Video | Anti-Inflation Movement | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर प्रस्तावित केलेली जी.एस.टी दरवाढ, गॅसच्या दरात झालेली वाढ,राज्य सरकारने वीज दरात केलेली वाढ या सर्व महागाईच्या आघातांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे “महागाई विरोधी आंदोलन” करण्यात आले.

यांत प्रतिनिधिक स्वरूपात मोदींच्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांचा वेश परिधान करून उपस्थीत होते. यावेळी बोलताना गरीबी,महागाई व बेरोजगारी यांनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षात मोदीजींनी आम्हाला एकही दिवस सुट्टी दिली नाही.आमचा उपयोग करत मोदीजी देशातील जनतेला लुटत असून आम्हाला जनतेची किव येते परंतु मोदीजींना येत नाही.कृपया जनतेनेच मोदींना धडा शिकवत आमची या त्रासातून मुक्तता करावी”.

या आंदोलन प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागवायच्या कश्या….? असा प्रश्न या देशातील प्रत्येक नागरिकास पडत आहे. याचं कारण आहे, जी.एस.टी परिषदेत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील मूलभूत वस्तू तेल, तूप, पनीर या जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी वाढवण्याची तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होत आहे की , अगदी मूलभूत जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी लागल्यानंतर या गोष्टी महाग होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत देखील तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस जवळपास तिपटी ने वाढला असून स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्ट महाग करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जणू विडाच उचलला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजेच ED सरकार देखील केंद्राच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा महागाईचा कित्ता गिरवत आहे. राज्यातील सरकारने सत्तेवर येतात पहिल्याच आठवड्यात वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.

केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून होत असणारी ही जनतेची लूट थांबावी जनतेला आपले जीवन सुसह्य व्हावे, याकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात येत आहे.

जोरदार पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन उपस्थित होते. विशेषतः महिला भगीणींची मोठी संख्या आंदोलनात पाहायला मिळाली. तसेच जीवनावश्यक वस्तू, घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्व महिला भगिनींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख ,सुरेश गुजर ,अजिंक्य पालकर ,समिर शेख , हेमंत बघे , सागर राजे भोसले , अमोल ननावरे , नरेश पगड्डालू , शशिकला कुंभार ,प्रतिभा गायकवाड, वर्षा ढावरे ,पुजा झोळे ,मिना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

BRTS | Traffic Warden Shelter | बीआरटी मार्गामधील पंक्चर / चौकमध्ये ट्रॅफिक वॉर्डन शेल्टर बसवा  | पीएमपी प्रशासनाची महापालिकेकडे मागणी 

Categories
Breaking News PMC पुणे

बीआरटी मार्गामधील पंक्चर / चौकमध्ये ट्रॅफिक वॉर्डन शेल्टर बसवा

| पीएमपी प्रशासनाची महापालिकेकडे मागणी

पुणे | बीआरटी मार्गातील चौक आणि पंक्चरच्या ठिकाणी ट्रैफिक वॉर्डन सेवकांचे ऊन तसेच पावसापासून संरक्षण करण्याकरीता पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील बीआरटी मार्गाच्या धर्तीवर ट्रैफिक वॉर्डन शेल्टर बसविणे आवश्यक आहे. अशी मागणी पीएमपी च्या बीआरटी व्यवस्थापकांनी महापालिका पथ विभागाकडे केली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमधील संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट या बीआरटी मार्गामधून परिवहन महामंडळामार्फत बसेसचे संचलन करण्यात येते. या  बीआरटी मार्गामध्ये वाहतुकीचे नियमन करण्याकरिता तसेच बीआरटी मार्गामधील खाजगी वाहनांची घुसखोरी रोखण्याकरिता बीआरटी मार्गामधील चौक तसेच पंक्चरमध्ये परिवहन महामंडळामार्फत ट्रैफिक वार्डन / सुरक्षारक्षक सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बीआरटी मार्गातील चौक आणि पंक्चरच्या ठिकाणी ट्रैफिक वॉर्डन सेवकांचे ऊन / पावसापासून संरक्षण करण्याकरीता पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील बीआरटी मार्गाच्या धर्तीवर ट्रैफिक वॉर्डन शेल्टर बसविणे आवश्यक आहे. वरील नमूद बीआरटी मार्गामधील चौक आणि पंक्चरमध्ये आपल्या विभागामार्फत ट्रॅफिक वॉर्डन शेल्टर बसवून मिळावेत. अशी मागणी  बीआरटी व्यवस्थापक, पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी महापालिका पथ विभागाकडे केली आहे.

