Pune Rain Update | उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज | हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला

Categories
Breaking News social पुणे

Pune Rain Update | उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

| हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला

 Pune Rain Update | पुण्यातील पावसाची (Pune Rain)!प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. आज म्हणजेच शनिवारी पुण्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. शहर आणि आसपासच्या परिसरात तसेच धरण पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडला. दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागाने  (IMD), 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची (Heavy Rainfall in Pune) शक्यता वर्तवली आहे. (Pune Rain Update)
 IMD च्या हवामान अंदाजानुसार, या दोन दिवसांत पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Pune Rain)
 साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो.  मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे.  मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होई. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे. आजच्या पावसाने देखील पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. (Pune Rain News)
——
News Title | Pune Rain Update |  Heavy rain forecast in Pune tomorrow and the day after |  Forecasted by Pune Meteorological Department

Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! | कोथरुडकरांचा निर्धार

| भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरले होते. या गौरव यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व भारतीयांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, आशा भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी महापौर आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.


पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे ब्रिटिशांना भारतातून जावं लागलं. कॉंग्रेसचे नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहे. त्यामुळे विरोधकांचं महापुरुषांप्रतीचं प्रेम बेगडी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान देशातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Drainage Department | संतोष तांदळे यांच्याकडील मलनिःस्सारण विभागाचा पदभार काढून घेतला

Categories
Breaking News PMC social पुणे

संतोष तांदळे यांच्याकडील मलनिःस्सारण विभागाचा पदभार काढून घेतला

पुणे | महापालिका प्रशासनाकडून संतोष तांदळे यांच्याकडे मलनिःस्सारण देखभाल व दुरुस्ती विभागाच्या अधीक्षक अभियंता विभागाचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर महापालिका प्रशासन नाराज आहे. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार आता कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसात शहरात जोराचा अवकाळी पाऊस झाला. यात प्रशासनाच्या चुकीमुळे पुणेकरांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. कारण ड्रेनेज आणि रस्ते दुरुस्ती साठी करोडो रुपये खर्चून देखील रस्त्यावर पाणीच पाणी साठले होते. याचे मुख्य कारण होते ड्रेनेज व्यवस्थित साफसफाई न होणे. साफसफाई नसल्याने पाणी जायला जागा उरली नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावरच थांबून राहिले. यामुळे शहर वासियांना याचा फटका बसला. शहरातील बहुतेक रस्त्यावर हीच अवस्था होती. याबाबत पथ विभागाला विचारणा केली असता पथ विभागाने ड्रेनेज विभागाकडे बोट दाखवले. तर ड्रेनेज विभाग म्हणतो कि साफसफाई चे अजून टेंडर प्रक्रियाच झाली नाही. ड्रेनेज विभागाचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत आहे.
संतोष तांदळे यांच्याकडे ड्रेनेज ची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय या अगोदर देखील तांदळे यांच्या कार्यपद्धतीवर बऱ्याच जणांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

Traffic in pune | PMC Pune | वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी |अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

Categories
Breaking News PMC social पुणे

वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी

|अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पुणेकर नागरिक अडकून पडत आहेतच. यामुळे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे.  अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

 

Pune Rain | Sanjay Balgude | पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा

| कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे | पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे. तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

बालगुडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांची घरे काही प्रमाणात वाहून गेले आहेत. तर अनेकांच्या झोपड्यांमध्ये व सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. हजारो नागरिकांची वाहनांची व घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच पुण्याच्या रस्त्यांना नदी नाल्यांचे स्वरूप आले होते. यापूर्वीसुद्धा पुण्यात मुसळधार वृष्टी व्हायची परंतु काही तुरळक घटना सोडल्या तर शहराला खूप त्रास होत नव्हता. परंतु मागील तीन वर्षात हा प्रकार वाढत गेला आहे. विशेषता या वर्षात पावसाळी पाण्याचे नियोजन न केल्याने व ठेकेदारांनी रस्त्याची,नाल्यांची,गटारांची कामे योग्य पद्धतीने न केल्याने हा प्रकार वाढला आहे. पावसाच्या पाण्याला वाहून जायला वाटणं निघाल्याने पाणी रस्त्यावर झोपड्यांमध्ये सोसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पेठाण मधील तळ घरात राहत असलेल्या घरांमध्ये शिरत आहे. संपूर्ण पुणे शहरात हजारो नागरिक बाधित झाले आहेत, व पुणेकरांचे किमान कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बालगुडे म्हणाले, आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीने व वैयक्तिक पुणेकर नागरिक म्हणून आपल्याला फेब्रुवारी महिन्यात निवेदन देऊन याची संपूर्ण कल्पना दिली होती. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे.तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची जबाबदारी निश्चित करावी ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांबरोबर संगनमत केले आहे. अशा त्वरित कारवाई करावी व ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.असे ही बालगुडे म्हणाले.

Ganesh Bidkar | पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही | गणेश बिडकर

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही | गणेश बिडकर

पुणे |पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, विरोधकांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले.

