 1980 मध्ये वैज्ञानिक म्हणून दाखल झाले. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मला प्रथम अग्नी प्रकल्पामध्ये संशोधनाची संधी दिली. यावेळी लांब
पल्ल्याच्या स्वदेशी क्षेपत्रणास्त्राचे तंत्रज्ञान फारसे विकसीत झाले नव्हते. देशामध्ये यासंदर्भातील पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाविषयी फारसे संशोधन झाले नव्हते. देशात या संदर्भातील
एकही संस्था अथवा कंपनी पायाभुत सुविधा तयार करत नव्हते. मात्र कलाम हे डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी पुढील 30 वर्षांचे स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राचे स्वप्न पाहिले. त्यामुळेच आपण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या
क्षेपणास्त्राचे संशोधन करु शकलो. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे योगदान देत आहे. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हजार 500 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर 4
हजार, 5 हजार ते 8 हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ मिळत आहे. डीआरडीओमध्ये सध्या स्वदेशी बनावटीचे लढावू विमान,
एचसीएलसाठी विमाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्काराला लवकरच अत्याधुनिक मानवविरहित युध्द वाहने पुरवण्यात येणार आहेत. डीआरडीओत काम करत असताना मला सहकार्य करणारा
संघ व आईवडीलांचे यानिमित्ताने डॉ. थॉमस यांनी आभार मानले.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र काम करीत आहेत. देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांचा सत्कार म्हणजे
देशाचा सन्मान आज करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. संरक्षण क्षेत्रात डॉ. थॉमस यांनी प्रगतिपथावर नेले आहे. सध्या देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू असले तरी शास्त्रज्ञ संरक्षणाच्या कामासाठी रात्रंदिवस काम करीत, नवनवीन शोध लावून देश बळकट करीत असल्याचे यावेळी शास्त्रज्ञांच्या कामाचे कौतुक यावेळी त्यांनी केले. संरक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञ पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारे येतात, जातात; पण शास्त्रज्ञांचे यज्ञ कधीच थांबत नाहीत. त्यांचे संशोधन सुरुच असते. कोणत्याही सत्तेत असणार्‍या सरकारने शास्त्रज्ञांच्या कामाचे श्रेय घेऊ नये, असेही यावेळी नमूद केले. संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञांचे काम अमूल्य असून त्यांनी देशाला मोठी उंची गाठून दिली आहे. ज्या ठिकाणी टाचणी तयार होत नव्हती त्या ठिकाणी आपल्या शास्त्रज्ञांनी अग्नी क्षेपणास्त्राचा शोध लावला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची उंची वाढवणारे काम टिळक स्मारक ट्रस्टने केले असून शास्त्रज्ञांच्या कामाची पूजा बांधली असल्याचे यावेळी शिंदे यांनी कौतुक केले.

लोकमान्यांच्या चतू:सूत्रीमुळे देशात परिवर्तन : चंद्रकांत पाटील

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार आणि स्वराज्य चतूःसूत्री मांडून देशात परिवर्तन घडवून आणले. सर्वसामान्य माणसाला त्यांनी जोडले. शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे राष्ट्रीय शिक्षण हे सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण म्हणून घेण्यात आले आहे. लोकमान्यांनी त्यांच्या चतुःसूत्रीतून देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सध्या स्वदेशी हा त्यांचा मूलमंत्र सध्या आत्मनिर्भर भारत म्हणून आपण काम करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सध्या भारतीय बनावटीचे साहित्य, संशोधनाचे साहित्य देशातच होत असून हे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनेच काम होत आहे. आत्मनिर्भर भारत हेच त्यांचे प्रतीक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. देशाला प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी दिशा देणारे विचार लोकमान्यांनी चिंतन, मनन करुन मांडले आहेत. आजही ते विचार देशाला पुढे नेणारे
असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकमान्यांच्या विचारात आधुनिक भारताचा पाया

पुणे : लोकमान्यांची कोणतीच मांडणी भावनिक नव्हती. त्यांच्या मांडणीमागे प्रचंड अभ्यास आणि विचारांचे अधिष्ठान होते. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राचा शास्त्रीय अभ्यास करून लोकमान्यांनी आधुनिक भारताचा आराखडा मांडला. लोकमान्यांनी तेव्हा मांडलेले विचार आजही उपयुक्त ठरत आहेत. म्हणून लोकमान्यांच्या विचारातच आधुनिक भारताचा पाया घातला गेला. लोकमान्य वंदनीयपेक्षा आचरणीय अधिक आहेत. त्यांचे आयुष्य त्यागाने भरलेले आहे. त्यांचे वास्तववादी विचार आजही उपयुक्त ठरतात. स्वराज्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले असल्याचे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले.

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

Sharad Pawar Vs Chandrakant Patil | दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला

चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. भाजपच्या बैठकीत पाटील  म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे  यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले आहे. हा दिल्लीमधून आदेश आला. त्याबद्दल बोलताना पवारांनी भाजपला चिमटे काढले. आज पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी पवारांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या तत्कालिन सुरक्षेविषयावरही भाष्य केले.

पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, गृहसचिव या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसंच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याकारणाने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, अंसही पवार म्हणाले.

राज्यात नवे राज्य सरकार आले आहे. त्यामधे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्रे फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर येऊन चार आठवडे झाले आहेत परंतु अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर बोलताना पवार म्हणाले, राज्यातील सत्ता या दोघांनी चालवायचं ठरवलेलं दिसतेय. त्यांना राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि केंद्रातल्या नेतृत्वांची दोघांचीही सहमती आहे. ते सत्ताधारी आहेत त्यामुळे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावा लागेल.

OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याच्या आनंदात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने गठीत केलेल्या बांठिया समितीचा अहवाल मा.सर्वोच्च न्यायालयाने स्विकारला. यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केले त्यामुळेच हे आरक्षण मिळाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी दिली. याबद्दल त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार यांचे मनापासून आभार मानले.

शरद पवार साहेबांनी त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा मनापासून आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरुवातीपासून आम्ही केलं व व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची यापुढे देखील हीच भूमिका राहील” , असे देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला | अरविंद शिंदे

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, सर्वोच्च्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओ. बी. सी. समाजाचे आरक्षण मान्य केले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. या आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच पाठपुरावा केला असून महाविकास आघाडीतर्फे एकत्रित सर्वोच्च न्यायालयातील लढाई लढली गेली. मा. बांठिया कमिशन महाविकास आघाडी सरकारने या आरक्षणासाठी नेमले होते. या आयोगाकडून सादर करण्यात आलेला वस्तूनिष्ठ अहवाल मा. सर्वोच्च्य न्यायालयाने मान्य केला यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ओ. बी. सी. आरक्षणासहित होणार आहेत.

     महाराष्ट्रातील तमाम ओ. बी. सी. बांधवांना राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला आनंद झाला आहे.

महाविकास आघाडीने ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची स्पष्टोक्ती

सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही महाविकास आघाडी सरकारने तिहेरी चाचणी पूर्ण करण्यासाठी काम केले नाही म्हणून राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. अडीच वर्षे वेळ वाया घालविणाऱ्या महाविकास आघाडीने आता ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय घेऊ नये, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नव्हते त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही समर्पित आयोग नेमणे व एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत. एंपिरिकल डेटाचे काम करण्याच्या ऐवजी सातत्याने केंद्र सरकारकडे २०११ च्या जनगणनेची माहिती मागून केंद्राकडे बोट दाखवत वेळ वाया घालविला. बांठिया आयोग नेमल्याबद्दल आघाडीचे नेते सांगत असले तरी हे काम मार्च २०२२ मध्ये करण्याच्या ऐवजी आधी का केले नाही आणि एंपिरिकल डेटा आधी का गोळा केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित झाले नाही आणि परिणामी मध्यंतरी सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका, भंडारा – गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुका, १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका आणि हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आता ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल दावा करणाऱ्या महाविकास आघाडीने याबद्दल उत्तर द्यायला हवे.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यावर तातडीने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत आढावा घेतला, बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला, सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने पाठपुरावा केला त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळाले आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केल्यामुळे न्यायप्रक्रियेत सक्रीय सहाय्य करता आले. ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत भाजपा ओबीसींना निवडणुकीत २७ टक्के तिकिटे देईल, अशीही भूमिका जाहीर केली होती व इतरांना त्याचे अनुकरण करावे लागले.

ते म्हणाले की, शिंदे – फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sunny Nimhan | सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा

Categories
Political पुणे

सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने प्रभाग क्र. १२ औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील ६ वी ते १० वी तील गरजू ३००० विद्यार्थ्यांना मोफत बॅग व शालेय साहित्य वाटप तसेच ६००० घरेलू महिला कामगारांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बॅग आणि शालेय साहित्य व छत्री वाटपाचे अनावरण करण्यात आले. या साठी विशेष सेवा सप्ताह अंतर्गत नाव नोंदणी केली जात आहे.

बॅग, छत्री आणि शालेय साहित्याचे अनावरण करताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सनी निम्हण यांनी अतीशय चांगला उपक्रम राबवित मला वाढदिवसाच्या सेवारुपी उपक्रम राबवून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे मला समाधान असून येणाऱ्या पुढील काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत असेच सेवारुपी कार्यक्रम राबवावे.

या विशेष सेवा सप्ताहची माहिती देताना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले की, साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण म्हणजे आमदार चंद्रकांत पाटील, यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशी मी मनोमन प्रार्थना आहे. त्यांच्या प्रत्येक कामात, निर्णयात सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असतो म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 12 औंध, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांना बॅग आणि शालेय साहित्य व घरेलू कामगार महिलांसाठी पावसाळी छत्री वाटप करण्यात येणार आहे. यासाठी विशेष सेवा सप्ताह आयोजन केले असून 10 ते 17 जून या कालावधीत आपले नाव नोंदवावे. जेणेकरून आम्हाला या वस्तू आपल्या घरापर्यंत पोहोचवायला मदत होईल.

नोंदणी स्थळ:
शारदाताई पुलावळे (सरचिटणीस शिवाजीनगर, भाजपा महिला आघाडी),
शारदा एंटरप्रायजेस,
कस्तुरबा वसाहत, औध.

शॉप नं. 1
प्रथमेश अपार्टमेंट,
भैरवनाथ मंदिरासमोर, औंध गांव.

वनमालाताई कांबळे
वाल्मिकी मंदिरा शेजारी,
इंदिरा वसाहत, औध,

नोंदणी कालावधी
10 जून ते 17 जून 2022

Now Target PMC | आता पुणे महापालिका | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा नारा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आता पुणे महापालिका | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा नारा

| कोथरूडमध्ये भाजपाचा विजयी जल्लोष

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!’ चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

भाजपा कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  पाटील यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्रबापू मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले.

ते पुढे म्हणाले की, “विजयानंतर काल माध्यमांशी बोलताना ‘ये तो बस्स झॉंकी हैं २० तारीख बाकी हैं,’ म्हटलं होतं. पण आज ‘ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌.

दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात आ. पाटील यांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला; आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच यानंतर आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांकडून दादांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.