ChatBot | महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार

पुणे महानगरपालिकेतील  नागरिकांच्या शंकांचे निराकरण, तक्रारी, नजीकच्या आरोग्य सेवांविषयी माहिती, विविध विभागाकडील नागरीकाभिमुख माहिती, जलदरित्या व सहजपणे नागरिकांना देणेकरीता ChatBot ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

http://efaq.punecorporation.org/ या प्रणालीद्वारे यापूर्वी विविध विभागाशी संबंधित माहिती/ प्रश्न उत्तरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर प्रश्नावली चा वापर ChatBot मध्ये करण्यात येणार असून  नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

http://efaq.punecorporation.org/ या प्रणालीवर प्रत्येक  विभागाशी संबंधित प्रसिद्ध करणेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे तपासून काही बदल असल्यास इंग्रजी व मराठीत अद्यावत उत्तरे अथवा नसल्यास त्याबाबतहि माहिती व तंत्रज्ञान विभागास कळविणेबाबत २७/०६/२०२२ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापि अद्यापही बऱ्याच विभागाशी संबंधित माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे त्वरित माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्तांनी दिले आहेत.

Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही

| महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा मधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि  बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमित पणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६  जुलै नंतर पाणी  वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येऊन तो अलाहिदा कळवण्यात येईल, असे अनिरुद्ध पावसकर  मुख्य अभियंता  (पाणीपुरवठा), यांनी कळवले आहे.

| धरणात 7.74 TMC पाणी जमा

दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील 4 धरणामध्ये 7.74 tmc पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवसात 8.66 tmc पाणी होते. धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणामध्ये दररोज 1 टीएमसी पाण्याची वाढ होत आहे. या पावसामुळे पुणेकरांनी मोकळा श्वास घेतला आहे.

MP Vandana Chavan | नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

| खासदार वंदना चव्हाण यांची माहिती

 जलसंपदा विभागाने पुणे मनपाच्या  नदीकाठ सुधार प्रकल्पावर अनेक वेळा आक्षेप घेतले आहेत. “ह्या प्रकल्पाचे काम; सर्व शंका निरसन शास्त्रीय पद्धतीने झाल्या शिवाय सुरू करू नका.” असेही स्पष्ट निर्देशही दिले आहेत. परंतु पुणे मनपाने जलसंपदा विभागाच्या सर्व आदेशांना पूर्णपणे झुगारून ह्या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे आणि नदीपात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकायला सुरुवात केली आहे.

मनपाच्या ह्या बेगुमान कृत्यामुळे पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यात मोठी पूर परिस्थिती उद्भवू शकते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत खा. वंदना चव्हाण यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. सदर नदी काठ सुधार प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन या.  असा मुख्य अभियंता यांनी आता पुणे मनपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

“नदी प्रवाहाला अडथळा येता कामा नये. नदीची वहन क्षमता कमी होऊ नये. नदीच्या काटछेदात कोणताही बदल होता कामा नये.” तसेच, “नदी प्रवाहाला अडथळा आणणाऱ्या बांधकामा विरुद्ध मुख्य अभियंता कारवाई करू शकतील.” एवढेच नव्हे तर, “या कामा मुळे पूर आल्यास; त्याला पूर्णपणे पुणे मनपाच जबाबदार असेल.” असा स्पष्ट इशारा जलसंपदा विभागाने पुणे मनपाला दिला आहे. अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे.

Tender | PMC Commissioner | निविदा मंजुरीबाबत महापालिका आयुक्त खात्यांना लावणार शिस्त 

Categories
Breaking News PMC पुणे

निविदा मंजुरीबाबत महापालिका आयुक्त खात्यांना लावणार शिस्त

पुणे |  पुणे महापालिकेच्या विविध खात्यामार्फत विकास कामांच्या निविदा काढण्यात काढण्यात येतात. मात्र खात्याकडून काढण्यात आलेल्या निविदापैकी काही निविदा विहित मुदतीत सादर न केल्याने मंजूर होत नाहीत अथवा मंजूर होऊनही त्याचे कार्यादेश दिले जात नाहीत. अशा निविदा खात्याकडे प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. याबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी दर्शवली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत निविदा स्वीकृतीच्या अंतिम दिनांकानंतर सहा महिन्याचे कालावधीनंतर निविदा मान्यतेसाठी सादर करण्यात येवू नयेत. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महापालिकेच्या विविध खात्यामार्फत विकास कामांच्या निविदा काढण्यात काढण्यात येतात. मात्र खात्याकडून काढण्यात आलेल्या निविदापैकी काही निविदा विहित मुदतीत सादर न केल्याने मंजूर होत नाहीत अथवा मंजूर होऊनही त्याचे कार्यादेश दिले जात नाहीत. अशा निविदा खात्याकडे प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. तसेच अशा निविदांसाठी खात्याकडून पुढील आर्थिक वर्षातील तरतूद उपलब्ध करून मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. सदर बाब कार्यालयीन शिस्तीस अनुसरून नाही. यापुढे निविदांबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश देण्यात येत आहेत.
खात्यामार्फत काढण्यात आलेल्या सर्व निविदांबाबत निविदा स्वीकृतीच्या अंतिम दिनांकानंतर सहा महिने कालावधीत कार्यादेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. निविदा स्वीकृतीच्या अंतिम दिनांकानंतर सहा महिने कालावधीत कार्यादेश न दिलेल्या सर्व निविदा व्यपगत झाल्याचे समजण्यात येईल. तरी यापुढे कोणत्याही परिस्थितीत निविदा स्वीकृतीच्या अंतिम दिनांकानंतर सहा महिन्याचे कालावधीनंतर निविदा मान्यतेसाठी सादर करण्यात येवू नयेत. फक्त न्यायप्रविष्ट निविदा याला अपवाद राहतील. अशाप्रकारे खात्याकडून प्रस्ताव सादर झाल्यास तसेच भविष्यात असे आढळून आल्यास यावावत सबंधित खातेप्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. उपरोक्त आदेशाचे काटेकोर पालन करण्यात यावे. सदर आदेश यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदांनाही लागु राहतील. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Insurance broker | Re-tender | इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