बिडकर म्हणाले, पुणे शहरात गेल्या काही वर्षात काही तासात अभूतपूर्व पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, ही वस्तुस्थिती हवामान विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर दिसून येते. हवामान बदल हा पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठीच मोठे आव्हान बनलेले आहे. होणारा पाउस हा या हवामानबदलाचाच फटका आहे आणि त्याच्याशी एकजुटीने संघर्ष करण्याची जशी आवश्यकता आहे, तसेच त्याच्यावर दीर्घकालिन उपाययोजना काय करता येतील यासाठी गंभीरपणे विचारविनिमय आणि कृतीकार्यक्रम आखला गेला पाहिजे. यासाठी जगभर तज्ज्ञ विचार करताहेत आणि त्या आघाडीवर जे जे निष्कर्ष काढले जाताहेत आणि काढले जातील, याचा विचार आपणही कृतीत आणायला हवा, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे, हे सर्वप्रथम समजावून घेतले पाहिजे. १७ ऑक्टोबरला पडलेल्या पावसाची सरासरी ८६.८५ होती. तर शिवाजीनगर आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनुक्रमे १०५ व १२४.१९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

बिडकर पुढे म्हणाले, पुण्यातील रस्त्यांची लांबी १४०० किलोमीटर आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे ६७२ किलोमीटरचे रस्ते ९ मीटर किंवा त्यापेक्षा कमी रूंदीचे आहेत. ९ ते १२ मीटर रूंदीचे २९८ किलोमीटर रस्ते आहेत. १२ ते २४ मीटर रूंदीचे ३१५ किलोमीटर रस्ते आहेत. पुण्यातील स्टार्म वॉटर वाहिन्यांची वहन क्षमता ५५ मिलीमीटर इतकी आहे. या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी तपशिल सादर केलेले आहेत. पुणे शहराच्या जुन्या हद्दीत एकूण २१४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची एकूण लांबी ३६२ किलोमीटर आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांत १६४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची लांबी १६५ किलोमीटर इतकी आहे. पुणे शहरात १२ मीटर व त्यापुढील रूंदीच्या रस्त्यांवर अंदाजे २२८ किलोमीटर लांबीची पावसाळी लाईन असून त्यावर ३० हजार ३९१ चेंबर्स आहेत. पाणी शिरण्याच्या ४२ घटना घडल्यात. या आपत्तीनंतर विविध विभागांच्या कामांवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून समन्वय ठेवण्यात येत होता. पावसामुळे समस्या उद्‌भवणारा २४५ ठिकाणांची यादी पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली होती आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कृतीही सुरू होती.

बिडकर यांनी सांगितले कि, १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसानंतर महापालिकेचे अधिकारी आणि अन्य कर्मचारी असे १२५ जण परिस्थितीवर देखरेख करीत होते. महापालिका आयुक्त स्वतः लक्ष ठेवून होते. पूरस्थिती उद्‌भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास त्या दृष्टीने ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती, तसेच २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. १७ आक्टोबरच्या स्थितीनंतर तातडीने पडझड आणि नुकसान झालेल्याचे पंचनामे करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आलेला आहे.

बिडकर म्हणाले, पुण्यातील मतदारांनी भारतीय जनता पक्षावर खूप मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे. पुणेकरांना होणारा त्रासाबद्दल आम्हाला वेदनाच होतात. या शहराला सुस्थितीत आणण्यासाठीच आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठीच राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे सातत्याने प्रयत्नशील आहोत. राजकीय सामना करण्याची ही वेळ नाही, परंतु चार वर्षांपूर्वी पुण्यात असाच अभूतपूर्व पाऊस झाल्यानंतर आंबिल ओढ्याला संरक्षक भिंत घालण्याचे तसेच नव्याने कल्व्हर्टचे काम आमच्याच पक्षाने केलेले आहे. पुण्याचा ३० वर्षे रखडलेला विकास आराखडा आम्ही संमत केला. तो आराखडा तीस वर्षांपूर्वीच प्रामाणिकपणे अंमलात आणला असता तर पुण्याची वाहतूक आणि अनेक विषय त्याचवेळी मार्गी लागले असते. पुण्यातील समाविष्ट गावातील सर्व हितसंबंध पूर्ण झाल्यानंतर बकाल करून ती पुण्याच्या हद्दीत आलीत. या उपनगरांतील व्यवस्थांची दाणादाण झाल्यानंतर ती महापालिकेत आली. त्यासाठी कोणतेही बजेट दिलेले नाही. याचेही उत्तर शोधले तर पुण्यातील अनेक समस्यांचे मूळ समजेल. पुण्याची मेट्रो यांनी १५ वर्षे अडकावून ठेवली आणि आज पुण्यातील वाहतूक कोंडींबद्दल खोटे अश्रू हे ढाळता आहेत. पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, त्यांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे ही बिडकर म्हणाले.

Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

पाऊसाने च उघडकीस आणला भाजपचा नालेसफाई घोटाळा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

गेल्या काही दिवसात पुणे शहरात झालेल्या प्रत्येक पावसात पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले होते, कित्येक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर दुचाकी देखील वाहून गेल्यात. प्रशासनाच्या गैरवस्थापनाचा व नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला. एक कारभारी कोल्हापूरचा तर दुसरा नागपूरचा अशी पुण्याची गत झाली असून या दोघांच्या कार्यक्षमतेवर नागरिक बोट उचलतील या अगोदर त्यांनी पुणे शहरातील गत पाच वर्षातील नालेसफाई च्या कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे , असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

जगताप  म्हणाले, या अगोदर पुण्यनगरीने अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे.

खरे तर पुणे शहरातून उद्भवलेली ही परिस्थिती गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर बिले लाटल्याने निर्माण झाली आहे.इतिहासात कधीही पुण्यात पाणी जमा झाले नव्हते परंतु या पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलाव ओव्हर फ्लो होऊन आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. पुणे शहरातील कुठलाही नाला आज साफ झालेला नाही त्यामुळे चोक-अप होणारे हे सर्व पाणी पुण्याचा रस्त्यांवर आले आहे. पुणेकर व्यावसायिकांचा दुकानांमध्ये, पुणे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये न झालेल्या नालेसफाईमुळे झालेल्या या सर्व परिस्थितीबद्दल जबाबदारी स्वीकारून जबाबदारपणे चूक मान्य करण्याऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीवर बोट दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकांमध्ये नागरिक अरसा नक्की दाखवतील, परंतु कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी रस्सीखेच करता तशी जर चूक झाल्यानंतर चूक कबूल केली असती तर कदाचित पुणेकरांनी तुम्हाला माफ केले असते. परंतु यावेळी देखील पुणे भाजपमधील राजकारण्यांनी ती परिपक्वता दाखवली नाही.

आज पुणे शहर पाण्याखाली असण्याला गत पाच वर्षातील पुणे महानगरपालिकेची न झालेली नालेसफाई जबाबदार आहे व तसेच या न झालेल्या नालेसफाईच्या पोटी एक हजार कोटींची बिले लाटनारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व त्यांनी पाळलेले ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत , असा माझा थेट आरोप आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

Pune Rain | BJP Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची पुणेकरांना शिक्षा | भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची पुणेकरांना शिक्षा

| भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

मुळा-मुठा नद्यांना 58 वेगवेगळ्या भागांत मिळणार्‍या ओढे-नाल्यांपैकी 32 ठिकाणच्या ओढे-नाल्यांचे प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात बुजविण्यात आले. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या गैरकारभाराची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागत असून, शहरात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांतील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते, वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. घरांमध्ये आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत चर्चा करण्यासाठी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर मुळीक पत्रकारांशी बोलत होते. सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, योगेश मुळीक, धनंजय जाधव, रवी साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, “14 मार्च 2022 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती केली. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रशासकावर दबाव आणून पावसाळापूर्व कामे रोखून धरली. ही कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने वारंवार आयुक्तांच्या भेटी घेतल्या आणि सूचना केल्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या राजकारणामुळे पुणेकरांना पूरसदृश्य परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.”

मुळीक म्हणाले, “मेट्रो, स्मार्ट सिटी, समान पाणीपुरवठा अशी विविध विकासकामे शहरात सुरू आहेत. या कामांमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे का? त्याची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करावी. आपत्कालीन कक्षामधील कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, या कक्षासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले.”

Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

Categories
Breaking News social पुणे

शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे – शहरात  दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या विविध ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून  दिनांक ०१|१०|२०२२ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत १०० झाडे पडल्याची तसेच अनेक ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे.

धुवादार बरसणारा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे कुठे रस्त्यावर तर कुठे वाहनावर व एखाद्या ठिकाणी घरावर झाड पडल्याचे दुरध्वनी अग्निशमन दलाकडे आले होते. नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे अधिकारी व जवान यांनी योग्य नियोजन करत अग्निशमन मुख्यालय व इतर अग्निशमन केंद्र अशा एकूण २० केंद्रातील अग्निशमन वाहने व रेस्क्यु व्हॅन वेळेत रवाना केल्या. तसेच दलाचे सर्व अधिकारी व जवान यांनी प्रत्येक ठिकाणी तत्परतेने काम करत चेन सॉ, रश्शी, ट्रि पुनर अशी वेगवेगळी अग्निशमन उपकरण वापरून झाडे हटवण्याचे कार्य पार पाडले असून अजून ही बरयाच ठिकाणी जवान काम करीत होते.

Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

Categories
Breaking News PMC social पुणे

बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस सुरू असल्याने आज दुपारी 1 वाजता खडकवासला धरणातून 30 हजार 677 क्‍यूसेक पाणी विसर्ग मुठा नदीत सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधानी बाळगावी.

त्यामुळे, नदीकाठच्या भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्‍यता असून नागरिकांनी आपले वाहने तसेच इतर साहित्य काढून घ्यावे असे आवाहन महापालिका तसेच पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग असून पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविला जाण्याची शक्‍यता या दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नदीकाठच्या भागात सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.