इन्शुरन्स ब्रोकर नेमण्याची निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढली जाणार

| पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

महापालिका कर्मचारी आणि कर्मचारी संघटना अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालू राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने देखील केली आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तशी खात्री देखील देण्यात आली होती. कारण कर्मचाऱ्यांना ही योजना आपली वाटते. मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात ही योजना गेली तर आमचे नुकसान होईल, असा महापालिका कर्मचाऱ्यांचा दावा आहे. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र पहिली निविदा रद्द करून फेरनिविदा काढली जाणार आहे. मात्र याबाबत अजूनही वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

| प्रशासन काय म्हणते?

निविदा प्रक्रिया आणि या योजनेबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले कि या टेंडर बाबत प्री बीड मिटिंग मध्ये वेगवेगळ्या मागण्या आल्या. त्यावर अमल झाला असता तर मूळ योजनाच बदलावी लागली असती. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण वैद्यकीय विमा काढणार आहोत. मात्र अंशदायी योजनेत आपण कुठलाही बदल करणार नाही. उलट सदस्य आणि महापालिका कर्मचाऱ्यांना यातून पहिल्यापेक्षा जास्त फायदाच होणार आहे. तसेच यावर पूर्णपणे महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. आरोग्याची चांगली सुविधा देण्याचाच महापालिकेचा प्रयत्न आहे. अतिरिक्त आयुक्त पुढे म्हणाले, ही योजना कॅशलेस राहणार आहे. याचाही कर्मचाऱ्यांना फायदाच होणार आहे. याबाबत कर्मचारी संघटनांना देखील विश्वासात घेतले जाणार आहे.

| कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम

प्रशासनाने योजनेची चांगली बाजू सांगितली असली तरी कर्मचारी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि, पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सन १९६७ पासून अविरतपणे आजतागायत सुरु आहे. प्रशासनाने अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना बंद करून खाजगी विमा कंपनीस वैद्यकीय योजना चालविणेस देणेबाबत प्रक्रिया सुरू केलेली आहे. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन(मान्यताप्राप्त) व सहयोगी
संघटनांना मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. सदर योजना खाजगी विमा कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी
कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तरी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कायमस्वरूपी बंद होऊन विमा कंपनीमार्फत नवीन वैद्यकीय योजना राबविल्यास सर्वच कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सन १९६७ पासून सुरू असलेली कामगारांचे आरोग्याशी निगडीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अशीच यापुढे देखील चालू राहावी, असे ही पदाधिकारी म्हणाले.

Dams Water | चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर | धरण क्षेत्रात संततधार सुरूच 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात संततधार सुरूच

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ४.९३ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६६ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ३ महिन्यांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १० मिमी, पानशेत ४०  मिमी, वरसगाव ३३  मिमी तर टेमघर धरणात ३६  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Pune Metro | CM Eknath Shinde | पुणे मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

आज मुंबई येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी पुणे मेट्रोच्या सद्यस्थितीच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री यांना दिली.

याव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गांच्या मान्यतेची सद्यस्थिती, तसेच पुणे मेट्रोच्या ४८.२ किमीच्या फेज २ या प्रकल्प अहवाल बनवण्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती मा. मुख्यमंत्री यांनी घेतली. याप्रसंगी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मेट्रोल सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.

organic farm produce | सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिका ओटे उपलब्ध करून देणार 

Categories
Uncategorized

सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिका ओटे उपलब्ध करून देणार

| शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे

पुणे | मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात ‘अर्बन फूड सिस्टिम’ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रीय आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहरी बाजारपेठेत सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतमालाची मागणी जास्त आहे. शहरी बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रीय किंवा विषमुक्त शेतमाल पुरवठा करावयाचा आहे. असा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अर्बन फुड सिस्टीम’अंतर्गत आत्मा, कृषी विभाग, पणन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत शेतकरी आठवडे बाजार, सुनियोजित किरकोळ बाजार, मिड डे मिल या संकल्पनेतील शाळांचे किचन व ओटा मार्केटच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विषमुक्त शेतमाल पिकवून पुणे शहरात स्वखर्चाने वाहतूक करुन विक्री करण्यास इच्छुक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे.

इच्छुकांनी अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहितीकरिता प्रकल्प संचालक, आत्मा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी अर्जामध्ये नमूद माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज पुणे जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात २० जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हा अंमलबजावणी प्रमुखांनी कळविले आहे.